पान:इहवादी शासन.pdf/२५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । २४५
 

 एक शेतकरीवर्ग घेतला तरी त्यांत स्पृश्य आहेत, अस्पृश्य आहेत, हिंदु आहेत, मुस्लिम आहेत, कम्मा आहेत, रेड्डी आहेत, जाट, चौहान, रजपूत, भूमिहर, कायस्थ, मराठे, कुणबी, ब्राह्मण सर्व सर्व आहेत. एवढ्यांच्या मनांतील जात्यभिमान नष्ट करून, यांना वर्गजागृत करावयाचें म्हणजे अत्यंत कष्टाचें काम आणि त्यामुळे भारतीय समाज संघटित होईल ही भीति ! तेव्हा अखिल भारतीय किसानसभेचे अध्यक्ष एन् प्रसाद राव (आंध्र कम्मा) यांनी उपदेश केला की, "किसानांच्या जातीय संघटनाच कम्युनिस्टांनी केल्या पाहिजेत."

श्रीमंत शेतकऱ्यांचा भरणा

 १९५४ सालच्या मध्यवर्ती समितीने एका ठरावांतच म्हटलें आहे की, बहुसंख्य शेत-मजूर मागास जातीचे आहेत. त्यांना स्पृश्य किसान सभेंत प्रवेश दिला, तर इतर किसान त्या संघटनेत येणार नाहीत म्हणून त्यांना सभेत घेणें कठीण आहे. यामुळे झालें काय की, मध्यम व श्रीमंत शेतकरी यांचा भरणा किसान संघटनेंत होऊन बहुसंख्येने अस्पृश्य असलेले भूमिहीन मजूर हे त्या संघटनेत अभावानेच उठून दिसले. पण याची स्टॅलिनच्या अनुयायांना कांही खंत वाटली नाही. यावर टीका करतांना 'डेंजरस् डिकेडस्' या ग्रंथाचा लेखक हॅरिसन म्हणतो की, "अशा रीतीने जातीयवादाचा आश्रय केल्यामुळे कदाचित् काँग्रेसच्या हत्यारानेच तिच्याशीं कम्युनिस्टांना मुकाबला करतां येईल. पण तसें झालें तरी ती संघटना म्हणजे क्रांतीचें हत्यार ठरत नाही किंवा हिंदु समाजांतील जातीय तट कोसळून टाकण्याचें कार्यहि तिच्यामुळे होत नाही (पृष्ठे २७१-७२).
 पण हें कार्य कम्युनिस्टांना करावयाचेंच नाही. जातीय तट जास्तच भक्कम करून हिंदु समाज जितका जास्त भग्न करतां येईल तितका त्यांना करावयाचा आहे. कारण मार्क्सप्रणीत वर्गजागृति, वर्गलढा ही भाषा ते बोलत असले तरी तें त्याचें खरें उद्दिष्ट नाही. सोव्हिएट रशिया वा चीन यांच्या मुक्ति फौजांच्या यशाची त्यांना चिंता आहे. इंदिरा गांधी या १९५९ साली काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून म्हणाल्या होत्या, "कम्युनिस्ट हे पंचस्तंभीय आहेत, देशद्रोही आहेत, मीरजाफर आहेत, जयचंद आहेत. त्यांचे धनी परदेशांत असून ते त्यांचे पोपट आहेत."
 पंडित जवाहरलालहि एकदा म्हणाले होते, "कम्युनिस्टांना नीतिअनीति नाही. कसली निष्ठा नाही व मानवी मूल्येंहि ते जाणीत नाहीत." असा पक्ष इहवादासारख्या क्षुद्र तत्त्वज्ञानाला मान देणें कसें शक्य आहे ?

फुटीर वृत्तींना पाठिंबा

 प्रांतीय व जातीय भेदांना चेतविणारे कम्युनिस्ट जमातीय भेदाचा फायदा घेणार नाहीत हे शक्यच नाही. हिंदु-मुस्लिम या जमातींचा संघर्ष हे भारतीय राजकारणांतील मर्मस्थान आहे आणि १९४० पासून कम्युनिस्ट पक्षाने मुस्लिमांच्या