पान:इहवादी शासन.pdf/२३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१८ । इहवादी शासन
 


भीक मागून निमंत्रण

 पण काँग्रेसला मुस्लिमांची ती वृत्ति पोसावयाची आहे. म्हणून त्यांनी भारतामध्ये ती आग तर भडकूं दिलीच आणि शिवाय पॅन् इस्लामिझमच्या संवर्धनासाठीच भरलेली रावात परिषद् तिचें आमंत्रण भीक मागून मिळवून तिथे आपले प्रतिनिधि धाडले; आणि आपल्या प्रतिनिधींना तेथून परिषदेच्या नियंत्यांनी हाकलून काढलें, त्याचा विश्वव्यापक दृष्टीने अपमान मानला नाही. कारण तो अपमान मुस्लिमांनी केला होता! सर्व देशभर लोकांनी या अपमानाबद्दल संताप व्यक्त केला. पण एकाहि मुस्लिम संस्थेने रावातच्या नेत्यांचा त्यासाठी निषेध केला नाही. कारण मुस्लिम हे प्रथम मुस्लिम आहेत! मौ. महंमदअल्लींच्यापासून राष्ट्रीय मुस्लिम निःसंदिग्ध शब्दांत हे सांगत आहेत आणि काँग्रेसश्रेष्ठी त्यांच्या त्या वृत्तीला उत्तेजन देत आहेत.
 अहमदाबादला कालूपुर पेठेत एका हातगाडीवाल्याला बाजूस सारतांना पोलिसांचा धक्का लागून गाडीवरचीं पुस्तकें खाली पडली. त्यांत कुराण व इतर धर्मग्रंथ होते. तेव्हा पोलिसांनी कुराणाचा व इस्लामचा अपमान केला, असा मुस्लिमांनी ओरडा केला व पोलिसांवर हल्ला केला. सरकारने पोलिसांना गाडींतून हिंडून जाहीर माफी मागावयास लावली. पुढे बहरामपुरा या विभागांत पोलिस इन्स्पेक्टर खान यांनी देवळांत शिरून पोथीला लाथ मारली. तेव्हा त्यांना फक्त तात्पुरते कामावरून दूर करण्यांत आले. माफी वगैरे कांही नाही. अलअक्सा विषयीच्या लाखलाखांच्या मिरवणुका निघाल्या. त्यांना पूर्ण परवानगी आणि रामायणाचा अपमान झाला म्हणून नांदेडला हिंदु मिरवणूक काढणार होते. त्या मिरवणुकीवर बंदी घालण्यांत आली. 'रिलिजस लीडर्स' या पुस्तकावर मुस्लिमांनी आक्षेप घेतला. पुस्तक जप्त. टायनवीच्या लेखावर मुस्लिमांनी आक्षेप घेतला केंद्र-सरकारने लेख मागे घेतला.
 हिंदी मुस्लिमांपुढेच फक्त लांगूलचालन करावें, त्यांचीच फक्त जात्यंधता पोसावी, असें संकुचित धोरण काँग्रेस नेत्यांचें नाही. मुसलमान मग तो जगांत कोठेह असो त्याच्यापुढे लाचार व्हावयाचे, स्वाभिमान दुखावला तरी खंत मानावयाची नाही, असें भारत सरकारचें उदार धोरण आहे. इस्रायलशी भारताने कायम विरोध धरला आहे. कां? अरब राष्ट्रें त्याच्याविरुद्ध आहेत म्हणून. पाकिस्तानशीं भारताचें युद्ध जुंपलें होतें तेव्हा एकाहि अरब देशाने भारताबद्दल सहानुभूति दाखविली नाही. रावात परिषदेत भारताचा अपमान झाला तेव्हा एकाहि अरब देशाने उलट अक्षर उच्चारलें नाही. त्यांनी याह्याखानला पाठिंबा दिला व त्याच्याइतकाच भारताचा अपमान केला, पण भारताने त्याची खंत वाळगली नाही. कारण ते सर्व मुस्लिम देश आहेत! त्यांच्याशीं विरोध करणें हें हिंदी मुस्लिमांना आवडणार नाही.