पान:इहवादी शासन.pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३० । इहवादी शासन
 

 शिवाजी उत्सवाचें हेंच आहे. प्रारंभी अनेक मुस्लिमांनी त्याला पाठिंबा दिला होता. आणि ऐक्य करावयाचें, तर त्या पुरुषांच्या राष्ट्रकार्याकडे लक्ष देऊन जुनें वैर विसरणेंच अवश्य असतें. वॉशिंग्टन, नेपोलियन हे इंग्लंडचे हाडवैरी. पण आजचे ब्रिटिश लोक त्यांचा मुक्त कंठाने गौरव करतात. त्या वेळचे डेक्कन कॉलेजचे प्रिन्सिपॉल बेन यांनी अफजुलखानवधाचा वाद निघाला असतां, "शिवाजीने जें केलें तें राष्ट्रहितासाठी केलें. मराठ्यांचें स्वातंत्र्य स्थापण्याची कामगिरी त्याला करावयाची होती, त्यासाठीच त्याने जें जें केलें तें तें सर्व योग्यच केलें" असें जाहीरपणें सांगितलें. शिवछत्रपति हे इस्लामचे मुळीच द्वेष्टे नव्हते. कुराण, मशीद यांचा त्यांनी मान राखलेला आहे, असें मुस्लिम इतिहासकारच सांगतात. अशा या महापुरुषाच्या उत्सवामुळे मुस्लिम दुरावले असा टिळकांच्यावर आक्षेप घेणें आणि तो हिंदूंनीहि घेणें हें काँग्रेसने निर्माण केलेल्या विपरीत करंट्या बुद्धीचेंच फळ होय, यांत शंका नाही. गणेशोत्सव व शिवाजी उत्सव यांत इहवादविरोधी लक्षणें दिसावीं यापरतें दुर्दैव तें काय ?
 सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर टिळकांप्रमाणेच मुस्लिमद्वेषाचा आरोप केला जातो. याचें कारण एकच. ते गांधी-नेहरूंसारखे मुस्लिम-पक्षपाती नव्हते. भारतनिष्ठ मुस्लिम व बाह्यनिष्ठ मुस्लिम यांत ते भेद मानीत होते ! आणि मुस्लिम अत्याचारांचा, आक्रमणांचा बळानेच प्रतिकार केला पाहिजे, असें स्पष्टपणें सांगत असत. लखनौच्या एका भाषणांत ते म्हणाले, "मी मुस्लिमांचा खरा मित्र आहें, पण मला त्यांचा शत्रु मानतात. कारण मी स्पष्ट बोलतों. मी मुस्लिमांना बजावतों की, भारतनिष्ठा नुसती शब्दांनी दाखवून चालणार नाही. ती कृतींत दिसली पाहिजे. तुम्ही भारतनिष्ठ होता तर सरहद्दीवरच्या टोळ्यांनी काश्मीरवर आक्रमण केलें तेव्हा निःसंदिग्ध शब्दांत तुम्ही पाकिस्तानचा निषेध कां केला नाही? ज्यांच्या मनांत अजूनहि चलबिचल असेल त्यांनी खुशाल पाकिस्तानांत जावें."
 चौधरी खलिकुझमान हे कडवे लीगवादी होते. ते पाकिस्तान झाल्यावर भारतांतच राहिले होते. एकदा लोकसभेंत त्यांनी भारतनिष्ठेचें भावपूर्ण भाषण केलें. उदार, भोळे, पंडितजी त्यामुळे इतके खूष झाले की, धांवत जाऊन त्यांनी चौधरींना मातृभूमीवर अशी निष्ठा व्यक्त केल्याबद्दल मिठी मारली. पण थोड्याच दिवसांत चौधरी पाकिस्तानांत पळून गेले व भारताचे वैरी झाले. सरदार विवेकी, अंतर्भेदी असल्यामुळे अशा मिठ्या मारीत नसत. ते म्हणाले, "पाकिस्तान स्थापणारा हा माणूस तिकडे गेला हें बरें झालें." सरदारांविषयीची ही माहिती देऊन व्ही. वी. कुलकर्णी आपल्या 'इंडियन ट्रिमुव्हरेट' या ग्रंथांत (पृष्ठे ३८६-८७) म्हणतात, "सरदारांच्या अशा भाषणांमुळे त्यांना मुस्लिमांचे द्वेष्टे मानणें हा फार मोठा अन्याय आहे. पण त्यांच्यावर तसा आरोप येतो त्याला त्यांच्या भाषणांइतकीच गांधी व नेहरू यांची त्या जमातीकडे पाहण्याची जी दृष्टि तीहि कारणीभूत