पान:इहवादी शासन.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९८ । इहवादी शासन
 

 १९२५ सालापासून एका बाजूस पाकिस्तानचा जाहीर घोष व दुसऱ्या बाजूस अतिरेकी मागण्या असें दुधारी राजकारण मुस्लिमांनी चालविलें होतें. मुस्लिम बहुसंख्य असलेले नवीन प्रांत निर्माण करणें, त्या प्रांतांतून मुस्लिम प्रतिनिधींना हुकमी बहुमत असणें, दरेक प्रांताला जास्तीत जास्त स्वायत्तता देणें, मध्यवर्ति सरकारकडे कमीत कमी खातीं असणें, मध्यवर्ती कायदेमंडळांत मुस्लिमांना एक-तृतीयांश प्रतिनिधित्व देणें, मुस्लिम प्रतिनिधींनी आपले एक तृतीयांश मंत्री नेमणें, सरकारी नोकऱ्यात मुस्लिमांना लोकसंख्येपेक्षा जास्त प्रमाणांत जागा देणें, अशा चढत्या मागण्या मुस्लिम नेते मांडीत होते. त्या सर्वांना राष्ट्रीय मुस्लिमांचा पाठिंबा होता. १९४० नंतर मध्यवर्ती सरकारांत पंचेचाळीस टक्के हिंदु प्रतिनिधि व पंचेचाळीस टक्के मुस्लिम प्रतिनिधि असावेत अशी मागणी आली.
 १९४६ सालीं मौ. आझादांनी (!) भारत हें संघराज्य असावें, केंद्राच्या हातीं फक्त संरक्षण, दळणवळण व परराष्ट्र धोरण एवढ्यापुरतेच अधिकार असावेत व शेषाधिकार राज्यांना असावेत अशी योजना मांडली होती आणि हे मौ. आझाद शेवटपर्यंत राष्ट्रनिष्ठ मुस्लिम म्हणून गौरविले जात होते.
 १९३० सालीं पाकिस्तानचा पहिला उद्घोष, ज्या इक्बालांचा राष्ट्रीय मुस्लिम म्हणून फार मोठा गौरव झाला होता त्यांनी केला. त्यांचें एक कवन राष्ट्रगीताच्या पदवीला गेलें होतें. पण इक्बालांनी १९०५ सालापासूनच राष्ट्रवादाचा त्याग केला होता. १९०९ साली हिंदु-मुस्लिमांच्या एकत्र सभेला जाण्याचें नाकारून त्या दोघांचें एक राष्ट्र होणें अशक्य आहे असें त्यांनी सांगितलें होतें. पाकिस्तानची मागणी मांडताना त्यांनी कारण असें दिलें की, मुस्लिमेतरांनी केलेले कायदे मानणें मुस्लिमांना शक्य नाही ! बॅ. जिना हे सर्वांत श्रेष्ठ राष्ट्रीय मुस्लिम नेते. लीगच्या लाहोर अधिवेशनांत त्यांनीच प्रथम पाकिस्तानची रीतसर मागणी केली. हिंदू व मुस्लिम यांचें एक राष्ट्र अशक्य आहे, हें त्या आधी सारखे सांगत आले होते.
 १९३७ साली निवडणुका झाल्या त्यांत मुस्लिम लीगचा अगदी लाजिरवाणा पराभव झाला. सिंध, वायव्य सरहद्द आदि मुस्लिम बहुसंख्य प्रांतांतहि लीगला बहुमत मिळाले नाही. त्यामुळे बहुसंख्य मुस्लिम काँग्रेसच्या मागे आहेत असा आभास निर्माण झाला. पण हे आव्हान जिनांनी व लीगने स्वीकारलें आणि पुढील पांच-सहा वर्षांत लीगच्या शेकडो शाखा स्थापून त्यांच्या तर्फे मुल्ला-मौलवींना खेडोपाडीं धाडून काँग्रेस व हिंदु यांच्याविरुद्ध इतका विषारी प्रचार केला की, १९४५ च्या निवडणुकांत पंचाण्णव टक्के मुस्लिमांनी पाकिस्तानच्या बाजूने मतें दिली.
 काँग्रेसला हिंदु राज्य स्थापावयाचें आहे, इस्लाम नष्ट करावयाचा आहे, ज्या प्रांतांत काँग्रेस सत्ता आहे तेथे मुस्लिमांवर अनन्वित अत्याचार होत आहेत, अशा तऱ्हेचा प्रचार मुल्ला-मौलवी करीत होते. जिनांनी मुद्दामच प्रचारासाठी या लोकांची योजना केली होती. जिना स्वतः बुद्धिवादी, व्यक्तिवादी व सुधारणावादी होते. एका