पान:इहवादी शासन.pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३४ । इहवादी शासन
 

आहे ? मुस्लिमांना आपली विद्यालयें निराळीं हवीं आहेत, तेथे उर्दू माध्यम असलें पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे ! उदारमतवादी पुढाऱ्यांना हें पसंत आहे काय ?
 वरील सर्व प्रकारचे हट्टाग्रह धरणारे मुस्लिम फार थोडे आहेत, निदाये मिल्लत, दावत यांना मुस्लिम समाजांत फारसे अनुयायी नाहीत, बहुसंख्य मुस्लिम सर्वार्थाने भारतीय आहेत, असा उदारदृष्टि लोकांचा एक मुद्दा असतो. त्याचा विचार वर केलाच आहे. तेव्हा पुनरुक्ति करण्याचें कारण नाही. त्यांचें म्हणणें खरें असेल तर त्यांनी समान नागरी कायदा तत्काळ लोकसभेत संमत करून घ्यावा. त्याआधी फक्रुद्दीन अहंमद, युनुस सलीम यांच्यासह भारतांत दौरे काढून मुस्लिमांच्या हजार-दोन हजार सभा घेऊन या कायद्याला त्यांची संमति असल्याची खात्री करून घ्यावी. पर्सनल लॉमध्ये बदल करण्यास हरकत नाही, स्वतंत्र बुद्धीने धर्म-परिवर्तन करण्यास आमची मान्यता आहे, स्त्रियांना पूर्ण समानता देण्यास आमची तयारी आहे, असें या सभांत मुस्लिम जर जाहीरपणे सांगू लागले, तर सर्व हिंदु- मुस्लिम समस्याच निकालांत निघेल.
 पण ज्यांना या समस्येची प्रामाणिकपणें चिंता करावयाची आहे त्यांनी हें जाणलें पाहिजे की, उदारदृष्टि लोकांची मतें भ्रांत आहेत. इहवाद, धर्माची परिवर्तनीयता, धर्मसमानत्व, राष्ट्रनिष्ठा यांचा पुरस्कार करणारा पुरोगामी मनुष्य मुस्लिम समाजाच्या सभेंत उभा राहू शकत नाही, यावरून तेंच दिसून येईल. न्या. मू. छगला, फैजी यांसारखे कर्ते, विद्वान् मुस्लिम तेंच सांगत आहेत. हें सर्व विचारांत घेऊन भारतीय जनतेने ही भारतीय इहवादाला विरोधी असलेली प्रबळ शक्ति अनुकूल कशी करून घेतां येईल याचा स्वतंत्रपणें विचार केला पाहिजे.

प्रबोधनाची गरज

 तसा विचार करूं लागतांच विचारवंतांच्या ध्यानीं येईल की, मुस्लिम समाजांत प्रबोधन घडून आल्यावांचून, रेनासान्स, रेफर्मेशन इत्यादि युगांच्या ज्या तत्त्वामुळे युरोपीय समाज उत्कर्ष पावला तीं तत्त्वें त्या समाजांत प्रसृत्त झाल्यावांचून, बिंबल्यावाचून हिंदु-मुस्लिम समस्या सुटणार नाही, जातीय दंगे थांबणार नाहीत व ती शक्ति अनुकूल होणार नाही. या दृष्टीने सेक्युलर फोरम, मुस्लिम सत्यशोधक मंडळ, मुस्लिम प्रोग्रेसिव्ह ग्रुप, दिल्ली, यांच्या कार्याला प्रत्येक राष्ट्रीय वृत्तीच्या नागरिकाने जास्तीत जास्त पाठिंबा देणें अवश्य आहे. या संस्थांत अनेक मुस्लिम तरुण स्त्री-पुरुष सहभागी झाले आहेत व निर्भयपणे आपल्या समाजावर प्रबोधनयुगाचे संस्कार करण्याचे धाडस करीत आहेत, ही मोठी अभिनंदनीय गोष्ट आहे.
 "सत्यशोधक मंडळ व हमीद दलवाई यांचे कार्य पृथ्वीमोलाचें आहे. त्यांच्यावर हल्ला करणारे लोक जात्यंध आहेत, धर्मांध आहेत, प्रतिगामी आहेत. त्यांच्या