पान:इहवादी शासन.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । १९९
 

वर्षापूर्वीच अलीगडला विद्यार्थ्यांपुढे बोलतांना "लीगने तुम्हांला मुल्ला-मौलवींच्या शृंखलांतून मुक्त केलें आहे, ते प्रतिगामी, जीर्णवादी आहेत, ते स्वार्थी आहेत, समाज- द्रोही आहेत" असें त्यांनी सांगितलें होतें. पण मुस्लिम जनतेला जिंकावयाचें, तर त्या मौलवींनाच शरण गेलें पाहिजे, असें वर्षानंतर त्यांच्या ध्यानीं आलें. तेव्हा प्रचारार्थ त्यांची योजना करून मुस्लिम जनतेंत त्यांनी विभक्त वृत्ति दृढ करून टाकली. त्याच वेळीं (१९३८) जरूर तर अत्याचारी मोहिमा- डायरेक्ट ॲक्शन- काढून कत्तली, जाळपोळ, लूट, विध्वंस करूनहि पाकिस्तान मिळवावयाचें, असाहि ठराव लीगने करून टाकला आणि त्यासाठी 'मुस्लिम लीग स्वयंसेवक पथक', 'मुस्लिम नॅशनल गार्ड', 'खाकसार', अशा हजारो तरुणांच्या संघटना स्थापन केल्या आणि शेवटीं मुल्ला-मौलवींच्या वाणीचें बळ व या संघटनांचें अत्याचारी बळ या दोन बळांच्या साह्याने जिनांनी व लीगने पाकिस्तानचें स्वप्न प्रत्यक्षांत आणलें.
 पाकिस्तानला हिंदुस्थानांतील बहुसंख्य मुस्लिमांनी पाठिंबा दिला असला तरी त्यांच्यांत एक गट असा होता की ज्याचा पाकिस्ताननिर्मितीला कडवा विरोध होता. राष्ट्रीय मुस्लिमांचें हें विवेचन या गटाचें स्वरूप पाहिल्यावांचून पुरें होणार नाही. हा गट म्हणजे देवबंद पंथ होय. प्रारंभापासूनच ब्रिटिश सत्तेला देवबंदपंथाचा विरोध होता हें वर सांगितलेच आहे. त्यामुळे हिंदूंशी स्वराज्याच्या चळवळींत सहकार्य करावें असें तेव्हापासूनच त्यांचें प्रतिपादन असे. पण याचा अर्थ असा नव्हे की, येथपर्यंत मुस्लिमांचें जें विभक्ततेचें तत्त्वज्ञान सांगितलें तें या पंथाला मंजूर नव्हतें. प्रारंभी हा पंथ ब्रिटिश साम्राज्यविरोधी असला, तरी तो भारत राष्ट्रवादी नसून तुर्की साम्राज्यवादी होता. सर सय्यद व अलीगड हे प्रारंभीं तुर्क खलिफाच्या विरुद्ध होते, म्हणून देवबंदचे व त्यांचें वैमनस्य होते. आता पाकिस्तानला त्यांचा विरोध होता तोहि हिंदु-मुस्लिमांचें एकराष्ट्र घडविण्याच्या उद्देशामुळे नसून, भारतांतील सर्व हिंदूंना इस्लामदीक्षा देण्याची संधि त्यामुळे हातची जाईल, या भीतीमुळे होता. सर्व हिंदुस्थान ग्रासण्याची आकांक्षा बाळगणाऱ्यांना त्याचा एक तुकडा मिळाल्याने कसें समाधान होणार ?

इस्लामचा कच्चा माल

 मौ. मदानी या देवबंदपंथीयांनी त्या पंथाचें हें मनोगत स्पष्ट शब्दांत सांगितलें आहे. त्यांचें म्हणणें असें की, हिंदु हा इस्लामचा कच्चा माल आहे. त्यांचें धर्मांतर घडवून सर्व हिंदुस्थान इस्लाममय करण्याचा मुस्लिमांना हक्क आहे. हा विशाल हक्क एका कोपऱ्यापुरता मर्यादित करणें इस्लामच्या दृष्टीने योग्य नाही. शिवाय पाकिस्तान खरें इस्लामी शासन होणार असतें तर गोष्ट निराळी होती. पण लीगचे जीना प्रभृति नेते हे खरे मुस्लिम नाहीतच. ते केमालपाशाचे अनुयायी आहेत. त्यांची