पान:इहवादी शासन.pdf/२५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४६ । इहवादी शासन
 

पाकिस्तानच्या मागणीला पाठिंबा देऊन त्या जमातीच्या फुटीर वृत्तीचा सतत परिपोष केलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ हे त्यांच्या मतें जातीय आहेत, पण मुस्लिम लीग मात्र प्रगतिवादी आहे, तिला प्रतिगामी म्हणणे चूक आहे. १९४० पर्यंत डायाकॉव्ह, ब्रुशेव्हिन यांसारखे भारतीय कम्युनिस्टांचे गुरु लीगवर प्रखर टीका करीत. पाकिस्तानच्या मागणीचा निषेध करीत. पण पुढे त्यांनी आपलीं मतें बदललीं आणि तशी कळ फिरताच येथल्या कम्युनिस्टांचीं भाषणेंहि बदललीं.
 कम्युनिस्टांच्या मध्यवर्ती समितीचे सदस्य सय्यद जहीर यांनी मुस्लिम लीगचा प्रभाव वाढत आहे म्हणून तिचें जाहीरपणें अभिनंदन केलें आणि मुस्लिमांना स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र दिलें पाहिजे असा प्रचार सुरू केला. त्या वेळी युद्धप्रयत्नांत ब्रिटिशांना साह्य करण्याचें कम्युनिस्टांचें धोरण होतें. मुस्लिमांचा गौरव करून, त्यांच्या मागण्या मान्य करून ते त्या कामी सहभागी व्हावेत असा कम्युनिस्ट पक्षाचा हेतु होता. त्यामुळे मुस्लिम लीग ही साम्राज्यविरोधी असून, तिच्या मागण्या न्याय्य, राष्ट्रीय व पुरोगामी स्वरूपाच्या आहेत असा घोष पक्षाने चालविला होता.
 फेब्रुवारी १९६९ मध्ये बिहारमध्ये मध्यावधि निवडणुका झाल्या. त्या वेळी कम्युनिस्टांनी मुस्लिम मतें जिंकण्यासाठी काय प्रचार केला? "रशियाने पाकिस्तानला शस्त्रास्त्रांची मदत दिलेली आहे तेव्हा रशियाच्या कृपेंतला जो भारतीय कम्युनिस्ट पक्ष त्याला मतें देणें हें मुस्लिमांचें कर्तव्यच ठरतें", असा उघड उघड पाकिस्तानधार्जिणा, धार्मिक भावनेला फुंकर घालणारा व अराष्ट्रीय प्रवृत्तीला चेतविणारा प्रचार कम्युनिस्टांनी केला. धर्म ही अफूची गोळी मानणाऱ्यांनी धर्मभेद चेतवून मतें मिळविली. केरळमध्ये नंबुद्रिपाद सरकारने मुल्लापुरम् जिल्हा निर्माण करून हाच धर्मभेद आणखी रुंद केला. हा जिल्हा निर्माण झाला तेव्हा देशांतून व परदेशांतून तेथील लीग-नेत्यांना अभिनंदनाच्या तारा आल्या, यावरून हें लहानसें दुसरें पाकिस्तान निर्माण झालें, ही त्या वेळी झालेली टीका सार्थच होती असें दिसतें.
 याच मलबार भागांत खिलाफतीच्या काळी हिंदूंच्या कत्तली झाल्या होत्या. त्याचीच पुनरावृत्ती झाली, तर त्यांत दुःख करण्याचें कारण नाही. आणि दुःख कोणाला होणार आहे ? केरळमधील संयुक्त आघाडीतील एकाहि पक्षाने या स्वतंत्र जिल्ह्याला विरोध केला नाही. तेव्हा कत्तली झाल्या, तर 'शूर मोपला' म्हणून त्यांचें कौतुकच होईल.
 आता तर इंदिरा काँग्रेसने केरळमध्ये कम्युनिस्टांना व त्यांच्या मुस्लिम स्नेहाला भरघोस आशीर्वाद दिला आहे. कम्युनिस्ट व मुस्लिम लीग या दोन्ही इहवादविरोधी शक्ति. जातीयता, अंधश्रद्धा, राष्ट्रधर्माला विरोध, भारतबाह्य परकीय शासनाशीं दृढसंबंध हीं दोन्ही पक्षांची प्रधान लक्षणें आणि इहवादाची प्रतिज्ञा करून सत्तारूढ झालेली काँग्रेस त्यांना पाठिंबा देत आहे, त्यांच्याशीं सहकार्य करीत आहे, त्यांचा