पान:इहवादी शासन.pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । २३७
 

मागे इहवादी, लोकवादी, राष्ट्रनिष्ठ अशा सर्व समाजांनी संघटित बळ उभे करणें अवश्य आहे. तरच मुस्लिमांच्या डायरेक्ट ॲक्शनला तोंड देतां येईल.
 पण हें व्हावयाचें तर हिंदु समाज पूर्णपणे इहवादी होणें अवश्य आहे. त्या दृष्टीने त्याने पुष्कळच पावले टाकलीं आहेत, हें खरें आहे. येथे राष्ट्रनिष्ठा उदयाला आली, स्वातंत्र्यसंग्राम यशस्वी झाला, लोकसत्ताक आपण स्थापन केलें व कृषि, उद्योग, विज्ञान यांतहि वरीच प्रगति झाली हें त्याचेंच फळ होय, हें भारतीय इहवादाचें विवेचन करतांना प्रारंभीच्या लेखांत सांगितलेच आहे; पण अजूनहि पुष्कळच पल्ला गाठावयाचा आहे हे विसरून चालणार नाही.
 स्वातंत्र्यानंतरच्या काळांत डॉ. आंबेडकरांच्या प्रेरणेने लक्षावधि हरिजन हिंदु धर्म सोडून गेलें हें पाहूनहि हिंदु जागे झाले नाहीत. अत्यंत घातक अशा जन्मनिष्ठ चातुर्वण्याचा अभिमान सोडावयास ते तयार नाहीत. उत्तर प्रदेशचे मुख्य मंत्री चरणसिंग यांनी म्हटलें आहे की, "गेल्या चाळीस वर्षांत शेकडा ५६ जाट मुस्लिम झाले. कारण ब्राह्मण खत्री हे त्यांना अति हीन लेखतात. त्यांना जात बदलतां येत नाही, त्यांनी धर्म बदलला! गेल्या पंधरा वर्षांत उत्तर हिंदुस्थानांत वीस लाख लोकांनी हिंदु धर्म सोडून खिश्चन धर्माचा स्वीकार केला आहे. हिंदुधर्मांत राहून आपल्याला उत्कर्ष संधि मिळेल असें ज्यांना वाटत नाही त्या सर्व जाति हेंच करणार. हें ओळखूनच मुस्लिम नेत्यांनी भारतांतील मागास जमाती, आदिवासी व हरिजन यांना इस्लामची दीक्षा देऊन समतेचा धर्म द्यावा व इतकीं शतकें आपण केलेली चूक दुरुस्त करावी, अशा घोषणा करण्यास प्रारंभ केला आहे."
 निदाये मिल्लतचे संपादक म्हणतात, (१२-१-६९) "अस्पृश्य व आदिवासी यांना हिंदु समाजांत मनुष्याचा सुद्धा दर्जा नाही. वैदिक धर्मीयांनी त्यांना हजारो वर्षांपासून जन्म आणि कर्म यांच्या साखळदंडांनी जखडून टाकलें आहे. या लोकांना कल्याणाचा मार्ग दाखवून पापाच्या मार्गापासून त्यांचें संरक्षण करणें ही मुसलमान या नात्याने आमची जबाबदारी आहे."
 अस्पृश्यतेप्रमाणेच जातिजातीतले भेद अजून असेच टिकून आहेत. जाट, रजपूत, भूमिहर, ब्राह्मण, मराठा, मराठेतर, रेड्डी, अयंगार इत्यादि भेद स्वातंत्र्यानंतर जास्तच चिघळले आहेत व बहुतेक सर्व पक्ष ते स्वार्थासाठी चिघळवीत आहेत. आणि त्यामुळे हिंदु समाजाची शकलें होत आहेत. यांचे कारण एकच. बुद्धि, तर्क, इतिहास, अनुभव, वैज्ञानिक दृष्टि यांच्या आधारें आपण अजूनहि अरपृश्यता, चातुर्वर्ण्य, जातिभेद यांची तपासणी करूं शकत नाही; म्हणजेज आपण इहवादी नाही. अजुनहि हिंदु बहुजनसमाज हा पोथीनिष्ठ व अंधश्रद्ध आहे. तो इहवादी झाला तरच तो संघटित होऊं शकेल व आपल्या संख्येला लागलेली गळती थांबवूं शकेल. नाही तर केवळ लोकसंख्येच्या जोरावर भारतांत मल्लापुरम्सारखी अनेक पाकिस्तानें व अनेक ख्रिस्तीस्थानें निर्माण होतील.