पान:इहवादी शासन.pdf/२५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४० । इहवादी शासन
 

जमातीची तर हानि होईलच, पण भारताच्या राष्ट्रीय प्रगतीला तो अडसर होऊन बसेल. ही जाणीव ठेवून मुस्लिम नेत्यांनी त्याला काळाबरोबर आणण्याचे कार्य शिरावर घेतलें पाहिजे."
 कांही मुस्लिम नेत्यांनी या कार्याला शुभारंभ केला आहे. त्यांना हिंदूंनी शक्य तें साह्य केलें पाहिजे. पण एकीकडे ते करीत असतांना अंतर्मुख होऊन, इहवादाचा आश्रय करून, हिंदूंनी स्वसमाजांतील विघटनेचीं बीजें नष्ट करण्याचें कार्यहि केलें पाहिजे. म्हणजे हा सनातन समाज संघटित होईल, बलिष्ठ होईल व मग त्याला इहवादी, लोकायत्त भारत राष्ट्राचें स्वप्न सहज प्रत्यक्षांत आणतां येईल.

कम्युनिस्ट
११


 भारतीय इहवादाला कम्युनिस्ट पक्ष हा मुस्लिम लीगइतकाच घातक आहे. आज जवळ जवळ तीस वर्षे या पक्षाने मुस्लिम लीगच्या अराष्ट्रीय जातीयवादाला सतत पाठिंबा दिलेला आहे आणि आता तर काँग्रेस व तिचे नेते या पक्षाच्या संपूर्ण आहारीं गेले आहेत. त्यामुळे कम्युनिस्ट पक्षाची घातशक्ति दसपट वाढली आहे. म्हणून मुस्लिम जातीयवादाप्रमाणेच कम्युनिस्टांच्या जातीयवादाचा व त्या पक्षाच्या इहवादघातक वृत्तीचा बारकाईने अभ्यास करणें अवश्य आहे.
 सोव्हिएट रशियांतील इहवादी शासनाचा विचार करतांना बुद्धिप्रामाण्य, व्यक्तिस्वातंत्र्य, समता, वस्तुनिष्ठ सत्यशोधन, विज्ञाननिष्ठा, प्रयोगनिष्ठा इत्यादि इहवादाच्या तत्त्वांची तेथे क्षणोक्षणी कशी पायमल्ली होत आहे याचा ऊहापोह झालेला आहे.
 चीनमध्ये तर वरील तत्त्वांची यापेक्षा दसपट गळचेपी होत आहे आणि जगांतील बहुतेक सर्व देशांतील कम्युनिस्ट पक्ष हे रशिया व चीन यांचेच हस्तक असल्यामुळे त्या पक्षांत इहवादी विचार- आचार- स्वातंत्र्याची, स्वतंत्र मतप्रतिपादनाची काय प्रतिष्ठा असेल तें निराळें सांगण्याची गरज नाही.
 मॉस्को किंवा पीकिंग येथून आज्ञा येतील त्याप्रमाणे त्यांना आपलीं मतें बनवावीं लागतात. तशा तशा कोलांट्या मारून दाखवाव्या लागतात. तसा तसा नाच करून दाखवावा लागतो. इतर देशांतील कम्युनिस्ट पक्ष असे पूर्ण शब्द-प्रामाण्यवादी मार्क्स-लेनिन-स्टालिन-माओ-कोसिगिनोक्त धर्माचे अंध अनुयायी असल्यामुळे इहवादाशी त्यांचा दूरतः सुद्धा संबंध असण्याची शक्यतां नाही. पूर्वी "वचनात् प्रवृत्तिः वचनात् निवृत्तिः" हा जसा दंडक होता तसाच दंडक आज त्या पक्षांत सर्वत्र आहे. वेद, स्मृति यांच्या ऐवजी मॉस्को-पीकिंग यांची वचनें ते मानतात इतकाच फरक. त्यामुळे त्या