पान:इहवादी शासन.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कम्युनिस्ट देश । ९
 

उघडपणें नव्हे, पण प्रच्छन्नपणें समर्थन करण्याच्या कार्यास जुंपावयाचें, हा होय. सत्ता हातीं येतांच क्रांतीच्या पहिल्या उन्मादांत चर्च ही संस्थाच कम्युनिस्टांनी हतप्रभ करून टाकली होती. पण १९४५ साली मॉस्को चर्चचें स्टॅलिनने पुनरुज्जीवन केलें आणि मॉस्कोपीठावर अलेक्सी या वृद्ध धर्माचार्याची नेमणूक केली. तेव्हापासून रशियांतील धर्मपीठें कम्युनिझमचा पाठपुरावा करीत आहेत. अलेक्सी तर वृद्धच आहे. पण निकोलायसारखे नवे तरुण धर्मगुरूहि "पोप हा अमेरिकन भांडवलशाहीचा दास आहे," असें म्हणून दाखवितात. जॉन गुंथर याने म्हटलें आहे की, अनेक धर्माचार्यांचीं भाषणें क्रुश्चेव्हसारखींच होतात. कदाचित् तीं त्याचीं असतीलहि" (इनसाइड रशिया, १९६२). आज मॉस्कोपीठ हे सर्वस्वीं कम्युनिस्ट पक्षाच्या म्हणजेच शासनाच्या अधीन आहे. अलेक्सी, इओयान, क्रुटिसी हे आचार्य आता अतिवृद्ध झाले आहेत. ते शांतपणें सर्व सोशीत आहेत. पण ज्या तरुण आचार्यांची नित्य नवी भरती होत असते त्यांनाहि भांडवलशाही, साम्यवाद, सहजीवन, वसाहतवाद या विषयांवर कम्युनिस्ट शासनाच्या धोरणानेच बोलावें लागतें. त्यांत कधी गलती झाली की, ते एकदम पदभ्रष्ट होतात. ते कसें बोलतात याचा एक नमुना पाहा. मॉस्कोपीठाच्या पत्रांत ए. व्हेडरनिकॉव्ह याने लिहिले आहे की, "सोव्हिएट शासनाने शांतता, शस्त्रसंन्यास यांविषयी जी योजना मांडली आहे ती कल्याणकारी व उदात्त तर आहेच, पण शिवाय बायबलमध्ये वर्तविलेल्या भविष्याशीं अगदी जुळती आहे. बायबलमध्ये म्हटलें आहे की, पुढे एक काळ असा येईल की, तेव्हा सर्व लोक आपल्या तलवारींचे नांगरफाळ करतील व भाल्यांचे विळे करतील" (१९६२, नं. १) रशियांतील शासनाची धर्मविषयक. तटस्थता या स्वरूपाची आहे.
 पण या दुसऱ्या युद्धांतहि सोव्हिएट नेत्यांना यश येईल असें दिसत नाही. जॉन गुंथरच्या मतें तर रशियांत धर्माचे हळूहळू पुनरुज्जीवन होत आहे. क्रांतिपूर्वी रशियांत ४६,००० चर्चे होतीं. १९३५ सालीं ही संख्या ४००० झाली, पण १९५६ सालीं ती पुन्हा २०,००० वर आली आहे. धर्मगुरूंची संख्याहि ५० हजारांवरून ५ हजारांवर जाऊन पुन्हा ३५ हजारांवर आली आहे. धर्मपीठे, धार्मिक पाठशाळा पुन्हा उघडल्या आहेत. खेड्यांत धर्मपद्धतीने विवाह जास्त होऊं लागले आहेत. स्टॅलिनच्या मृत्युनंतर बाप्तिस्मा घेणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. ही सर्व माहिती देऊन गुंथर म्हणतो, "धर्मनिष्ठा ही स्वातंत्र्यनिष्ठेइतकीच चिवट आहे. ती कधीच नष्ट करता येणार नाही" ( इन्साइड रशिया, पृष्ठे ३६७-७०).

सोव्हिएट नेत्यांचा संताप

 या सर्वांमुळे सोव्हिएट नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा व सश्रद्ध भाविक कम्युनिस्टांचा अत्यंत संताप होत आहे. धर्म नष्ट करण्याच्या आपल्या प्रतिज्ञा फोल होत आहेत