पान:इहवादी शासन.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । १९७
 

चळवळींना हिंदूंनी विरोध केला, तर आम्ही अफगाणिस्तानशीं सहकार्य करून मुस्लिमांचें राज्य येथे प्रस्थापित करूं." (इंडियन मुस्लिम्स- रामगोपाळ, पृष्ठ १६६).
 वर सांगितलेच आहे की, खिलाफत नष्ट होतांच स्वातंत्र्यसंग्रामांतील मुस्लिमांचा रस संपला आणि त्या संग्रामांतील सर्व चळवळींपासून ते अलिप्त राहिले; एवढेच नव्हे, तर त्यांचा निषेध करूं लागले. १९३० साली मुंबईच्या प्रचंड मुस्लिम परिषदेत "सत्याग्रहाची चळवळ ही सात कोटि मुस्लिमांना गुलामगिरीत डांबून टाकण्यासाठी चालविलेली हिंदूंची चळवळ आहे" असें महंमदअल्ली, रहिमतुल्ला व इतर सर्व मुस्लिम नेत्यांनी जाहीरपणे सांगितले.
 एकोणिसशेबत्तीस साली ब्रिटिश सरकारने जातीय निवाडा जाहीर केला. मुस्लिम, शीख, युरोपीय व दलित यांना त्या निवाड्याने स्वतंत्र मतदारसंघ दिले. यांतील दलितांचे स्वतंत्र मतदार संघ महात्माजींनी प्राण पणाला लावून रद्द करून घेतले. पण मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाचें काय ? त्याला विरोध करण्याचें सुद्धा काँग्रेसला धैर्य झालें नाही. कारण डॉ. अन्सारीसारख्या राष्ट्रीय मुस्लिमांनी, काँग्रेसने जातीय निवाड्याला- कम्युनल ॲवॉर्डला- विरोध केला, तर आम्ही काँग्रेसचा त्याग करूं, अशी धमकी दिली. तेव्हा काँग्रेसने त्या निवाड्याबाबत विरोधहि नाही व स्वीकारहि नाही असा विनोदी ठराव केला.

राष्ट्रीयतेचा त्याग

 याचा अर्थ असा की, राष्ट्रीय मुस्लिमांच्या मर्जीसाठी काँग्रेसने स्वतःच्या राष्ट्रीयतेचा त्याग केला! मुस्लिम लोक जें मागतील तें जें म्हणतील तें हिंदूंनी त्यांना द्यावें, असें महात्माजींनी शतवार सांगितलें होतें. शेवटी मुस्लिमांनी फाळणी मागितली.
 १८८७ सालापासून सर सय्यद अहंमद यांनी हिंदू व मुस्लिम हीं दोन राष्ट्रें आहेत, असा घोष चालविला होता. पुढे आगाखान, महंमदअल्ली हे त्याचेच पडसाद उमटवीत होते. पण त्या वेळी हे नेते राष्ट्रविरोधी आहेत, त्यांच्या मागण्या राष्ट्राला घातक आहेत असें काँग्रेसचे नेते म्हणत असत. पण खिलाफत चळवळीनंतर, मुस्लिम नेत्यांच्या वृत्तींत काडीमात्र फरक पडलेला नसतांना, त्यांची गणना राष्ट्रीय नेत्यांत होऊं लागली. मानवता, समानता, समान नागरिकत्व, सर्वांना सारखा कायदा, जनतेचें सार्वभौमत्व, सर्वांना एकत्र न्याय, सामाजिक, राजकीय प्रश्नांवर धर्माचें वर्चस्व नसणें, ते प्रश्न लोकशाही पद्धतीने सोडविणें हा राष्ट्रवादाचा पाया. मुस्लिमांनी ही भूमिका कधीच मान्य केली नव्हती. तरीहि त्यांच्या मागण्या मान्य होत होत्या. त्याचीच परिणति होऊन शेवटीं भारताची फाळणी झाली.