पान:इहवादी शासन.pdf/२४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२८ । इहवादी शासन
 


जहाल पंथावर टीका

 डोनाल्ड युजीन स्मिथ यांनीहि टिळक, अरविंद, विपिनचंद्र पाल, यांच्यावर असाच आरोप केला आहे. त्यांच्या मतें रानडे व गोखले हे खरे इहवादी होते. त्यांनी धर्म व राजकारण हीं विभक्त क्षेत्र मानली होतीं. पण जहाल पंथाच्या लोकांनी मात्र पाश्चात्त्य राष्ट्रवादाचा हिंदु धर्माशी दृढ संबंध जोडून टाकला. महाराष्ट्रांत टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला व त्यांतून हिंदु संघटनेचा व ब्रिटिश-द्वेषाचा प्रचार केला. नंतर त्यांनी शिवाजी उत्सव सुरू केला. त्याचें मुस्लिमविरोधी रूप स्पष्ट होतें. बंगालमध्ये काली, दुर्गा या देवतांशीं पाल, अरविंद यांनी भारतमातेचें अद्वैत मानून त्या देवतांच्या भक्तीला नवा राष्ट्रीय अर्थ प्राप्त करून दिला. मुस्लिम यामुळे साहजिकच साशंक झाले. आणि जहालांच्या या धर्मनिष्ठ राजकारणामुळेच मुस्लिम लीगची स्थापना झाली. (इंडिया ॲज् ए सेक्युलर स्टेट, पृष्ठे ८९-९१).
 प्रा. व्ही. के. सिन्हा यांनी टिळक, अरविंद यांच्या जहाल राष्ट्रीय पक्षावर असा आरोप, अशाच शब्दांत केला आहे. ते म्हणतात, "धार्मिक भावनांच्या उद्दीपनामुळेच टिळकांना अनुयायी मिळाले. जहाल पक्षाचा राष्ट्रवाद आक्रमक व धर्माधिष्ठित होता. त्याच्या नेत्यांनी राष्ट्रीय चळवळ बहुजनांपर्यंत पोचविली हें खरें पण त्याचबरोबर त्यांनी धार्मिक राजकारणाचा घातक वारसाहि मागे ठेवला. मुस्लिम लीगची स्थापना यामुळेच झाली." (सेक्युलॅरिझम् इन् इंडिया, पृष्ठ १६, १७).
 लो. टिळकांनी गणेशोत्सव व शिवाजी उत्सव सुरू केले त्याच्या आधीच महाराष्ट्रांत मुस्लिमांच्या दंग्यांना व अत्याचारांना प्रारंभ झाला होता. मुस्लिमांच्या त्या अत्याचारी प्रवृत्तीवर कडक टीका करून हिंदूंनी संघटित होऊन तिचा प्रतिकार केला पाहिजे, जशास तसें वागलें पाहिजे, असा टिळकांनी उपदेश केला होता. टिळक मुस्लिमविरोधक ठरले ते यामुळे; आणि तेव्हापासून आजपर्यंत मुस्लिमद्वेष्टेपणाची हीच व्याख्या ठरली आहे. मुस्लिम अत्याचारी प्रवृत्तीचा निषेध करणें, मुस्लिमांच्या जात्यंधतेवर टीका करणें व हिंदूंना स्वसंरक्षण करण्यासाठी प्रतिकार करण्यास सांगणें हे जो करील तो मुस्लिमद्वेष्टा होय. तो जातीयवादी व तो इहवादविरोधी!

दंग्यांचे स्वरूप

 १८५० सालीं वैरामजी गांधी नांवाच्या पारशी गृहस्थाने आपल्या वर्तमानपत्रांत महंमद पैगंबरांचें चित्र छापले. त्यामुळे मुंबईच्या मुस्लिमांनी सर्व पारशी जातीवर हत्यार उपसून अनन्वित अत्याचार केले. १८७४ सालीं रुस्तुमभाई लालभाई या ग्रंथकाराने वॉशिंग्टन आयर्व्हिंग या अमेरिकन ग्रंथकाराच्या कांही लेखांचें भाषांतर प्रसिद्ध केलें. त्यांतील पैगंबराविषयीचा मजकूर मुस्लिमांना अपमानास्पद वाटला. त्यांनी पुन्हा पारशी जमातीवर तसेच अत्याचार केले. १८९३ सालीं जुनागड संस्थानांतील प्रभासपट्टण येथे ताबुतावरून भांडण होऊन मुस्लिमांनी देवळें पाडलीं, मूर्ति फोडल्या