पान:इहवादी शासन.pdf/२३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । २२५
 

आणि असीरियन संस्कृतीविषयी अशीच भावना तेथील मुस्लिम जोपासतात. त्यावांचून राष्ट्रीयता फोल आहे, असें त्यांना वाटतें.
 या मुस्लिम देशांनी स्वदेशीय प्राचीन परंपरेचा अभिमान धरला व त्याबरोबरच विश्वमुस्लिमवादाचा, पॅन् इस्लामिझमचा बुद्धिपुरस्सर त्याग केला. तुर्कनेता हमदुल्ला सुब्दी १९२१ सालींच म्हणाला, "पॅन् इस्लामिझमची भाषा आता बंद करा. राष्ट्रनिष्ठा हे आमचें नवें उद्दिष्ट आहे. त्यासाठी आम्ही आमच्या जुन्या नेत्यांकडे पाठ फिरविली आहे." केमालपाशाने खिलापत नष्ट केली तेव्हा जगांतील अनेक उलेमांनी, आपणच खलिफा होऊन मुस्लिम जगताचें नेतृत्व करा, अशी विनंती त्याला केली होती. तेव्हा ती झिडकारून 'मी फक्त तुर्कस्थान जाणतों' असें परखड उत्तर त्याने दिलें होतें.

कायद्याची महती

 धर्मपरिवर्तन व सामाजिक सुधारणा या दृष्टीने त्या देशांतील नेत्यांनी केवढी क्रांति केली आहे हें त्या लेखमालिकेत सविस्तर वर्णिले आहे. ती क्रांति त्यांनी मानवकृत कायद्यांनी केली आहे. अल्लाचा कायदा हा एकच कायदा आम्ही जाणतों, असें ते म्हणत नाहीत. धार्मिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक कोणत्याहि कायद्याला हात लावणें म्हणजे इस्लामवर आघात होय, असें भारतीय मुस्लिम मानतात; तसें त्या देशांतील मुस्लिम जनता व नेते मानीत नाहीत. त्या देशांतील आधार घेउनच ए. ए. ए. फैझी यांनी हिंदुस्थानांत मुस्लिम कायद्यांत एक भार्या कायदा करण्याची वेळ आली आहे, असें सांगितलें आहे.
 ते म्हणतात, "भारतांतील मुस्लिम कायदा हा घटनेवर आधारलेला आहे. शरीयतवर नाही. तेव्हा कुराण व शरीयत यांचीं नांवें पुनः पुन्हा सांगण्यांत अर्थ नाही. भारतीय दंडविधान, कायदा करतांना धर्मशास्त्र किंवा शरीयत पाहत नाही. न्याय, समता, विवेक हेच त्याचे आधार आहेत. मोरोक्को, तुर्कस्थान. सीरिया, इराण, पाकिस्तान इत्यादि बहुसंख्य मुस्लिम देशांनी एक तर बहुभार्या पद्धति नष्ट केली आहे किंवा अत्यंत दुर्घट केली आहे. तेव्हा भारतांत एक भार्या हा नियम व्हावा व बहु-भार्या अपवाद ठरावा, या कु. सलमा क्युरेशी यांच्या म्हणण्याशी मी पूर्ण सहमत आहे." (टाइम्स, दि. २३ जून १९७०).
 पण मुस्लिम समाज छगलांप्रमाणेच फैजींनाहि मानीत नाही. फैजी यांनी अन्यत्न म्हटल्याप्रमाणे, अनेक मुस्लिम मनांतून पाकिस्तानी आहेत. (ओपिनियन, दि. १५–६–६५). त्याच पत्रांत त्यांनी पुढे म्हटलें आहे की, "मुस्लिमांचें व्यक्तित्व द्विधा झालेलें आहे. एक भाग आंतरराष्ट्रीय आहे व एक हिंदी आहे; या दोहींचा एकजीव झालेला नाही. अनेक शतकें मुस्लिम या देशाशी समरस झालेले नाहीत. तेव्हा मुस्लिमांनी प्रगतिवादी होऊन तें साधावें." पण येथेच तर सर्व वांधा आहे.
 इ. शा. १५