पान:इहवादी शासन.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कम्युनिस्ट देश । ११
 

त्यांना पाठिंबा देऊन 'प्रवदा' पत्रांत त्यांची पत्रे व लेख छापून त्यांचा गौरव केला. तरीहि मॉस्कोपीठाचे आचार्य अलेक्सी यांनी त्यांच्यावर बहिष्कार पुकारला ! निरनिराळ्या स्त्रीपुरुषांनी, शाळेतल्या शिक्षकांनीहि आपल्या अनन्य धर्मश्रद्धेची ग्वाही देणारीं पत्रें वृत्तपत्रांकडे धाडली व त्यांनी तीं प्रसिद्धहि केलीं ! लिडा नांवाच्या शिक्षिकेने तर दहा वर्षांची शाळेतली नोकरी सोडून कॉन्व्हेंटमध्ये जाऊन जोगीण होण्याचा आपला विचार जाहीर केला. रशियन जनता धर्मरक्षणासाठी शासनाच्या प्रतिकारार्थं हळूहळ सिद्ध होत आहे, असा याचा अर्थ दिसतो (म्युनि बुलेटिन, जुलै १९६०, पृष्ठे ३६, ३७ ).
 आणि पन्नास वर्षांतील भयानक अत्याचार, जुलूम व हत्याकांडें सोसूनहि धर्माचें पुनरुज्जीवन करण्याची त्या जनतेंत धमक राहिली असेल, तर वरील अर्थ खरा आहे असें म्हणावें लागेल. रशियांत धर्माचें पुनरुज्जीवन होत आहे यांत शंकाच नाही. जॉन गुंथरचें मत वर दिलेंच आहे. सध्या सरकार धर्मपीठाला आर्थिक साह्य देत नाही. पण लोकच इतकी वर्गणी व इतक्या देणग्या देतात की, धर्मपीठाचें कार्य व्यवस्थित चालू राहण्यास प्रत्यवाय येत नाही. प्रार्थनामंदिरें नित्य भरून जातात. धर्माचार्यांच्या प्रवचनाला हजारो लोक जमतात, विवाह धार्मिक विधीने व्हावेत ही इच्छा लोकांत वाढत आहे, हे पुरावे सबळ आहेतच. पण त्यापेक्षाहि कम्युनिस्ट पत्रांनी धर्मप्रगति पाहून व्यक्त केलेला संताप हा जास्त निर्णायक पुरावा होय. 'सॉव्हेट्स्काया रोशिया' हें पत्र म्हणतें (१२-४-६३), "सध्या निरीश्वर- वादाचा प्रचार नव्या जोमाने चालू झाला आहे हें खरें; पण एकंदरीत तो निष्फल आहे असें दिसतें. भाविकांच्या चित्ताला तो अजूनहि स्पर्श करूं शकत नाही ", "आपण पन्नास वर्षे सतत मोहीमशीर असूनहि लोकांतील धर्मभावना अजूनहि नष्ट होत नाही याचें स्पष्टीकरण आपण दिलें पाहिजे," असें दुसऱ्या एका पत्राने सुचविलें आहे. एका अभ्यासकाने तर म्हटलें आहे की, "नास्तिक पंथाच्या प्रचारकांत आता पूर्वीसारखा आत्मविश्वास राहिलेला नाही. त्यांच्या ठायीं पूर्वीचा आवेश, पूर्वीची तिडीक आता उरलेली नाही. त्यामुळे धर्माचा उच्छेद कधी काळी होईल ही आशाच आता धरतां येत नाही " (म्युनिच बुलेटिन, सप्टेंबर १९६३, पृष्ठे ४४-४८).

देवधर्मापुढे शरणागति

 पण तसा आवेश असतां, तिडीक असती तरी धर्माचा उच्छेद झाला नसता. धर्माचा, ईश्वराचा, मुक्तिकल्पनेचा मृत्यूनंतरच्या अमर जीवनाचा म्हणजे या श्रद्धांचा एखाद्या देशांतून कधी उच्छेद होऊं शकेल ही कल्पनाच भ्रांत आहे. मानवाला भाकरीइतकीच देवाची गरज आहे; त्यावांचून त्याचें जीवन वैराण होईल, भकास होईल. मानवी समाज त्या श्रद्धेवांचून जगू शकणारच नाही. सेक्युलॅरिझमचा हिरीरीने पुरस्कार करणाऱ्यांनी हें सत्य मान्य करूनच पावलें