पान:इहवादी शासन.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०४ । इहवादी शासन
 

तत्त्वें ध्येयरूपाने स्वीकारली आहेत आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या घटनेत त्यांचा समावेश केलेला आहे. सर्वधर्मसमानत्व, लोकशाही, इहवाद आणि राष्ट्रवाद हीं त्यांतील प्रमुख तत्त्वे आहेत. मुस्लिम समाज हीं तत्त्वें शिरसावंद्य मानतो काय, हें पाहून तो समाज भारतीय झाला आहे की नाही, भारतीय जनतेशी एकरूप झाला आहे की नाही, याचें उत्तर सहज मिळू शकेल.
 सर्वधर्मसमानत्व हें भारताचे पहिले तत्त्व होय. आज जगांतल्या सर्व मुस्लिम राष्ट्रांनी सुद्धा तें स्वीकारलेले आहे. हिंदी मुस्लिम समाज या तत्त्वाला मान्यता देतो काय ? मौ. अबुल कलम आझाद यांना हे तत्त्व मान्य होतें. त्यांनी कुराणावर स्वतंत्र भाष्य लिहून या तत्त्वाचा पुरस्कार केला आहे. सर्व धर्मांचे धर्मग्रंथ पूज्य मानणें म्हणजे खरा इस्लाम, असें ते म्हणत. पण त्यांना मुस्लिम उलेमा गुन्हेगार मानतात. माजी राष्ट्रपति डॉ. झकीर हुसेन यांची मतें आझादांसारखीच होती. एक सर्वधर्मी पूजागृह बांधून त्यांत सर्व धर्मीयांनी एकत्र प्रार्थना करावी अशी सूचना त्यांनी केली होती. आपापल्या धर्माच्या उपासनेने सर्वांनाच मोक्ष मिळेल असें त्यांचे मत होतें. याचा देवबंद पंथाचे तज्जली हें जें मुखपत्र, त्याचे संपादक अमीर उस्मानी यांना फार संताप आला. मूर्ख, कमअस्सल, व्यवहारशून्य अकबरासारखेंच डॉ. झकीर हुसेन कुराणाला आव्हान देत आहेत, अशी त्यांनी टीका केली आहे. (केसरी, दि. २७-२-६९ आर. डी. देशपांडे.)
 नेहरूंच्या निधनानंतर 'दावत' या पत्राने (दि. २०-६-६४) लिहिलें होते की, नेहरू कलमा पढत नसत. तेव्हा त्यांच्या आत्म्याला मोक्ष मिळणे शक्य नाही. मौदुदी स्वतः व ते पाकिस्तानात गेल्यानंतर मागे राहिलेले त्यांचे नदवी, मदनी, लाइस वगैरे शिष्य यांचा असा अखंड प्रचार चालू असतो. प्रत्येकाने आपापला धर्म श्रेष्ठ मानावा यांत कांहीच वावगे नाही, पण इतर धर्मीयांना व धर्मांना त्यांनी तोच मान देणें समाजाच्या एकात्मतेच्या दृष्टीने अवश्य असतें. पण इस्लामप्रमाणेच इतर धर्महि आपापल्या अनुयायांना मोक्ष देण्यास, सन्मार्ग दाखविण्यास समर्थ आहेत, हें मुस्लिम मुल्ला-मौलवी उलेमा व त्यांचेच वर्चस्व असलेला मुस्लिम समाज कदापि मान्य करणार नाही. भारतीय घटनेचे सर्वधर्मसमानत्व हे महत्त्वाचें तत्त्व आहे. मुस्लिमांना तेच मान्य नाही.
 लोकशाही या तत्त्वाचें असेंच आहे. व्यक्तिस्वातंत्र्य आणि समता हीं लोकशाहीचीं आद्य तत्त्वें होत. सर्वांना समान नागरी कायदा हें तितकेंच महत्त्वाचें तत्त्व आहे. पण समान नागरी कायदा म्हणजे इस्लामचा नाश असें मुस्लिम मानतात. न्या. मू. गजेंद्रगडकर यांनी अलीगड विद्यापीठांत दीक्षान्त भाषण केलें. त्यांत नवे कायदे करावयाचे ते सामाजिक आधार घेऊन करावे, कुराणाचा आधार घेऊन नव्हे, या बाबतींतले निर्णय बुद्धिप्रामाण्याच्या कसोटीला व वैज्ञानिक दृष्टीला उतरणारे असले पाहिजेत, मग कुराणांत कांहीहि म्हटलेलें असो, असें त्यांनी