पान:इहवादी शासन.pdf/२३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२४ । इहवादी शासन
 

लागली. मात्र ते भ्याले नाहीत. प्रकृति ठीक होतांच ते विद्यापीठांत पुन्हा कामावर रूजूं झाले. (मो. ज्ञा. शहाणे- केसरी, दि. ८- २- १९७०). मुस्लिम समाजावर, अशिक्षित, सुशिक्षित, लीगवाले, रझाकारवाले यांवर, कोणाचें वर्चस्व आहे तें यावरून कळून येईल.
 मौ. मोदी, नदवी, मदानी, अबुल लाइस, इत्यादींचें वर्चस्व त्यांच्यावर नसतें तर काय झालें असतें ?

तसे येथे घडलें नाही

 तुर्कस्तान, इजिप्त, सिरिया, इराक, मोरोक्को इत्यादि मुस्लिम देशांतील मुस्लिमांनी आपापली राष्ट्र घडविण्यासाठी समाजांत जें आमूलाग्र परिवर्तन घडवन आणलें तें येथील मुस्लिमांनी घडविलें असतें व भारतीय राष्ट्राच्या घडणींत ते सहभागी झाले असते. त्या देशांतील मुस्लिमांनी आमूलाग्र परिवर्तन घडविलें म्हणजे काय केलें तें त्या देशांतील इहवादाचा इतिहास मागे सांगितला त्यांत आलेलेंच आहे. त्यांनी आपआपल्या देशांतील मुस्लिमपूर्व, मुस्लिमेतर प्राचीन परंपरांचा व कर्तृत्वाचा अभिमान बाळगला, त्या परंपरा व तें कर्तृत्व आपलेंच आहे व त्यापासूनच आपल्याला स्फूर्ति मिळते, असें त्यांनी जाहीरपणे सांगितलें.
 एका बाजूने हा अभिमान येतांच दुसऱ्या बाजूने इस्लाम निघून जातो, असें भारतीय मुस्लिमांप्रमाणे त्यांना वाटले नाही. कुराण, महंमद पैगंबर व इस्लाम यांचे मुस्लिम तितकेच अभिमानी आहेत. हमीद अल् अलेली (इजिप्त) म्हणाला की, "ज्यांनी पिरामिड बांधले त्यांची प्रतिभा सुप्त अग्नीप्रमाणे अजूनहि आमच्या ठायीं आहे. त्यांच्या आठवणीनेच आम्हांला स्फूर्ति येते. राम, कृष्ण, वेद, उपनिषदें, व्यास, वाल्मीकि, चन्द्रगुप्त, समुद्रगुप्त यांच्याविपयी ही भावना भारतीय मुस्लिमांत आहे काय? ते भारतीय असतील तर तशी असायला हवी.
 इराणमध्ये सध्याचा शहा हा दरायस, झर्सीस यांचा अभिमान बाळगतो. तो गादीवर आला तेव्हा लोकांनी आपण होऊन अंतःस्फूर्तीने त्याला 'आर्यमेहेर' अशी पदवी दिली व ती त्याने आनंदाने घेतली. आर्य भारतांत आले त्यापूर्वी त्यांनी इराणांत वसाहत केली होती, हें सर्वमान्य आहे. इराणचा धर्म मुस्लिम आहे तरी ते मुस्लिम व त्यांचे नेते त्या प्राचीन आर्यांचा अभिमान धरतात. न्या. मू. छगला यांच्या मतें भारतांतील मुस्लिमांनी प्राचीन भारतीय आर्यांचा असाच अभिमान धरला पाहिजे. ते म्हणतात, "मुस्लिमांनी मुस्लिम कर्तृत्वाचा अभिमान धरावाच, पण भारतीय संस्कृतीला आर्य येथे आले तेव्हापासून प्रारंभ झाला आहे, तेव्हापासूनची भारतीय संस्कृति ही आपलीच आहे, हें त्यांनी ध्यानीं घ्यावें." (कन्सेप्ट ऑफ् सेक्युलॅरिझम- टाइम्स, दि. २०-१-६५).
 भारतीय मुस्लिम छगलांची अलियावर जंग यांच्याप्रमाणेच संभावना करतात हें प्रसिद्धच आहे; पण इराकमध्ये बाबिलोनी संस्कृतीबद्दल व तुर्कस्थानांत हिटाइट