पान:इहवादी शासन.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । २०९
 


इतिहासाचे अज्ञान

 १९३६ साली मुस्लिम लीगची जातीयता अगदी उघड झाली होती. राष्ट्रीय मुस्लिमांचें स्वरूपहि स्पष्ट झालें होतें. मागल्या अनेक शतकांचा इतिहासहि या वेळेपर्यंत लिहिला गेला होता. तरी "मुस्लिमांचा जातीयवाद हा आजकालचा आहे, आमच्या डोळ्यांदेखत तो उद्भवला असून, सामाजिक व आर्थिक प्रश्नांची उकल होतांच तो विरून जाईल" असें नेहरू म्हणत होते. या संबंधांत पंडितजींवर टीका करतांना आर. सी. मुजुमदार यांनी म्हटले आहे की, "नेहरूंचें हें इतिहासाचें अज्ञान आहे. महंमद गझनी, तैमूर, फिरोझ तघलख, शिकंदर लोदी, औरंगजेब यांनी जे भयानक अत्याचार केले ते कोणत्या अर्थाने आर्थिक किंवा राजकीय म्हणतां येतील?" (स्ट्रगल फॉर फ्रीडम पृष्ठ ५९०, ५९१).
 मला वाटतें इतिहासाच्या अज्ञानापेक्षा हा मार्क्सवादाचा प्रभाव आहे. सोव्हिएट रशियाच्या व चीनच्या साम्राज्याचा विस्तार पंडितजींच्या डोळ्यांदेखत होता. तरी कम्युनिस्ट हे साम्राज्यवादी असूच शकत नाहीत, अशी त्यांची दृढ श्रद्धा होती आणि तिच्यापायींच निर्धास्त राहून त्यांनी संरक्षणसिद्धताहि केली नाही. असा मनुष्य मागल्या काळांतल्या लढाया धार्मिक कारणाने झाल्या, हें कसें मान्य करणार? प्रत्येक ठिकाणीं आर्थिक प्रेरणाच प्रभावी असतात, या मार्क्सच्या वचनावर, मुस्लिमांची जशी कुराणावर, तशीच नेहरूंची व सर्व जातींच्या समाजवादी नेत्यांची दृढ श्रद्धा होती. त्यांची ही शब्दप्रामाण्यबुद्धीच भारताच्या इहवादाला घातक ठरली आहे.
 ब्रिटिशांची भेदनीति हिंदु-मुस्लिमांच्या वैराला व संघर्षाला कारणीभूत झाली असेल; पण हॉडसन् यांनी आपल्या 'दि ग्रेट डिव्हाइड' या पुस्तकांत म्हटल्याप्रमाणे "जित लोकांत भेद माजविण्याची वृत्ति मुळांत असल्यावांचून जेत्यांची भेदनीति कधीहि यशस्वी होणार नाही" (पृष्ठ १६). पण या अत्यंत सामान्य सिद्धान्ताचें काँग्रेसजनांना आकलन झालें नाही. नव्हे त्यांना तें करून घ्यावयाचें नव्हतें. ना. गोखले यांनी शत्रुत्वाची पूर्वपरंपरा, हें कारण बरोबर सांगितलें होतें. "या दोन जमातींचा वारसाच वैराच्या, शत्रुत्वाच्या परंपरेचा आहे. हा शत्रुभाव एरवी सुप्त असला, तरी अगदी क्षुल्लक कारणाने तो पेट घेतो. तेव्हा या परंपरागत शत्रुत्वाला आळा घालणें, हा उपाय होय" असें त्यांनी म्हटलें आहे. (गोखले, भाषणें- नटेसन पृष्ठ ११३६). पण अंध, शब्दप्रामाण्यवादी लोकांना या शहाण्या बोलांचा काय उपयोग?
 आज अच्युतराव पटवर्धन, जयप्रकाश नारायण यांसारखे त्या वेळचे काँग्रेस नेते अशी मीमांसा करण्यांत आमचा मोठा प्रमाद झाला, अशी जाहीर कबुली देत आहेत. पण आता हे नेते निष्प्रभ झाले आहेत. जे सत्तारूढ आहेत ते अजूनहि सत्य मान्य करण्यास तयार नाहीत. पण या संबंधांत आणखी एक विचार मनांत येतो. इंग्रजांची
 इ. शा. १४