पान:इहवादी शासन.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । २०७
 

जिहादला- सिद्ध झालें पाहिजे, असा उपदेश मौलानांनी त्या पुस्तकांत केला आहे. (भारतीय मुस्लिम- हसनैन, पृष्ठ ६०).
 हमीद दलवाई हे पुरोगामी मुस्लिम तरुण आहेत. सर्व भारतभर मुस्लिमांत नवविचार प्रसृत करण्यासाठी ते हिंडत असतात. म्हणतात की, "मला भेटलेल्या दहा मुस्लिमांपैकी नऊ मुस्लिम तरुण सर्व भारत पुन्हा जिंकून तेथे इस्लामी राज्य प्रस्थापित करण्याचे मनोरथ बाळगून आहेत." त्यांनी असेंहि बजावून सांगितलें आहे की, ही काही मूठभर मुस्लिमांची वैयक्तिक मतें आहेत असें समजण्याची चूक आपण करूं नये. बहुसंख्य मुस्लिम समाजाची हीच विचारसरणी आहे. (मुस्लिम जातीयतेचें स्वरूप, पृष्ठे २९-३०). जमाते इस्लामीच्या 'रेडियन्स' या इंग्रजी पत्राने लिहिलें आहे की, भारतांतील सर्व लोक एका धर्माचे बनतील तेव्हाच भारतांतील धार्मिक संघर्ष संपुष्टांत येईल.
 हें उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवूनच आज मुस्लिम नेते मुस्लिमांना अभंग संघटना करा, आपलें बळ वाढवा, त्यावांचून आपल्याला जगतां येणार नाही. इस्लामचें रक्षण करतां येणार नाही, असा उपदेश करतात. तेव्हा दुसऱ्या पाकिस्तानची ही पूर्वतयारी आहे हें स्पष्ट आहे.

दंगे कां होतात ?

 भारताला स्वातंत्र्य मिळाल्याला आता तेवीस वर्षे झालीं. त्याच वेळीं मुस्लिमांना पाकिस्तान तोडून देण्यांत आलें आणि भेदनीतीचा अवलंब करून हिंदु-मुस्लिम ऐक्यावर बिब्बा घालणारे ब्रिटिश राज्यकर्तेहि येथून त्याच वेळीं निघून गेले. तरी अजून या दोन जमातींत सारखे दंगे कां होतात, असें मोठ्या विस्मयाने कांही लोक विचारतात. हे दंगे म्हणजे भारताला काळिमा आहे, असें सरकारी प्रवक्ते म्हणतात. सरकार लगेच मंत्रिमंडळाच्या मुख्य मंत्र्यांच्या, सर्वपक्षीय नेत्यांच्या सभा घेतें, समित्या नेमतें आणि दंगलीच्या कारणांचा शोध घेण्यास सांगतें. हें सर्व आता ठरीव कर्मकांड झाले आहे. कारण, खरें कारण जें आहे त्याचा उच्चारहि कोणी करीत नाही, करणार नाही.
 या दृष्टीने पाहतां मुस्लिम नेत्यांचे आपण आभार मानले पाहिजेत. त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत आपले मनोगत व्यक्त केलें आहे. राष्ट्रनिष्ठा आम्हांला मान्य नाही, लोकशाहींत आमचा नाश होईल, इहवाद हें पाप आहे, भारतीय परंपरा आमच्या मुलांना शिकवूं नका, तिच्या गौरवाने इस्लाम दूषित होईल, मानवकृत कायदा आम्ही मानीत नाही, सर्वत्र अल्लाचा- कुराणाचा कायदाच असला पाहिजे, आणि तसें घडविण्यासाठी भारतांत इस्लामी राज्याची स्थापना झाली पाहिजे.