पान:इहवादी शासन.pdf/२१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । २०१
 

स्थापन झाली होती. मौ. अबुल लाइस हे १९६४ साली तिचे प्रमुख होते. मजलिस मुशावरतच्या वरील बैठकीच्या वेळीं जमाते इस्लामीचे हे अध्यक्ष हजर होते. त्यांनी मुस्लिमेतरांशीं सहकार्य करावें, अशा अर्थाचें भाषण केलें होतें व पत्नकावर सही पण केली होती. पण दोन-तीन आठवड्यांतच मौ. लाइस यांचें मत फिरलें. त्यांनी पत्नक काढून "भिन्न धर्मीयांची संयुक्त आघाडी करण्याचें धोरण जमाते इस्लामीच्या तत्त्वाशीं विसंगत आहे" असें जाहीर केलें आणि दोन जमातींच्या सहकार्याचा विचार मुळांतच खुडून टाकला. या वेळीं हिंदु पुढाऱ्यांनी ही कल्पना मोठ्या उत्साहाने मान्य केली होती. पण आश्चर्याची गोष्ट अशी की, मौ. अबुल लाइस यांनी विरोध दर्शवितांच पत्रकावर सह्या करणारे इतर मुस्लिम पुढारीहि स्वस्थ बसले.

मुस्लिम लीगची प्रतिकृति

 याचा अर्थ असा की, मजलिस मुशावरत ही संस्था जमाते इस्लामीच्या पूर्णपणें आहारीं गेली. यासंबंधी लिहितांना 'उर्दू प्रेस' चे संपादक श्री. हसनैन लिहितात की, "हिंदी मुस्लिमांच्या दुर्दैवाने जमाते इस्लामीने मुशावरतवर पूर्ण ताबा मिळविला. जमातच्या दुष्ट प्रभावामुळे मुशावरतने आपल्या उच्च ध्येयांना तिलांजलि दिली. परिणामतः मुशावरत ही विभाजनपूर्व मुस्लिम लीगची प्रतिकृति झाली." (भारतीय मुस्लिम, दि. २९-९-६७) मार्गदीप, दावत इत्यादि मुस्लिम पत्रांनी मुशावरतच्या शिष्टमंडळांत कोणाहि हिंदूंचा अंतर्भाव होता कामा नये असा इशाराच देऊन ठेवला होता.
 हिंदु-मुस्लिम सहकार्याचा सातशे वर्षांचा असाच इतिहास आहे. कांही मुस्लिमांना मधून मधून या दोन जमातींचें सहकार्य व्हावें, भारतांत एकात्म समाज निर्माण व्हावा असें वाटतें. ते प्रयत्न करतात, संस्था स्थापतात, लेख लिहितात, काव्यें करतात पण अल्पावधीतच धर्मांध उलेमा व त्यांच्या संस्था हे प्रयत्न उधळून लावतात. "भारतीय समाजाशी केव्हाहि एकात्म व्हावयाचें नाही" हा मुस्लिम नेत्यांचा निर्धार कायम होतो आणि अखिल भारतीय मुस्लिम जनतेवर त्याचें वर्चस्व प्रस्थापित होतें.
 वरील घटना फाळणीनंतरची आहे. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यावर मागे राहिलेल्या मुस्लिम समाजाच्या मनोवृत्तीची ती द्योतक आहे. गेल्या वीस-बावीस वर्षांतली हिंदी मुस्लिम समाजाची विचारसरणी काय आहे तें समजून घेण्याच्या दृष्टीने तिचें महत्त्व फार असल्यामुळे येथे ती सविस्तर दिली आहे.
 बॅ. जिनांनी १९४७ साली पाकिस्तानांत जातांना चौधरी खलिकुझमान यांच्याकडे मुस्लिम लीगचें नेतृत्व सोपवून मागलीच परंपरा पुढे चालविण्याचा आदेश त्यांना देऊन ठेवला होता. त्याप्रमाणे त्यांनी भारताच्या घटना समितींत मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ व सरकारी नोकऱ्यांत राखीव जागा यांची मागणी केली.