पान:इहवादी शासन.pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । २४१
 

त्या देशांतील इहवादाचे आणि प्रगतीचे, उत्कर्षाचे तेथील कम्युनिस्ट पक्ष कडवे शत्रु होऊन बसतात. भारतांतील कम्युनिस्ट पक्षहि याला अपवाद नाही.
 मॉस्कोच्या वचनांवरूनच भारतीय कम्युनिस्टांची प्रवृत्ति व निवृत्ति होत असते हें आता जगजाहीर आहे. अनेक पंडितांनी या पक्षाचें विवेचन करतांना त्याची उदाहरणेंहि भरपूर दिली आहेत. त्या सर्वांची पुनरुक्ति येथे करण्याचें कारण नाही. विषयपूर्तीसाठी त्यांच्या विवेचनाचा सारार्थ देऊन पुढे जाऊं.

'महाराजां'चे मार्गदर्शन

 पहिली महत्त्वाची गोष्ट अशी की, भारतांत ज्या ज्या वेळीं कम्युनिस्ट पक्षाचीं अधिवेशने होतात त्या त्या वेळीं सोव्हिएट रशियांतून किंवा रशियामान्य इतर देशांतील कम्युनिस्ट पक्षांतून कोणी तरी मार्गदर्शक येथे येतो आणि वारकऱ्यांच्या फडावर मुख्य फडकरी जसा हुकमत गाजवतो तसा तो कम्युनिस्ट पक्षाच्या भाविक, श्रद्धाळू, मॉस्को-परायण सभासदांवर अंमल चालवितो. आतापर्यंत ॲशले, ॲलिसन, ब्रॅडले, डायाकाव्ह, व्हाल्डिमीर, डेडीजर, रॅडोनिन, झॅकोव्हस्की इत्यादि 'महाराजांनी' येथल्या शिष्यांना गुरूपदेश दिला आहे.
 १९५३ च्या मदुराई परिषदेला हॅरिपॉलिट हे 'गुरुजी' आले होते. १९५६ मध्ये पालघाटला शेपिलाव्हने पत्रद्वारें मंत्र दिला होता. १९६१ च्या विजयवाडा अधिवेशनाचे सुस्लाव्ह हे मार्गदर्शक होते. अजय घोष यांच्यासारख्या प्रौढ सभासदांनी केव्हा केव्हा जरा नाराजीने तक्रार केलेली आढळते की, त्या "गुरुजींनी जे जे मंत्र आम्हांला पढविले ते ते मुकाट्याने आम्हीं म्हटलें." ते म्हणाले, "म्हणा, भारताचें स्वातंत्र्य पोकळ स्वातंत्र्य आहे" आम्हीं तसें म्हटलें. ते म्हणाले, म्हणा "नेहरू साम्राज्यवाद्यांचे हस्तक आहेत." आम्ही म्हणालों, "नेहरू साम्राज्यवाद्यांचे हस्तक आहेत." अशी नाराजी, अशी कुरकूर केव्हा केव्हा केली जाते. पण मॉस्कोवचनप्रामाण्याला त्यामुळे कधी बाध आलेला नाही.
 दुसरें महायुद्ध १९३९ साली सुरू झालें. तें जर्मनी व ब्रिटन या दोन राष्ट्रांत चालू होतें. तोंपर्यंत भारतीय कम्युनिस्ट त्याला साम्राज्यवादी युद्ध म्हणत. पण १९४१ सालीं जर्मनीने रशियावर स्वारी करतांच तें लोकयुद्ध होय, असें त्या पक्षाने जाहीर केलें. त्यामुळे अर्थातच ब्रिटन हें जें अव्वल साम्राज्यवादी राष्ट्र होतें तें एकदम लोकवादी, प्रगतिशील राष्ट्र ठरलें आणि भारतांतील गांधी, नेहरू हे जे काँग्रेसचे युद्धविरोधी नेते ते प्रतिगामी, कामगारविरोधी, इतिहासाला मागे खेचणारे असे ठरले. 'छोडो भारत' या काँग्रेसच्या चळवळीला कम्युनिस्टांचा कडवा विरोध झाला तो यामुळेच. सोव्हिएट रशियाची त्यामुळे हानि झाली असती. अशा चळवळीला पाठिंबा देणें म्हणजे स्वामिद्रोह होय!

 इ, शा. १६