पान:इहवादी शासन.pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । २१७
 

त्यांनी दंगली पेटविल्या, 'पाकिस्तान झिंदाबाद' अशा घोषणा केल्या, याबद्दल त्यांना जाब विचारला पाहिजे, असें सत्ताधाऱ्यांच्या मनांतहि आलें नाही. तरी पूर्वीच्या तेवीस दंगलींपैकी बावीस मुस्लिमांनीच सुरू केल्या होत्या, असा सरकारी अहवाल होता. पण सर्व दोष हिंदूंनाच देण्यांत आला.
 प्रा. अबीद हुसेन यांच्या 'दि नॅशनल कल्चर ऑफ इंडिया' या पुस्तकाचा मागे उल्लेख केलाच आहे. त्यांनी त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत सांगून ठेविलें आहे की, "बहुसंख्याकांनी अल्पसंख्याकांच्या तक्रारी, मग त्या खऱ्या असोत वा काल्पनिक असोत, दूर केल्या पाहिजेत. आपले हक्क सुरक्षित नाहीत ही त्यांची भीति निराधार, अन्याय्य असली तरी, बहुसंख्याकांनी तिचा विचार करून ती दूर केली पाहिजे." काँग्रेस सत्ताधाऱ्यांनी हा उपदेश शिरसावंद्य मानला आहे. जातीय संघटनांचा उल्लेख करतांना रा. स्व. संघ, जनसंघ यांचा शतवार निर्देश ते करतात, पण तामिरे मिल्लत, जमाते इस्लामी, मुशावरत यांना मातेच्या वात्सल्याने ते पदराआड करतात. मंदिर पाडणें हें योग्य आहे, पण मशीद पाडणें हा गुन्हा आहे, ही सुभेदार अलीकीनखान यांची विषम नीति महात्माजी- नेहरूंप्रमाणेच इंदिरा गांधींनीहि निष्ठेने पुढे चालविली आहे.
 देवबंद पंथ आणि मुल्ला-मौलवी यांचें वर्वस्व जोपर्यंत मुस्लिम समाजावर आहे तोपर्यंत तो समाज इहवादी होणें शक्य नाही. हे मुल्ला-मौलवीच दर वेळी मुस्लिमांना भडकावून देतात. पाकिस्तानसाठी बॅ. जिनांनी त्यांच्याच या शक्तीचा उपयोग केला आणि त्या समाजांतील असहिष्णुता, जीर्णमतवाद, अंधश्रद्धा, अराष्ट्रीय वृत्ति यांचा परिपोष केला. आज काँग्रेस- सत्ताधारी तेच करीत आहेत. त्यांच्या या नागव्या स्वार्थी नीतीचा कळस झाला तो रावात प्रकरणी. कारण राष्ट्रनिष्ठेला अत्यंत घातक असा जो विश्व-मुस्लिमवाद- पॅन इस्लामिझम्- त्याचाच परिपोष या प्रकरणी काँग्रेसने केला.
 अलअक्सा मशीद जाळली ती एका अर्धवट परकी माणसाने. इस्त्रायलचा त्यांत कांही संबंध नव्हता. तरी मशिदीच्या हानीबद्दल हिंदी मुस्लिमांना दुःख व्हावें हे साहजिक आहे. पण त्यांनी आपले दुःख व्यक्त करतांना जिहादच्या घोषणा केल्या, लाखालाखाच्या मिरवणुका काढून जात्यंध भाषणें देली आणि 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा केल्या. हें काँग्रेस नेत्यांनी ध्यानी घेऊन मुस्लिमांना त्याचा जाब विचारून या आगीला आवर घालणें अवश्य होतें. पण काँग्रेस नेतेच या मिरवणुकीच्या आघाडीवर होते! खिलाफतीला पाठिंबा दिल्यामुळे मागे मुस्लिमांची धर्मांध वृत्ति पोसली गेली आणि त्यांनी भयानक अत्याचार केले. त्याचीच पुनरावृत्ति आता होईल हें जाणून त्या वृत्तीचा बीमोड काँग्रेस सत्ताधाऱ्यांनी केला असता, तर पुढील जातीय दंगे टळले असते.