पान:इहवादी शासन.pdf/२२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१४ । इहवादी शासन
 

निदान तुमच्या या श्रद्धा हिंदी राष्ट्राच्या घडणीला घातक आहेत, असें त्यांना जाहीरपणे सांगितलें काय?
 महात्माजी नेहमी म्हणत की, हिंदूंनी मुस्लिम जें मागतील तें द्यावें, बिनशर्त द्यावें. मुस्लिमांना विश्व- मुस्लिमवाद हवा होता, मुस्लिमांना इस्लामी कायद्याचें राज्य हवें होतें, मुस्लिमांना लोकशाही नको होती, महंमदअल्लींनी काँग्रेसच्या व्यासपीठावरून सांगितल्याप्रमाणे, मुस्लिमांना इस्लाम-दीक्षा देण्यासाठी भारताचा एक विभाग तोडून हवा होता. त्यांच्या या मागण्या जाहीर होत्या. तरी इंग्रजांनी स्वराज्यसत्ता जीनांच्या किंवा निजामाच्या ताब्यांत दिली तरी चालेल, असें शेवटच्या क्षणापर्यंत महात्माजी म्हणत असत. हिंदु-मुस्लिम ऐक्य अशक्य होऊन बसलें आहे ते यामुळे.


 जातीयवादाचा परिपोष करावयाचा, विषमनीतीचा अवलंब करावयाचा आणि हिंदु-मुस्लिम ऐक्य अशक्य करून ठेवावयाचें, हेंच धोरण स्वातंत्र्यानंतरहि काँग्रेस नेत्यांनी अखंड चालू ठेवलेलें आहे. १९५४ साली केवळ हिंदूंसाठी नागरिक कायदा करण्यांत आला. त्यावर "केवळ हिंदूंसाठी कायदा करणें ही प्रतिगामी वृत्ति आहे" अशी एका सभासदाने टीका केली. तिला उत्तर देतांना पंडितजी म्हणाले, "सर्वांसाठी तसा कायदा करण्याची वेळ आलेली नाही. त्यासाठी बरीच पूर्वतयारी करणें अवश्य आहे." प्रश्न असा येतो की, ही पूर्वतयारी करण्यास नेहरूंनी कधी प्रारंभ केला होता काय?
 आजहि गृहमंत्री यशवंतराव चव्हाण सोळा वर्षांनी समान नागरी कायद्यास विरोध करतांना, हीच सबब सांगत आहेत. याचा अर्थ असा की, काँग्रेस नेत्यांना ही पूर्वतयारी करावयाची नाही. त्यांना सत्तालोभामुळे तें धैर्य होत नाही. मागे १९३७- ३८ सालीं मुस्लिम जनतेशी संपर्क साधण्याचा काँग्रेसने निर्धार केला होता. त्यांत यश आलें नाही. पण स्वातंत्र्यानंतर तिने तो प्रयत्नहि केला नाही. कुराण कितीहि पूज्य असले, तरी तें सध्याच्या कायद्याचा आधार होऊं शकणार नाही, शरीयतमध्ये परिवर्तन करणें अपरिहार्य आहे, मुस्लिमांनी स्त्रियांना समान हक्क दिले पाहिजेत, असे विचार पंडितजींनी, न्या. मू. छगला, न्या. मू. बेग, प्रा. हबीब यांसारख्या मुस्लिमांना हाताशी घेऊन मुस्लिम समाजांत रुजविण्याचा प्रयत्न करणें अवश्य होतें. पण मुस्लिमांचीं मतें जातील या भीतीने पंडितजींनी कांही एक केलें नाही. मुस्लिमांच्या जात्यंधतेला ते खतपाणीच घालीत राहिले.
 पंडितजी इहवादी होते, विज्ञानवादी होते, बुद्धिप्रामाण्यवादी होते, पण मुस्लिमांचा प्रश्न आला की, त्यांची सर्व तत्त्वें लुप्त होत आणि मग अत्यंत प्रति-