पान:इहवादी शासन.pdf/२२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । २११
 

वरील विश्वास घालविला आहे. अशा सरकारला अमीराशी लढण्यांत मदत करणें हा गुन्हा आहे. या कारणाने भारताचा अफगाणांच्या हातून नाश झाला तरी चालेल, पण इंग्रजांना मदत करून अफगाणांच्या हातून भारताला वांचविणें यांत भारताचा स्वाभिमान विकण्यासारखें आहें." (स्ट्रगल फॉर फ्रीडम- मुजुमदार, पृष्ठ ८१३, इंडियन मुस्लिम्स- रामगोपाळ, पृष्ठ १५३). पण अमिराविरुद्ध इंग्रजांना मदत करणें हा एकच मार्ग नव्हता. "आम्ही अहिंसावादी सत्याग्रही पथके उभारून अमिरांशीं लढूं व त्याला जिहादसाठी जाऊन मिळणाऱ्या महंमदअल्लींशीं व त्यांच्या मुस्लिम अनुयायांशीं लढूं" असें महात्माजींना म्हणतां आलें असतें. पण मुस्लिमांशी लढू असें म्हणणें हें महात्माजींच्या व्रताच्या विरुद्ध होतें ! या वेळीं लाला लजपतराय, सी. एफ्. ॲण्ड्रयूज, बिपिनचंद्रपाल यांनी गांधीजींच्या त्या उद्गारावर कडक टीका केली, पण त्यांनी आपलें व्रत सोडलें नाही.
 १९२६ सालीं अब्दुल रशीद याने श्रद्धानंदांचा खून केला. त्या वेळीं महात्माजींनी त्याचा निषेध केला काय? नाही. त्यांनी त्याला 'भाई रशीद' म्हणून संबोधून त्याच्या आत्म्यासाठी प्रार्थना करण्याचे जाहीर केलें. ते म्हणाले, "त्याच्या कृत्याला तो जबाबदार नाही. जातीय द्वेष आपण चेतवितों. तो चेतविणारेच याला जबाबदार आहेत." पण महात्माजींची ही उदार मीमांसा हिंदूंच्या वेळीं टिकत नाही. १९२४ साली अर्नेस्ट डे या युरोपीय अधिकाऱ्याचा गोपीनाथ सहा या क्रांतिकारक तरुणाने खून केला. महात्माजी त्या वेळी अहमदाबादच्या अ. भा. काँग्रेस समितींत त्याचा निषेध करूं लागले. वास्तविक राजकीय नेत्यांनी ब्रिटिशांविरुद्ध चेतविलेल्या द्वेषामुळे त्याने हें कृत्य केलें होतें. तो त्याला जबाबदार नव्हता. पण हा विचार त्याच्या वेळीं गांधींनी केला नाही आणि बंगाली लोकांच्या विरोधामुळे निषेधाचा ठराव संमत होईना तेव्हा ते रडूं लागले. (काँग्रेसचा इतिहास- पट्टाभिसीतारामय्या, पृष्ठे ५१६, ४६४).

शुद्धीकरणाला विरोध

 महात्माजींचा व म्हणूनच काँग्रेसचा आर्य समाजाने चालविलेल्या शुद्धीच्या चळवळीला विरोध होता. "हे खिश्चनांचे अनुकरण आहे, हिंदु धर्मांत धर्मांतराला मान्यता नाही, या चळवळीमुळे हानीच जास्त झाली आहे" असें ते म्हणत. वास्तविक प्राचीन काळीं शुद्धि, पतितपरावर्तन हिंदु धर्मशास्त्राने मान्य केलें होतें. पुढल्या काळांत शृंगेरीच्या शंकराचार्यांनी, विजयनगरच्या माधवाचार्यांनी तिला मान्यता दिली होती. आणि पूर्वी शुद्धि नसली, तरी नवीन पायंडा पाडण्यास कोणती हरकत होती? अस्पृश्यता पूर्वी होती. ती नष्ट करावी, स्पृश्यास्पृश्यांत विवाह घडवावे, हा नवा पायंडा महात्माजींनी पाडलाच होता! पण त्यापेक्षाहि जोरात प्रश्न उद्भवतो तो असा की, महात्माजींनी धर्मांतराच्या बाबतींत मुस्लिमांवर अशी टीका कां केली नाही? कोणीच धर्मांतर घडवू नये, सर्व धर्म समान आहेत असें ते म्हणत. पण टीका फक्त हिंदूंवर करीत!