पान:इहवादी शासन.pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । २३१
 

आहे." सरदारांच्या अशा भाषणांमुळेच महात्माजी अस्वस्थ होत असत व नेहरू संतापत असत. कांरण मुस्लिमांचा अनुनय करावा, त्यांच्या बाबतींत विषम, पक्षपाती नीति अनुसरावी असें त्यांचें धोरण होतें.

'रामराज्या'ला आक्षेप

 दीर्घकाल त्या धोरणाचा अवलंब करूनहि त्यांना मुस्लिम वश झाले काय ? मुस्लिमांची धर्मांधता, जात्यंध वृत्ति अणुमात्रहि कमी झाली नाही. 'छोडो भारत' चळवळीच्या वेळीं काँग्रेसला हिंदु राज्य स्थापावयाचें आहे, असा आरोप करून मुस्लिम लीगने ब्रिटिश सरकारला पाकिस्तान देण्याच्या अटीवर पूर्ण साह्य देण्याचें अभिवचन दिलें. २० ऑगस्ट १९४२ च्या सभेंत लीगने तसा ठरावच केला. महात्माजी भारतामध्ये 'रामराज्य' स्थापावयाचें, असें म्हणत असत. यावरच मुस्लिमांचा आक्षेप होता. त्यालाच ते हिंदु राज्य म्हणत. वास्तविक राम हा ऐतिहासिक महापुरुष. भारताच्या प्राचीन वैभवाचा मुस्लिमांना अभिमान असता, या भूमीला ते मातृभूमि मानीत असते, तर रामराज्य कल्पनेला त्यांनी पाठिंबा दिला असता.
 दरायसचा, इराणी मुस्लिम जयजयकार करतात. ॲटिल्लापासून तुर्की मुस्लिम स्फूर्ति घेतात. पिरॅमिड बांधणारांच्या स्मरणाने आमच्या रक्तांत चैतन्य येतें, असें इजिप्तचे मुस्लिम म्हणतात. तशीच रामापासून भारतीय मुस्लिमांनी स्फूर्ति घ्यावी हें राष्ट्रीयतेच्या दृष्टीने उजू आहे. त्यांचा धर्म भिन्न असला, तरी ते येथल्याच वंशाचे आहेत. १९१५ सालच्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनांत अध्यक्ष मझरउल हक्क हे स्वत:च म्हणाले की, "भारतांतील सात कोटि मुस्लिमांपैकी फक्त ऐंशी लाखांचे पूर्वज बाहेरचे आहेत. बाकी सर्व भारतजातीयच होते." तेव्हा रामकृष्ण हे आपले प्राचीन महापुरुष मानून त्यांना वंद्य मानण्यांत मुस्लिमांना कमीपणा वाटण्याचें कांही कारण नाही. कांही मुस्लिमांना हें पूर्ण मान्य आहे.
 'पाकिस्तान एक्झॅमिनड्' या आपल्या पुस्तकांत रेझाऊल करीम या बंगाली मुस्लिम लेखकाने म्हटलें आहे, "अनेक शतके आपणां मुसलमानांना या भूमीने पोसलें आहे. तेव्हा हिंदुस्थान हीच आपली मातृभूमि आहे. या भूमीचें वैभव तेंच माझें वैभव. वेद, उपनिषदें, रामायण, महाभारत, हीच माझी धनदौलत आहे. राम, सीता, अशोक, कालिदास, अमीर खुश्रु, अकबर, राणाप्रताप हीच माझी थोर परंपरा. तिचे कोणतेहि गुण असोत, कोणतेहि दोष असोत, ती माझी म्हणूनच मला प्रिय आहे. अशा वृत्तीने मुस्लिमांनाहि रामराज्य हा शब्द महात्माजींइतकाच प्रिय व्हावा. पण इहवादाचा कसलाहि संस्कार त्यांच्यावर होत नसल्यामुळे धर्म व संस्कृति यांत ते फरक करूं शकत नाहीत. धर्माची सर्वंकष सत्ताच त्यांना अभिप्रेत आहे. त्यामुळे राष्ट्र, मातृभूमि या निष्ठा त्यांना मानवत नाहीत. म्हणूनच ते