पान:इहवादी शासन.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०२ । इहवादी शासन
 

मे १९४८ च्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनांत पुन्हा हीच मागणी करण्यांत आली. १९४९ सालच्या मद्रासच्या सभेंत व १९५३ साली स्थापन झालेल्या ऑल इंडिया मुस्लिम जमियतच्या सभेंत याच मागण्यांचा, जळजळीत विषारी भाषेंत पुनरुच्चार करण्यांत आला.
 मौ. सय्यद अबुल हसन नदवी हे जमाते इस्लामीचे एक प्रमुख कार्यकर्ते आहेत. मौ. मौदुदीचे ते पट्टशिष्य म्हणून गणले जातात. 'इस्लाम ॲण्ड दि वर्ल्ड' या आपल्या पुस्तकात त्यांनी निःसंदिग्ध शब्दांत सांगितलें आहे की, "इस्लाम हा मानव जातीचे दोनच विभाग मानतो. सत्यप्रिय व अल्लाचे सेवक हा एक व इतर धर्मीय सर्व सैतानांचे अनुयायी व असत्याचे पुरस्कर्ते हा दुसरा. या दुसऱ्या विभागाशीं इस्लामने कायमचें युद्ध पुकारलेलें आहे. मग हा विभाग कोणत्याहि वंशाचा वा राष्ट्राचा असो." तेराव्या शतकांतील मुस्लिमांचीच ही वृत्ति आहे. मुस्लिमेतर हे सर्व इस्लामचे शत्रु आहेत, त्यांच्याशीं सहजीवन अशक्य आहे असें ते मानतात.

वेगळेपणाचा आग्रह

 मुस्लिमांना भारतीय जीवनाशीं एकात्म व्हावयाचें नाही, त्यांना येथल्या इतर जमातींशीं समरस व्हावयाचें नाही, हें मुस्लिमांना स्वतंत्र शिक्षणसंस्था हव्या अशी जी त्यांची मागणी आहे तीवरून स्पष्ट होतें. त्यांना नुसत्या शिक्षणसंस्था स्वतंत्र, निराळ्या हव्या असें नाही, त्या संस्थांत पाठ्यपुस्तकें निराळीं हवीं, शिक्षक मुस्लिम हवे, माध्यम उर्दू हवें. हिंदी पुस्तकांत संस्कृत शब्द येतां कामा नयेत, आणि हिंदु देवदेवतांचें, हिंदु पुराणांतील घटनांचें वर्णन असलेले धडे मुस्लिमांना नेमण्यांत येऊ नयेत अशा मुस्लिमांच्या मागण्या आहेत. जुलै १९६९ मध्ये मुरादाबाद येथे इस्लामी धर्मशिक्षण परिषद् भरली होती. तींत या मागण्या आग्रहाने मांडण्यांत आल्या. ('साधना', पुणे, दि. ३०-८-६९).
 मौ. मौदुदींच्या भाषणावरून व लेखांवरून याच्या मागची भूमिका स्पष्ट होईल. मौदुदी राष्ट्रवादाचे कडवे विरोधक आहेत. राष्ट्रनिष्ठा हें ते पाप समजतात. त्याचें मुख्य कारण हें की, राष्ट्रनिष्ठेमुळे त्या त्या राष्ट्रांतील मुस्लिमेतर प्राचीन परंपरांविषयी मुस्लिमांच्या मनांत आदर निर्माण होतो. मुस्लिमेतर राष्ट्रीय पुरुषांना मुस्लिम हा मान द्यायला लागतो. 'नॅशनॅलिझम ॲण्ड इंडिया' या आपल्या लेखांत त्यांनी आपला हा आक्षेप मांडला आहे. ते म्हणतात, "इजिप्शियन माणूस राष्ट्रवादी झाला की, तो प्राचीन फरोहांचा अभिमान बाळगू लागतो. तुर्की आपल्या भाषेवरचें अरबी वर्चस्व नष्ट करूं पाहतो व तुर्कस्थानच्या मुस्लिम पूर्व इतिहासाचा म्हणजेच अज्ञानयुगाचा आत्मीयतेने विचार करूं लागतो. हिंदी माणूस राष्ट्रवादामुळे वेदकाळांत जाऊं लागतो व गंगा-यमुनांचीं स्तोत्रें गाऊं लागतो. राष्ट्रवादामुळे मनुष्य पैंगंबरांच्यापासून स्फूर्ति घेण्याच्याऐवजी आपल्या देशांतल्या राष्ट्रपुरुषांपासून