पान:इहवादी शासन.pdf/२४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३२ । इहवादी शासन
 

मुस्लिमेतर पुरुषांना वंद्य मानणें पाप समजतात. मग 'रामराज्य' त्यांच्या डोळ्यांत सलणार हे उघडच आहे. वास्तविक परंपराभिमानावांचून राष्ट्रनिष्ठेला अर्थ नाही.
  कलकत्त्याच्या मुस्लिम शिक्षण परिषदेत अध्यक्ष एम्. ए. एन्. हैदरी यांनी स्पष्ट शब्दांत हा विचार मांडला आहे. हिंदु-मुस्लिमांची समाईक परंपरा हा तर भारतीय राष्ट्रवादाचा, त्यांच्या मतें पाया आहे. ते म्हणतात, "चंद्रगुप्त, अशोक, वेरूळ, अजंठा, जयदेव, तुकाराम, कृष्ण, गौतमबुद्ध यांचा मुस्लिमांनी अभिमान धरला नाही, त्यांच्या तत्त्वज्ञानाचा वारसा सांगितला नाही, तर भारतीय राष्ट्रवाद संपलाच असें होईल. त्याचप्रमाणे (ताजमहाल, गोलघुमट) इत्यादि मुस्लिम कलाकृति, शेरशहा, अकबर, यांचें राजकीय कार्य व चांदबिबी, नूरजहान यांचे शौर्यधैर्य यांविषयीं हिंदूंना आत्मीयता वाटली नाही, तर भारतीय राष्ट्रवादाचा विकास न होतां त्याचा मृत्यूच ओढवेल."
 राष्ट्रीयतेचा हा विचार हिंदूंनी सर्वथैव मान्य केला आहे. धर्मक्षेत्रांत सुद्धा ज्यांनी पराकाष्ठेची सहिष्णुता दाखविली. त्यांना राष्ट्रीयतेचे हे तत्त्वज्ञान अमान्य करण्याचें कांहीच कारण नव्हतें. पण मुस्लिम समाज मुस्लिमेतर पुरुष, मुस्लिमेतर पराक्रम, कलावैभव, कर्तृत्व, हें वंद्य मानण्यासहि तयार नाही. मग ते आपलें मानून त्याचा अभिमान धरणें दूरच. त्यामुळेच गांधींचें रामराज्य म्हणजे त्यांना हिंदूकरण वाटतें. आणि महात्माजींना तें हीनाहून हीन मानतात. आणि तरीहि आपण भारतीय आहों असा त्यांचा आणि काँग्रेस-धुरीणांचा दावा आहे.

नेहरूंवरहि राग

 टिळक, पटेल व महात्माजी यांची मनें श्रद्धासंपन्न होती. त्यांची वृत्ति धार्मिक होती, म्हणून मुस्लिमांना त्यांच्याविषयी शंका. पण पंडित नेहरू हेहि मुस्लिमांचे शत्रु आहेत, त्यांनाहि इस्लाम नष्ट करावयाचा आहे, असें मुस्लिम म्हणतात. ही काँग्रेसच्या पक्षपाती नीतीची, तिच्या ऐक्य प्रयत्नांची व मुस्लिमांच्या भारतीयत्वाची खरी शोकांतिका आहे. 'निदाये मिल्लत' या पत्राच्या संपादकांच्या मतें गोळवलकर गुरुजी व नेहरू मुस्लिमांच्या दृष्टीने सारखेच आहेत. ते म्हणतात, "इस्लामी संस्कृति व मुस्लिम पर्सनल लॉ यांवर स्वातंत्र्यानंतर चौफेर हल्ले सुरू आहेत, हिंदूंचा एक गट हे हल्ले उघडपणें करतो, दुसरा गट बुद्धिप्रामाण्य, सेक्युलॅरिझम यांच्या बुरख्याआडून करतो. पहिल्या आघाडीचें नेतृत्व गोळवलकर गुरुजींच्याकडे असून, पंडित जवाहरलाल हे आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत दुसऱ्या गटाचे मुख्य होते," (साधना, पुणे १५-३-६९)
 नेहरू कालवश झाले तेव्हा कांही मौलवींनी कुराणपठण केलें. पण शम्स नवीद उस्मानी यांनी यावर आक्षेप घेऊन त्या मौलवींनी कुराणाचा अपमान केल्याबद्दल त्यांच्यावर कडक टीका केली. राष्ट्रपति झकीर हुसेन, शेख अबदुल्ला व हफीज महंमद त्या वेळीं तेथे होते. त्यांनी कुराणाची ही विटंबना सहन केली म्हणून त्यांच्यावरहि