पान:इहवादी शासन.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । २२९
 

व कत्तली केल्या. हेंच लोण त्याच साली मुंबईस येऊन त्या सालीं व पुढच्या सालीं हिंदु-मुस्लिमांचे दंगे झाले. अशा दंग्यांचें स्वरूप तेव्हा जे ठरून गेलें तें, कॉंग्रेस सरकारने ब्रिटिशांचा वारसा प्रामाणिकपणे पुढे चालू ठेवल्यामुळे आजहि कायम आहे.
 मुस्लिमांनी पूर्व तयारी करून दंगा करावयाचा, अनन्वित अत्याचार करावयाचे, आधी पूर्व सूचना मिळाल्या असूनहि सरकारने संरक्षण करावयाचें नाही, मग हिंदूंना पकडावयाचें आणि शेवटीं सरकारने मुस्लिमांचा कैवार घेऊन हिंदूंवर दोषारोप करावयाचा ! लो. टिळकांनी यासाठीच मुस्लिमांवर व सरकारवर प्रखर टीका केली होती- "मुसलमान लोक शेफारून गेले आहेत व त्यांना सरकारची फूस आहे; सरकारने एकाला जवळ करून एकाला दूर न करतां सर्वांनाच सारखा बडगा दाखविला पाहिजे तसें न होईल तर मुंबईतील हिंदु लोकांनी दुसऱ्या दिवशीं केलें त्याप्रमाणे हिंदूंनाहि आपल्या हाताने आपले संरक्षण करावें लागेल. आम्ही जों जो गरिबी दाखवितों तों तों शिष्टाचार मोडल्याचा पुन्हा आमच्यावरच मुसलमान लोक व सरकार आरोप करतात. श्रीकृष्णांनी आम्हांस उपदेश केला आहे- "ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् ।"
 टिळकांच्यावर जातिद्वेषाचा आरोप येतो तो यामुळे. हिंदूंनी संघटित होऊन स्वसंरक्षणासाठी मुस्लिमांचा प्रतिकार करावा असें ते म्हणत म्हणून. आणि या कारणासाठीच ते इहवादविरोधी ! हिंदूंनी आत्मनाशाहि पत्करावा असें महात्माजी म्हणत, ते इहवादी !
 गणेशोत्सव व शिवाजी-उत्सव यांवरील आक्षेपांमागे हीच विचारसरणी आहे. हे दोन्ही राष्ट्रीय उत्सव होते व त्यांनी फार मोठी राष्ट्रीय जागृति घडवून आणली, हें आक्षेपकांनाहि मान्य आहे. मग आक्षेप कशावर ? गणेश ही हिंदु देवता आहे व शिवाजी हा हिंदु वीरपुरुष आहे. या उत्सवासंबंधीच्या टिळकांच्या लेखांतून किंवा व्याख्यानांतून मुस्लिमांच्या द्वेषाचें, इस्लामबद्दलच्या तुच्छतेचें किंवा इतर कोणत्याहि धर्माविषयी व जमातीविषयीच्या निदेचें, अधिक्षेपाचें, एक वाक्यहि कधी कोणी का दाखविलेलें नाही. मुस्लिमांना भारतीय परंपरा, भारतीय वीरपुरुष, यांचा अभिमान असता, अकबर, कबीर यांच्या उदारमतवादाविषयी त्यांना आदर असता, तर ते या उत्सवांत हौसेने सामील झाले असते आणि तशा प्रवृत्तीचे लोक सामील झालेहि.
 श्री. रामगोपाळ यांनी सोलापूर, नाशिक येथे व इतर अनेक शहरांत गणोशोत्सवांत मुस्लिम सामील झाले होते, नाशिकला तर मिरवणुकीचें नेतृत्व मुस्लिमांनी केलें होतें, इत्यादि माहिती देऊन हिंदु-मुस्लिम ऐक्याचें टिळक हे अत्यंत मोठे पुरस्कर्ते होते असें म्हटलें आहे. मुस्लिम पुढे फुटले ते सरकारी अधिकाऱ्यांच्या चिथावणीमुळे ! (इंडियन मुस्लिम्स, पृष्ठे ८७-९५).