पान:इहवादी शासन.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । २२३
 

घेणें त्यांना पाप वाटतें. जिहाद पुकारून सर्व भारत जिंकून, तेथे इस्लामी शासन स्थापन करणें हें त्यांचें अंतिम उद्दिष्ट आहे.
 एक पक्ष असा आहे की, वरील विचार मुस्लिम नेत्यांनी व मुस्लिम पत्रकारांनी सांगितले असले, तरी मुस्लिम समाज त्यांच्यामागे नाही. असें जर आहे तर मुस्लिम पुरोगामी विचारवंतांना छगला, अलियावर जंग, बेग यांच्यासारख्यांना मुस्लिम समाजांत उभे कां राहतां येत नाही? असें जर आहे, तर काँग्रेस सरकार समान नागरिक कायदा कां करीत नाही? असें जर आहे, तर काँग्रेस नेते मुस्लिम समाजांत जाऊन जनतासंपर्क साधून वरील विचारांवर कडक टीका कां करीत नाहीत? यांचे उत्तर असें आहे की, तसें खरें नाही. मुस्लिम समाज अजून पुराणयुगांतच असून, त्याच्यावर वरील विचारसणीचाच पगडा फार आहे.
 जयप्रकाश नारायण किंवा रावसाहेब पटवर्धन यांना कोणी मुस्लिमद्वेष्टे म्हणणार नाही. म्हटलें तर मुस्लिम-पक्षपातीच म्हणतील. त्यांनीहि हेंच मत दिलें आहे. "भारतांतील कित्येक मुसलमान अद्यापि पाकिस्तानी कलाने वागतात आणि भारताची पुन्हा एकदा फाळणी करण्याचे त्यांचे मनसुबे आहेत," असें जयप्रकाशांनी म्हटलें आहे. (साधना, दि. १८- १०- १९६९). "भारतीय मुस्लिम समाज हा अशिक्षित व कंगाल आहे, तो कट्टर सनातनी व सुधारणाविरोधी आहे. व्यक्ति-स्वातंत्र्य स्त्री-स्वातंत्र्य, धर्म-स्वातंत्र्य या सर्वांनाच आमचे मुस्लिम बंधु इस्लामविरोधी मानतात. बहुसंख्य समाजाच्या नेत्यांना अल्पसंख्य जमातीत प्रवेश नाही, हें आपण ध्यानांत घेतले पाहिजे. आपला निराळेपणा टिकविण्यांतच अल्पसंख्य समाजाला कृतार्थता वाटते. मुस्लिम समाजांतील मुल्ला-मौलवी हे त्या समाजाचे पहिल्या क्रमांकाचे शत्रु आहेत" असे विचार रावसाहेबांनी मांडले आहेत. (राष्ट्रसेवादलपत्रिका- दिवाळी अंक, १९६७).
 'क्वेस्ट'चे संपादक अबू सय्यद आयूब यांनी हेंच मत दिलें आहे. ते म्हणतात, "मुस्लिम समाजांत प्रगति-प्रेरणा दुर्बल आहेत. मुस्लिम अजून साम्राज्य- स्वप्नांत आहेत. सर सय्यद यांचे सुधारणेचे प्रयत्न अयशस्वी झाले; मुल्ला-मौलवींनी त्यांना बुडविलें; तेंच अबुलकलम आझाद यांचें झालें." (सेक्युलॅरिझम इन् इंडिया- संपादक व्ही. के. सिन्हा, पृष्ठ १३१). सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल अलियावर जंग यांना पं. नेहरूंनी अलीगड विद्यापीठाचे कुलगुरु नेमले होते. त्या विद्यापीठाच्या आत्यंतिक धर्मवेडाला आळा घालावा हा त्यांत उद्देश होता. पण त्या दृष्टीने अलियावर जंग यांनी सुधारणेला सुरुवात करतांच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. हा हल्ला करण्यांत विद्यार्थ्यांच्या बरोबर प्राध्यापक व सीनेटचे सभासदहि होते. या हल्ल्यामुळे कुलगुरु दीर्घकाल रुग्णालयांत पडून होते.
 हैदराबादला रझाकारांनी त्यांच्यावर असाच प्रसंग आणला होता, पण त्यांतून ते निसटले. अलीगडला मात्र त्यांना आपल्या उदार धर्ममतांची जबर किंमत द्यावी