पान:इहवादी शासन.pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४२ । इहवादी शासन
 

 भारत हे एक राष्ट्र आहे असें भारतीय कम्युनिस्ट पक्ष कधीच मानीत नसे. कारण स्टॅलिन तसें मानीत नसे. सोव्हिएट रशियामध्ये युक्रेन, अझरबैदान, तुर्किस्तान इ. बारा-पंधरा प्रांत आहेत. त्यांच्या भाषा, त्यांचें व्यक्तित्व रशियांतला प्रधान प्रांत जो ग्रेट रशिया त्याच्याहून अगदी भिन्न आहे. क्रांति होतांच लेनिनच्या पक्षाने "या सर्व प्रांतांना पूर्ण स्वातंत्र्य आहे, रशियांतून फुटून निघण्याचा सुद्धा हक्क आहे" अशी घोषणा केली. पण प्रत्यक्षांत मात्र तसें स्वातंत्र्य त्याने कोणालाहि दिलें नाही. त्या त्या प्रांतांतील ज्या नेत्यांनी तसा प्रचार केला त्यांना लेनिनने जगांतून नाहीसें केलें व लष्करी बळावर रशियाचें पूर्वीचें साम्राज्य जसेंच्या तसें टिकवून धरलें. पण बाह्यतः मात्र या सर्व प्रांतांना पूर्ण स्वातंत्र्य आहे व सोव्हिएट रशिया हें अजूनहि त्यांचें संघराज्य आहे असा पुकारा अजूनहि केला जातो. अर्थातच भारतीय कम्युनिस्ट पक्षाला भारतांतील पंजाब, बंगाल, गुजरात, महाराष्ट्र हीं स्वतंत्र सार्वभौम राष्ट्रें व्हायला हवीं आहेत. तेव्हा भारत हे एकराष्ट्र कधीहि नव्हतें व तसें तें होणें शक्य नाही, तें फार तर संघराज्य होईल, असा घोष करणें प्राप्तच होतें.

सूर बदलला

 हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून काँग्रेसने मान्य केली. तिलाहि याच कारणासाठी विरोध करणें अवश्य होतें. कारण भारताच्या एकराष्ट्रीयत्वाची ती निदर्शक आहे. आज्ञेप्रमाणे भारतीय कम्युनिस्ट भारताचे एकराष्ट्रीयत्व व राष्ट्रभाषा हिंदी यांना विरोध करण्याचें कार्य भक्तिभावाने करीत राहिले. पण १९५३ मध्ये स्टॅलिन मृत्यु पावला. त्यानंतर त्याच्या पदावर जे सोव्हिएट शास्ते आले त्यांना भारताशी स्नेह करणें अवश्य आहे असें वाटलें. त्यांनी अपले धोरण बदलून आपल्या मुखयंत्रांच्या कळी दाबल्या. त्याबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालसूर पालटले. भारत हे पूर्वीपासूनच एक राष्ट्र आहे, प्रांतभेद हे गौण आहेत, या सुरांत ते गाऊं लागले.
 "पूर्वीच हें आपल्या लक्षांत यावयास हवें होतें, पण आलें नाही" याबद्दल अवश्य ती खंत व लज्जा व्यक्त करून मदुरेच्या सभेंत (डिसेंबर १९५३) अजय घोष म्हणाले की, "वास्तविक कष्टकरी जनता भारतांत एकवर्गीयच आहे आणि म्हणून भारत हें एक राष्ट्र आहे, हेंच सत्य होय. पण भांडवली राष्ट्रवादाच्या कल्पना आमच्या डोक्यांत शिरल्यामुळे आमच्याकडून प्रमाद झाला." याच सुमारास कम्युनिस्ट पक्ष हिंदीचाहि राष्ट्रभाषा म्हणून गौरव करूं लागला व हिंदीतर प्रांतांतह हिंदीचा अभ्यास झाला पाहिजे, असे आग्रहाने सांगू लागला.
 आपली बुद्धि ज्यांनी आपल्या परकीय स्वामींना अशा रीतीने कायमची विकलेली आहे, त्यांना इहवादी कसें म्हणतां येईल ? ती त्या शब्दाची विटंबना होईल. कारण स्वतंत्र प्रज्ञा, स्वतंत्र चिंतन, निर्णय करण्याचें स्वातंत्र्य हें इहवादाचें प्रधान लक्षण होय.