पान:इहवादी शासन.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१० । इहवादी शासन
 

पन्नास वर्षांच्या मोहिमेनंतरहि आपल्याला पराभव पत्करावा लागत आहे, याची चीड येऊन पुन्हा पाशवी बलाचा आश्रय करावा, अशी भाषा ते बोलूं लागले आहेत. आणि सरकारने त्याप्रमाणे मोहीम सुरूहि केली आहे. व्होलिनिया येथील १८० व बेलोरशिया येथील ३०० चर्चेस १९६१-६२ साली बंद करण्यांत आली. मोल्डाव्हिया येथील १४ मठांना टाळे लावण्यांत आलें.
 १९६२ पासून नास्तिक पंथाच्या अनेक परिषदा भरविण्यांत येत आहेत. त्यांत धर्माचा पुरता उच्छेद कोणत्या मार्गाने करता येईल याची चर्चा होत असते. नास्तिक पंथाच्या व त्याच्या अनुयायांच्या रक्षणासाठी कायदे जास्त कडक करावे, आईबापापासून मुलें दूर करून, घरांतल्या धर्मशिक्षणापासून व धार्मिक वातावरणापासून त्यांचा बचाव करावा, नास्तिकपंथाचे यशोवर्णन करणारे चित्रपट विपुल प्रमाणांत काढावेत, त्याच्या प्रचारास वाहिलेली वृत्तपत्रे सुरू करावीत, ग्रंथ लिहावेत असे अनेक उपाय त्या परिषदांत सुचविण्यांत आले आहेत व त्यांतील कांही अमलांतहि येत आहेत. एफ्. ओलेश्चूक या पत्रकाराने धर्माच्या पुनरुज्जीवनाबद्दल स्टॅलिनला जबाबदार धरलें आहे. तो म्हणतो, "स्टॅलिनुबद्दलची अतिरेकी भक्ति, विभूतिपूजा, निरीश्वरपंथीय संस्थांवर त्याने घातलेली बंदी, चर्च, मठ यांना दिलेले उत्तेजन यांमुळे नास्तिकपंथीयांचा आत्मविश्वास ढळला व त्यांचा शक्तिपात झाला. तेव्हा आता 'परत लेनिनकडे', 'परत यारोस्लाव्हास्कीकडे' अशा घोषणा करून उदारमतवादी सहिष्णुतेचें धोरण बदलून पुन्हा पूर्वीप्रमाणेच कठोर नियंत्रणाचा मार्ग स्वीकारला पाहिजे." सोव्हिएट शासनाला अर्थातच हें मान्य झाले आहे. धर्मनिष्ठेच्या अपराधासाठी अधिकारी व्यक्तींना बडतर्फ करण्यांत येत आहे. मुलांना धर्मशिक्षण दिल्याबद्दल पालकांना शिक्षा देण्यांत येत आहेत. धर्म म्हणजे फॅसिझम, धर्म म्हणजे क्रांतिविरोध, धर्म म्हणजे लोकघात असा घोष पुन्हा सुरू झाला आहे. आणि जुलूम, अत्याचार, दडपशाही यांची नवी लाट चढू लागल्याचे दिसत आहे (म्युनिच बुलेटिन, ऑक्टोबर १९६३ पृष्ठे ४६-४९).

व्यक्तिस्वातंत्र्याचे पडसाद

 पण आता सोव्हिएट रशियांत पूर्वीप्रमाणेच अनियंत्रित दडपशाही चालू शकेल असें वाटत नाही. साहित्य, विज्ञान, अर्थव्यवस्था या सर्वच क्षेत्रांत रशियन माणूस जरा ताठर बनूं लागल्याच्या वार्ता येत आहेत. धर्माच्या क्षेत्रांतहि त्या व्यक्तिस्वातंत्र्यवादाचे पडसाद उमटू लागले आहेत. चर्चचे अधिकारी थोडी थोडी प्रतिकाराची भाषा बोलूं लागले आहेत. अलेक्झांडर ओपिसॉव्ह, निकोलाय स्पास्की, पावेल डरमान्स्की हे लोक एके काळी धर्मगुरु होते. पण ते नंतर शासनाला जाऊन मिळाले व 'धर्मनाश हा एकच सत्यमार्ग होय,' असा प्रचार करूं लागले. शासनाने