पान:इहवादी शासन.pdf/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३६ । इहवादी शासन
 

 १९४६ सालच्या मुस्लिम लीगच्या बैठकींतले ठराव व भाषणें पाहिलीं म्हणजे त्यांचेच हे पडसाद पुन्हा उमटत असून, ही दुसऱ्या पाकिस्तानची पूर्वतयारी आहे हें कोणाच्याहि सहज ध्यानांत येईल. त्या बैठकींतला दुसरा ठराव असा आहे: "काँग्रेस ही हिंदूंचें जातीय राज्य स्थापू पाहत आहे. ब्रिटिश सरकार तिकडे कानाडोळा करीत आहे. तेव्हा पाकिस्तान मिळविण्यासाठी मुस्लिमांनी डायरेक्ट ॲक्शनचाच अवलंब केला पाहिजे. त्यावांचून आम्हांला न्याय मिळणार नाही, आमची इज्जत सांभाळली जाणार नाही". हा ठराव संमत होतांच बॅ. जीना म्हणाले, "आता सनदशीर मार्ग आम्ही सोडले" आहेत. आतापर्यंत त्या मार्गांचा आम्ही अवलंब केला. (वास्तविक १९३८ सालींच डायरेक्ट ॲक्शनचा अवलंब मुस्लिमांनी केला होता. किंबहुना प्रारंभापासून त्यांचा तोच मार्ग होता.) पण यश येत नाही. ब्रिटिश व काँग्रेस यांनी आमच्यावर पिस्तूल रोखलें आहे. तेव्हा आम्ही पिस्तूल रोखलें पाहिजे. (स्ट्रगल फॉर फ्रीडम- मुजुमदार, पृष्ठ ७४६).
 यानंतर मुस्लिमांची अत्यंत भयानक अशी डायरेक्ट ॲक्शन पंजाब आणि बंगाल मध्ये सुरू झाली हें सर्वश्रुत आहे. आणि तिच्यामुळेच काँग्रेस फाळणीला तयार झाली यांतहि शंका नाही. पंडितजींनीच तसें म्हटलें आहे. १९६० सालीं लिओनार्ड मॉसले यांना दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, 'खरें म्हणजे आम्ही सर्व म्हातारे झालों होतो. थकलों होतों. पुन्हा तुरुंगांत जाण्याची आमच्यांत ताकद नव्हती. पंजाबांतून जाळपोळीच्या नि कत्तलीच्या बातम्या रोज येत होत्या. फाळणी हाच मार्ग होता. आम्ही तो पत्करला.' (स्ट्रगल फॉर फ्रीडम, पृष्ठ ७६८, ६९).

संघटित बळ हवें

 याच इतिहासाची आता पुनरावृत्ति होत आहे. तेव्हा दुसरें पाकिस्तान टाळावयाचें असेल, तर इहवादी राष्ट्रीय वृत्तीच्या समाजांनी आणि विशेषतः हिंदूंनी केंद्र व राज्य सरकारच्या मागे संघटित बळ उभे करणें अवश्य आहे. मागच्या वेळी महात्माजी म्हणाले होते की, "बहुसंख्य मुस्लिमांना फाळणी हवी असेल, तर ती कोणीहि नाकारूं शकणार नाही. आता फाळणीविरुद्ध हिंदूंनी लढा द्यावयाचें ठरविलें तर गोष्ट निराळी. पण तो केवळ आत्मघाताचा मार्ग होय!" पण हिंदूंनी लढा दिला नाही तरी, अथवा म्हणूनच आत्मघात झाला, हें पुढच्या इतिहासाने दाखविलेंच आहे. आजहि काँग्रेस थकली आहे, म्हातारी झाली आहे. नेहरू प्रभृतींची जीं वयें १९४७ सालीं होतीं तींच आज बहुतेक काँग्रेस नेत्यांची आहेत आणि आज शिवाय काँग्रेस दुभंगली आहे. या दुहीचा सौदा करण्यासाठी फायदा घ्यावयाचा, असें जाहीरपणें मुस्लिम सांगत आहेत. तेव्हा आता दुसरी फाळणी जर टाळावयाची असेल, तर सरकारच्या मागे किंवा सर्वराष्ट्रीय एक-पक्ष स्थापून त्याच्या