पान:इहवादी शासन.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । २०३
 

स्फूर्ति घेतो. इस्लामी तत्त्वाच्या हें अगदी विरुद्ध आहे." (इस्लाम इन्ं इंडियाज् ट्रँझिशन, करंदीकर, पृष्ठ २३२-३३)
 राम, कृष्ण या देवतांचीं चरित्रे पढून मुस्लिम मनें दूषित होतात, तेव्हा पाठ्य- पुस्तकांत तीं असतां कामा नयेत, असें मुस्लिमांचें मत आहे. महात्माजींच्याबद्दल मौ. महंमदअल्ली काय म्हणाले तें वर दिलेंच आहे. पं. नेहरूंच्या निधनानंतर कांही मौलवींनी कुराण- पठण करून मशिदींत प्रार्थना केल्या. देवबंदचे मौलाना तायब यांनी त्यासाठी त्यांचा निषेध केला. हा कुराणाचा अपमान आहे, असें ते म्हणाले. ('दावत' २०–६–१९६४).
 स्वातंत्र्यानंतरच्या काळांतहि भारतांत मुस्लिम कोणत्या वृत्तीची जोपासना करीत आहेत तें यावरून कळेल. भारताच्या प्राचीन परंपरेचा अभिमान धरणें, हिंदु थोर पुरुषांना मान देणें, येथल्या पवित्र नद्यांची स्तोत्रें गाणें, संस्कृतचें अध्ययन करणें यांत इस्लामचा घात आहे असें त्यांना वाटतें आणि म्हणूनच रेडियन्स, दावत, निदाए मिल्लत इत्यादि पत्रें "भारत सरकार इस्लामचा समूळ नाश करण्याचा प्रयत्न करीत आहे, काँग्रेसमधील हिंदु नेत्यांना मुस्लिम समाज नष्ट करावयाचा आहे," असा धडाक्याने प्रचार करीत असतात.
 पॅन् इस्लामिझमच्या तत्त्वापासूनहि हिंदी मुस्लिम अणुमात्र ढळलेले नाहीत. त्यामुळे मुस्लिमेतर भारतीयांपेक्षा भारतबाह्य मुस्लिम त्यांना जवळचे वाटतात. अलअक्सा प्रकरण, पॅलेस्टाईन दिन, राबात परिषद् यांवरून हें स्पष्ट होईल. जागतिक इस्लामी संपर्क परिषदेत भाषण करतांना सय्यद अबुल हसन नदवी म्हणाले, "पॅलेस्टाईन दिनाच्या सर्व हिंदुस्थानांत ज्या सभा झाल्या, निदर्शनें झालीं, मिरवणुका निघाल्या त्यांवरून पुन्हा एकदा हें सिद्ध झालें की, हिंदुस्थानचा मुसलमान बाहेरच्या इस्लामी दुनियेपासून वेगळा राहूं शकत नाही. हिंदुस्थानांत अनेक वर्षांत इस्लामी सामुदायिक भावना एवढ्या मोठ्या प्रमाणांत व्यक्त झाल्या नव्हत्या." ('साधना', दि. २९-११-६९).
 "इस्रायलने अरबांचा जो पराभव केला तो उभ्या जगांतल्या मुस्लिमांचा पराभव होय" असें प्रतिपादन मौ. नदवी यांनी 'दावत' या पत्रांतील लेखांतून केलें आहे. अरबांनी सर्व जग जिंकून इस्लामचा झेंडा जगाच्या कानाकोपऱ्यांत फडकवावा, अशी त्यांची मनीषा असून हें कसें साध्य करावें हेंहि त्यांनी या लेखांत सांगितलें आहे.
 भारतीय जीवनाशी समरस होणें म्हणजे काय, मुस्लिम हे भारतीय झाले, भारतीय समाजाशी एकरूप झाले असें केव्हा म्हणतां येईल, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. ते भारतीय झालेलेच आहेत, त्यांनी तसें झालें पाहिजे असें म्हणणें म्हणजे एका मोठ्या जमातीचा अपमान करण्यासारखें आहे, असेंहि काँग्रेसचे निवडणूकनिष्ठ नेते अलीकडे म्हणूं लागले आहेत. पण हा प्रश्न गूढ आहे, बिकट आहे असें नाही. स्वातंत्र्य- पूर्वकाळापासून भारताच्या सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी व विशेषतः काँग्रेसने कांही