पान:इहवादी शासन.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२ । इहवादी शासन
 

टाकली पाहिजेत; नाही तर फसगत होईल. गौतमबुद्धाने परमेश्वर अमान्य केला होता, पण त्याच्या अनुयायांनी त्यालाच परमेश्वर मानले. आज विसाव्या शतकांतील विज्ञानयुगांत रशियांत हेंच घडत आहे. लेनिन, स्टॅलिन यांनी देव नष्ट केला, तर लोक त्यांनाच देव मानूं लागले. रशियांत अनेक घरांत व चर्चमध्येहि प्राइस्ट, मेरी यांच्याबरोवर लेनिनचा फोटो लावून त्याला हार घातलेला आढळतो. शिवाय धर्म ही एक महाप्रेरणा आहे हें रशियाला दुसऱ्या महायुद्धाने दाखवून दिले आहे. खऱ्या कसोटीच्या वेळीं माणसाला बळ देणारी हीच प्रेरणा आहे, हें ध्यानांत आल्यानंतरहि आणि त्या प्रसंगी स्टॅलिनसारख्या दंडशहालाहि देवधर्माला शरण जावें लागलें हें पाहिल्यानंतर हि पुन्हा धर्माचा उच्छेद करण्याची भाषा बोलणारे कम्युनिस्ट हे कमालीचे पोथीनिष्ठ आहेत असेंच म्हणणे प्राप्त आहे.
 धर्मभावनेचें जतन करावयाचें म्हणजे तिच्यावर साचलेल्या सर्व जळमटांचे रक्षण करावयाचें असें नव्हे. या भावनेतून धर्मभोळेपणा, भोंदूगिरी, असहिष्णुता, परलोकनिष्ठा, निवृत्ति, शब्दप्रामाण्य इत्यादि अनेक अनर्थ निर्माण होतात हें खरें. पण विज्ञानाच्या, तर्काच्या, बुद्धीच्या साह्याने हीं बांडगुळे छाटून टाकून परमेश्वरावरील श्रद्धा, आत्म्याच्या अमरत्वावरील निष्ठा, सर्व भूतांचं ऐक्य हीं मूळ धर्मतत्त्वें जोपासता येतात, हें इंग्लंड, अमेरिका, जपान, जर्मनी या देशांनी दाखवून दिले आहे. ही तत्त्वें तर्काधिष्ठित आहेत म्हणून तीं जतन करावी असें नाही. त्या श्रद्धा म्हणजे मानवजातीचें जीवन आहे, हे ध्यानी घेऊन त्यांची जपवणूक केली पाहिजे. मानवी स्वभाव आपण बदलूं शकतो अशी कम्युनिस्टांची प्रतिज्ञा आहे. पण कुटुंबसंस्था, परंपराभिमान, खाजगी मालमत्ता या प्रत्येक बाबतीत त्यांना माघार घ्यावी लागली आहे. धर्माच्याहि बाबतीत त्यांना हाच अनुभव येईल आला आहे, येत आहे. तेव्हा धर्म हा शक्य तितका विशुद्ध, विज्ञानपूत, तर्कशुद्ध करून घ्यावा व त्या मूलप्रेरणेचें जतन करावें यांतच शहाणपणा आहे, हें इहवादी विचारवंतांनी ध्यानीं घेतलें पाहिजे.
 सेक्युलर म्हणजे इहवादी, ऐहिकनिष्ठ, या जगांतल्या व्यवहाराला, जीवनाला महत्त्व देणारे; आणि सेक्युलॅरिझम म्हणजे इहवाद. मध्ययुगाच्या आरंभीं युरोपांत धर्मसत्ता सर्वंकष होती. ती तशी नसावी व परलोक, अध्यात्म, मोक्ष या क्षेत्रांपुरती तिची सत्ता मर्यादित करून राजकीय, सामाजिक, आर्थिक- सर्व ऐहिक व्यवहार हा शासनाच्या, राजसत्तेच्या वा लोकांच्या ताब्यांत द्यावा अशी त्या वेळच्या इहवादी पंडितांची मागणी होती. अशी मागणी कां निर्माण झाली याचा विचार पाहिला, तर असें दिसून येतें की, आपल्या अध्यात्मशक्तीमुळे आपल्याला राजकारण, विज्ञान, समाजशास्त्रे, इतिहास, भूगोल या क्षेत्रांत सर्व कांही समजतें असा धर्मपीठांचा, धर्मपंडितांचा व धर्मगुरूंचा दावा होता. प्रत्यक्षांत त्यांना तसें कांही समजत नसे व त्यामुळे वेळोवेळीं अनर्थ होत असत. विज्ञानसंशोधन, तर्कशास्त्र, व्यक्तिस्वातंत्र्य,