पान:इहवादी शासन.pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१० । इहवादी शासन
 

भेदनीति हेंच हिंदु-मुस्लिम संघर्षाला कारण आहे, असें ज्या काँग्रेस नेत्यांना वाटत होते त्यांनी त्या कारणाची मीमांसा त्या वेळीं तरी मुस्लिमांना ऐकविली कां? हिंदूंना त्यांनी लाखोली वाहिली, पण मुस्लिम समाजापुढे जाऊन, "सरकारच्या भेदनीतीला बळी पडून तुम्ही अराष्ट्रीय होत आहांत, या देशाचा घात करीत आहांत, द्विराष्ट्र- वादाची जोपासना करीत आहांत, हिंदु समाजावर अन्याय करीत आहांत," असें परखडपणें त्याला कधी सुनावलें का ? असें धैर्य त्यांनी कधीहि दाखविलें नाही. म्हणजे त्यांच्या मताने जें सत्य होतें त्याचेंहि प्रतिपादन त्यांनी कधी निर्भयपणें केलें नाही. त्यांचा निर्भयपणा केवळ हिंदूंपुरता होता.
 हिंदु-मुस्लिम संघर्षाची अशी भ्रांत मीमांसा मनांत असल्यामुळे काँग्रेसचे नेते मुस्लिमांच्या विघटक वृत्तीला आळा घालू शकले नाहीत. पण निदान त्यांनी त्यांच्या जातीय वृत्तीचा परिपोष तरी करावयाचा नव्हता ! पण हेंहि पथ्य त्यांनी सांभाळलें नाही. महात्माजींच्याकडे काँग्रेसचें नेतृत्व आल्यापासून म्हणजे खिलाफतीच्या चळवळीपासून काँग्रेसने मुस्लिमांच्या जहरी जातीयवादाला खतपाणी घालण्याचें एकदा धोरण अवलंबिलें तें आजतागायत तिच्या नेत्यांनी अत्यंत निष्ठेने पाळलेलें आहे.
 खिलाफतीच्या चळवळीमुळे मुस्लिमांतील सर्व धर्मांध, पिसाट, हिंसक व अत्याचारी प्रवृत्ति उफाळून आल्या व त्यांतूनच मलबारांत मोपल्यांचे अत्याचार झाले, हें मागे सांगितलेंच आहे. महात्माजींनी या अत्याचाराचा निषेध न करतां कौतुकच केलें. "त्या शूरवीर, देवभीरू मोपल्यांनी आपल्या धर्ममताप्रमाणे योग्य वाटलें तें केलें" असें ते म्हणाले. या तत्त्वाप्रमाणे जगांत कोणतेंहि कृत्य निंद्य ठरणार नाही. कारण आपापल्या धर्ममताप्रमाणे किंवा नीतिमतांप्रमाणेच सर्व लोक वागत असतात. पोपचीं क्रूर न्यायासनें पाखंडी लोकांना नरकयातना देत, त्या आपल्या धर्ममताप्रमाणेच देत. निग्रो गुलामांचा व्यापार करणाऱ्या लोकांची, तशी येशूचीच आज्ञा आहे, अशी श्रद्धा होती! सोव्हिएट रशियांत विरोधी लोकांच्या कत्तली करतात, त्या त्यांच्या मतें जगाच्या कल्याणासाठीच होत. तशी नीतीच लेनिनने सांगितलेली आहे. पण त्यांना महात्माजी निंद्य मानतात. मात्र स्त्रियांच्या, मुलांच्या, वृद्धांच्या कत्तली करणारे, बलात्कार करणारे मोपला मात्र शूरवीर आणि पापभीरू!
 हे सर्व अत्याचार खिलाफत चळवळीमुळे झाले होते. केरळ काँग्रेस समितीने तसें अहवालांत म्हटलें होतें. महात्माजींचे परम मित्र ॲण्ड्रयूज यांनी आपल्या "हें तुमच्या खिलाफत चळवळीमुळेच झालें आहे" असें स्पष्ट लिहिलें होतें. तरी काँग्रेसने "असहकारिता व खिलाफत यांचा या अत्याचारांशीं कांही संबंध नाही" असा ठराव संमत केला आणि सत्य दडपून टाकलें.
 १९२१ सालीं अफगाणिस्तानचा अमीर भारतावर चालून येणार अशी बातमी आली होती. तेव्हा महात्माजी म्हणाले, "मी एका प्रकारें अप्रत्यक्षपणें अमीराला साह्यच करीन. मी माझ्या देशबांधवांना सांगन की, ब्रिटिश सरकारने देशाचा आपल्या