पान:इहवादी शासन.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । २०५
 

सांगितलें. यावर कायद, दावत, निदाये मिल्लत या मुस्लिम पत्रांनी नुसती आग पाखडली. कुराणप्रणीत कायद्यांत एका अक्षराचाहि बदल केलेला आम्हांला चालणार नाही, तसें करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याला आमच्या प्रेतावरच त्या कायद्याची अंमलबजावणी करावी लागेल, अशी भाषा त्यांनी केली.
 लोकशाहींत जनतेचें सार्वभौमत्व गृहीत धरलेलें असतें. कायदे करण्याचे अधिकार जनतेला असतात. पण हेंच मुस्लिमांना मान्य नाही. कायदा हा कुराणांतलाच असला पाहिजे, मनुष्यकृत कायदा हा निश्चित अधःपाताला कारणीभूत होतो, असें त्या समाजाचें मत आहे. शिवाय जनतेमध्ये इतर धर्मांचे लोक येतात. त्यांनी केलेले कायदे मुस्लिमांनी मान्य करणें हा त्यांचा अपमान आहे, असें त्यांना वाटतें.
 समतेला त्यांचा विरोध आहे तो या कारणासाठीच आहे. मुस्लिम समाजांत स्त्रियांची स्थिति शोचनीय आहे, असें इक्बाल यांना मान्य होते. पण अल्लाच्या आज्ञेपुढे इलाज नाही, असें ते म्हणतात. आज मुस्लिम समाजांत स्त्रियांच्या समान हक्कांची चळवळ सुरू झालेली आहे. तिला सुशिक्षित मुस्लिमहि केवढा तीव्र विरोध करीत आहेत हें पाहिलें म्हणजे लोकशाही या भारतीय मूल्याविषयी त्या समाजाला काय वाटतें तें ध्यानांत येईल.
 भारतीय घटनेचें तिसरें महातत्त्व म्हणजे इहवाद. मुस्लिम नेते इहवाद म्हणजे धर्महीनता असेंच मानतात. त्यामुळे भारताने आदराने स्वीकारलेल्या या तत्त्वांवर ते अत्यंत विषारी टीका करतात. बुद्धि, अनुभव, प्रयोग, तर्क, इतिहास यांच्या आधारे समाजाचे कायदे करावयाचे, समाजाच्या उत्कर्षापकर्षाची चिकित्सा करावयाची, आणि त्यांतून निघणारे निष्कर्ष वंद्य मानावयाचे असें इहवादाचें तत्त्वज्ञान आहे. पण कुराणापलीकडे एक अक्षरहि जाण्यास ज्यांची तयारी नाही ते या तत्त्वज्ञानाला कशी मान्यता देणार ?

इहवादावर राग

 सय्यद वद्रुदुजा यांनी लोकसभेचे सभासद असतांना लोकसभेंतच इहवादाच्या तत्त्वावर भडिमार केला (दि. २८-४-१९६६). ते म्हणाले, "इहवाद ही शुद्ध फसवणूक आहे, जाळें आहे, तो गुन्हाच आहे. इहवाद म्हणजे ढोंग, भ्रष्टता. अनाचार, लाच, वशिला, पाप, घाण– म्हणजे इहवाद. इहवाद म्हणजे नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर अतिक्रमण, मुस्लिमांचें शोषण, मुस्लिमांचा घात." जमाते इस्लामीचे प्रमुख अबुल लाइस यांनी इहवादावर असेंच गरळ ओकलें आहे. लोकशाही म्हणजे बहुदेवतापूजन असून इहवाद म्हणजे धर्माचा नाश करणारें विष आहे, असें ते म्हणतात. इहवादाविषयी अशी दृष्टि असल्यामुळे अर्वाचीन काळच्या समाजधुरीणांनी हितप्रद ठरविलेल्या प्रत्येक गोष्टीला मुस्लिमांचा विरोध असतो. रक्त-