पान:इहवादी शासन.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०८ । इहवादी शासन
 

 हिंदु-मुस्लिमांचा प्रश्न ज्यांना खरोखरच सोडवावयाचा आहे त्यांनी हें सत्य डोळ्यांपुढे ठेवूनच विचार करणें अवश्य आहे. तसा विचार आज कोणीहि करीत नाही. ही समस्या सोडविण्याची मुख्य जबाबदारी काँग्रेस सरकारची आहे. पण त्या सरकारने ब्रिटिशांची राजनीतीच पुढे चालविली आहे. नव्हे स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा काँग्रेसची तीच नीति होती.


 मुस्लिमांनी भारतावर प्रथम आक्रमण केलें तेव्हापासून आजपर्यंत, स्वातंत्र्य- प्राप्तीनंतरच्या काळांतहि तो समाज विभक्त वृत्तीचा कसा परिपोष करीत आहे, भारतीय समाजाशी एकरूप व्हावयाचें नाही हा निर्धार त्याने कसा पाळला आहे आणि भारतबाह्य मुस्लिम समाजाशी व खलिफा- सुलतानांशी संबंध ठेवून भारतीयांशीं सतत शत्रु-भाव त्याने कसा जोपासला आहे, तें मागील लेखांतून आपण पाहिले.
 अंध धर्मनिष्ठा, शब्दप्रामाण्य, जीर्णमतवाद, पाश्चात्त्य विद्येला विरोध, विज्ञान- विन्मुखता हीं सर्व इहवादविरोधी तत्त्वेंच या दुर्घटनेला कारण आहेत आणि त्या समाजांतील मुल्ला-मौलवींनी सर्वधर्म समानत्व, समता, राष्ट्रनिष्ठा, बुद्धिवाद, या इहवादी तत्त्वांची गळचेपी करून वरील तत्त्वेंच त्या समाजांत दृढमूल करून, त्याला शतकानुशतकें पोथीनिष्ठ अवस्थेतच खिळून टाकल्यामुळे भविष्यकालांतहि कांही आशेचे किरण दिसत नाहीत, हाहि विचार त्या विवेचनांत वारंवार मांडलेला आहे.
 आता प्रश्न असा येतो की, गेल्या शतकांत होऊन गेलेल्या भारताच्या नेत्यांनी व विशेषतः काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी मुस्लिम समाजांतील या इहवादविरोधी प्रवृत्तींना आळा घालण्याचा कांही प्रयत्न केला की नाही ? का प्रयत्न करूनहि त्यांना यश आलें नाही?
 या प्रश्नाचें उत्तर अत्यंत खेदजनक व उद्वेगकारक आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी मुस्लिमांच्या या प्रवृत्तींना आळा घालण्याचा प्रयत्न तर केला नाहीच, तर उलट त्याचा परिपोष करून भारताचा कायमचा घात करून ठेवला आहे.
 पहिली गोष्ट म्हणजे मुस्लिमांच्या या विभक्तवृत्तीची काँग्रेसच्या नेत्यांनी एक भ्रांत कारणमीमांसा करून तिलाच ते अंधपणें कायम चिकटून राहिले. हिंदु- मुस्लिमांच्या विद्वेषाला, मुस्लिमांच्या हिंदुद्वेषाला, ब्रिटिशांची भेदनीतीच फक्त कारणीभूत आहे, मुळांत मुस्लिमांची वृत्ति मुळीच तशी नाही व पूर्वीहि कधी नव्हती, असा कायमचा सिद्धान्तच त्यांनी करून टाकला होता. ब्रिटिशपूर्व काळांत मुस्लिमांनी हिंदूंवर सतत, आक्रमण केलें, अत्याचार केले. या दोन समाजांत अखंड संग्राम चाल होते याची कारणें धार्मिक नसून आर्थिक होती, याच मताला जवाहरलाल नेहरू शेवटपर्यंत कवटाळून बसले होते.