पान:इहवादी शासन.pdf/२५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४४ । इहवादी शासन
 

 आंध्रमधील चंद्रशेखर राव, राजेश्वर राव, वसवपुनय्या, कत्रगद्द, राजगोपाल राव इ. प्रमुख नेते हे सर्व कम्मा जातीचे आहेत. आणि स्वतः चांगले सधन आहेत. कम्मा ही सर्व जातच जमीनदार असल्यामुळे श्रीमंत आहे व ती तेथील कम्युनिस्ट पक्षाचें चांगलें पोषण करतें. कम्युनिस्ट नेते त्यांच्यांतलेच असल्यामूळे तिला तेथे जमीनदारी नष्ट होण्याची भीति नाही. रेड्डी लोक काँग्रेसच्या पक्षाचे आहेत. कम्युनिस्टांना काँग्रेसला विरोध करावयाचा आहे. तेव्हा ते जातीयतेचा उघड उघड आश्रय करतात. तामीळनाडूमध्ये कम्युनिस्ट पक्षाचें नेतृत्व ब्राह्मणांकडे आहे. वास्तविक राष्ट्रीय वृत्तीच्या त्यागी नेत्यांना ब्राह्मण असूनहि अनेक प्रांतांत यश मिळालेलें आहे. पण कम्युनिस्टांना ती वृत्ति वर्ज्यच आहे. त्यामुळे तामीळनाडू, महाराष्ट्र अशा प्रदेशांत जेथे नेतृत्व ब्राह्मण कम्युनिस्टांकडे आहे तेथे ते यशस्वी होत नाहीत. अर्थातच तेथे ते पराकाष्ठेचे जातीय बनतात. पण तरीहि त्या त्या जातीचे पुढारी त्यांच्यावर कृपा करतात तेव्हाच त्यांना थोडेसें यश मिळतें. तामीळनाडूमध्ये द्रविड कळघमच्या आश्रयाने कम्युनिस्ट जरा पुढे सरकले. पण त्यांचा आश्रय तुटतांच त्यांचे यश रोडावलें.
 केरळमध्ये कम्युनिस्टांना यश आलें व त्यांच्या हातीं सत्ताहि आली ती झावा, नायर या जातींचा जात्यभिमान त्यांनी चेतविल्यामुळे आणि मुस्लिम लीगच्या आश्रयामुळे. नंबुद्रिपाद हे जातीने ब्राह्मण जातिभेद मोडले पाहिजेत, असें ते म्हणतात. पण प्रारंभीं किसानांची वर्गीय संघटना करण्याऐवजी जातीय संघटना केली पाहिजे, असें त्यांचें प्रतिपादन आहे.

मूळ उद्देशाकडे दुर्लक्ष

 प्रांतभेद, जातिभेद, धर्मभेद, जमातभेद हे भेद वृथा होत. भांडवलदार, जमीनदार हा एक वर्ग आणि किसान कामगार ही कष्टकरी जनता हा दुसरा वर्ग. हा एकच भेद खरा असून, पहिल्या वर्गाला पदच्युत करण्यासाठी किसान- कामगार या वर्गांची संघटना बांधली पाहिजे, असें मार्क्सचें प्रधान तत्त्व आहे आणि या तत्त्वावर दृष्टि ठेवून कम्युनिष्ट पक्षाने कष्टकरी जनतेची संघटना दृढ केली असती, तर हिंदुस्थानचें कोट-कल्याण झालें असतें. कारण तसें करतांना त्यांना स्पृश्य-अस्पृश्य भेदावर प्रहार करून अस्पृश्यता निर्मूलनाचा देशव्यापी कार्यक्रम हातीं घ्यावा लागला असता. भारतांतील जातिभेदांचें घातकत्व सर्व जातींना पटवून देऊन जात्युच्छेदनाची प्रचंड चळवळ उभारावी लागली असती. त्यासाठी वुद्धिवाद, तर्कविज्ञान यांचे संस्कार भारतीय जनतेवर करून तिच्या मनांतील अनेक भ्रांत समज, अनेक अंधश्रद्धा, अनेक घातक रूढि यांचा नायनाट करावा लागला असता. पण हें कार्य दीर्घकाळाचें, अत्यंत कष्टाचें तीव्र मतभेदांचें आणि प्रारंभी तर निराशेचें होतें आणि अजूनहि आहे.