पान:इहवादी शासन.pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । २४३
 

 कम्युनिझमचें मूळ तत्त्वज्ञान विश्वराष्ट्राचें आहे. कोणत्याहि एका देशांत कम्युनिझम स्थापन होणें मार्क्समतान्वये अशक्य आहे. सोव्हिएट नेत्यांनी १९१७ च्या क्रांतीनंतर सर्व जगभर क्रांति करण्याचे प्रारंभी प्रयत्न केले. पण त्यांत पूर्ण अपयश आल्यामुळे स्टॅलिनने एकराष्ट्रीय कम्युनिझमचें तत्त्व सांगितलें. पण आपण मूळ मार्क्सतत्त्व सोडलें नाही, हें जगांतल्या कम्युनिस्टांना दाखविण्यासाठी त्याने कॉमिटर्न, कॉमिनफॉर्म अशा संस्था स्थापून कामगारांच्या विश्वराज्याच्या घोषणा चालू ठेवल्या आणि या राज्यांत म्हणजे कॉमिनफॉर्ममध्ये आपापले देश आणून समाविष्ट करावे अशी देशोदेशींच्या कम्युनिस्टांना आज्ञा दिली.

जमातवादाचा आश्रय

 वास्तविक आता कॉमिटर्न, कॉमिन्फॉर्म याचा अर्थ सोव्हिएट रशियाचें साम्राज्य असाच होतो हें जगजाहीर झालेलें आहे. तरीहि सोव्हिएट नेत्यांवर भारतीय कम्युनिस्टांची पूर्ण श्रद्धा असल्यामूळे, ते यांचे आश्रयदाते, तारणकर्ते स्वामी असल्यामुळे, ते तसें मानीत नाहीत. त्यामुळे स्वदेशीय शासन दुबळें करून, स्वदेशांत अराजक माजवून, त्याची शकलें करून, संपूर्ण देश विघटित करून, अंतीं रशिया किंवा चीन यांच्या मुक्ति फौजांच्या तो स्वाधीन करणें हें त्यांचें ध्येय आहे. अर्थातच इहवाद, शास्त्र, इतिहास, बुद्धिस्वातंत्र्य हीं सर्व वाऱ्यावर उधळून देऊन जातीयता, प्रांतीयता, जमातवाद यांचा आश्रय करून आपले वर्चस्व भारतांत जेथे साधेल तेथे प्रस्थापित करणें आणि शक्य तर सत्तास्थानें काबीज करून त्यामार्गे भारताला हीनबल करून टाकणें हें त्यांचे कर्तव्यच आहे. त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट हे पक्के जातीयवादी, जमातवादी व प्रांतवादी झालेले आहेत. (इंडिया- दि मोस्ट डेंजरस डिकेडस्– सेलिंग हॅरिसन आणि 'कम्युनिझम इन् इंडिया' ओव्हरस्ट्रीट अँड विंडमिलर, या ग्रंथांत कम्युनिस्ट कसे एकांतिक जातीयवादी आहेत त्याचें सविस्तर विवेचन केलेलें आहे. 'इलस्ट्रेटेड वीकली, दिनांक २६-४-१९७० या अंकांतील, 'विल इंडिया गो कम्युनिस्ट'- नुराणी आणि 'इन् शिप्स क्लोदिंग'- 'सतींद्रसिंग' हे लेखहि 'जिज्ञासूंनी अवश्य पाहवे.)'
 आंध्र प्रदेशांत कम्मा व रेड्डी या दोन प्रबल अशा ब्राह्मणेतर जाति आहेत. दोन्ही जाति प्रामुख्याने जमीनदार आहेत. दोन्ही जमाती मूळच्या क्षत्रिय. पण आता त्या शेतकरी-कुणबी झाल्या आहेत. कम्मा जातीचें म्हणणें असें की, आपण क्षत्रिय असतांना रेड्डी जातीने आपल्याला तुच्छ लेखून किसानपदाला नेलें. यामुळे या दोन जातींत अनेक शतकें वैर आहे. येथील ब्राह्मण या दोन्ही जातींना शूद्र लेखतात. त्यामुळे त्यांच्याशीं तर त्यांचा उभा दावा आहे. अशा स्थितींत जातिकल्पनांचा उच्छेद करून या जातींतला वैराग्नि शमविण्याचा प्रयत्न करणें हें कोणाहि राष्ट्रनिष्ठ इहवादी नेत्यांचे कर्तव्य होय. पण कम्युनिस्टांनी असा प्रयत्न कधीहि केला नाही.