पान:इहवादी शासन.pdf/२०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८ । इहवादी शासन
 

करूनहि त्यांना यश आले नाही. युद्धकाळांत त्यांना धर्मश्रद्धेचा आश्रय करावा लागला. 'कॉम्युनिस्ट' या पत्राने जाहीरपणे सांगितले की, युद्धाच्या आपत्तीच्या काळी अनेक विरोधविकासवादी लोकांनीहि धर्माचा आश्रय केला होता ! १९५३ साली स्टॅलिन मृत्यु पावला व त्यानंतर क्रुश्चेव्हने जाहीरपणें त्याला बदनाम केले. त्यामुळे कम्युनिस्ट तत्त्वज्ञानावरची रशियन जनतेची श्रद्धा ओसरूं लागली. स्टॅलिनला ते देव मानीत होते. पण निधर्मी सरकारचा हा देव नरराक्षस ठरल्यामुळे लोकांत ख्रिस्ती धर्मावरील श्रद्धा पुन्हा दृढावू लागली. पक्षाचा एक कार्यकर्ता मजुरोव्ह याने तक्रार केली आहे की, निरनिराळ्या धर्मसंस्थांवर नजर ठेवण्यासाठी नेमलेले लोक आंतून त्या संस्थांना साह्य करीत असतात.

नवा पवित्रा

 हा पराभव वर्मी लागल्यामुळे कम्युनिस्टांनी नवी चढाई सावधपणे करण्याचें ठरविलें. इतके दिवस बुद्धिवादाने ते लढत असत. परमेश्वर, आत्मा, मोक्ष, मरणोत्तर गति हीं तत्त्वं तर्कदृष्ट्या कशी असमर्थनीय आहेत तें पटवून देऊन विरोधविकासवादच कसा शास्त्रशुद्ध आहे व तर्कमान्य आहे हें ते विवरून सांगत असत. अत्याचार, जुलूम, विध्वंस हे चालू असतांनाच नव्या कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाचे घोट अशा पद्धतीने ते लोकांना पाजीत असत. पण आता त्यांनी ध्यानांत घेतले की, धर्म ही एक अत्यंत प्रबळ अशी भावना आहे. तर्कवादाने तिचा बीमोड होणार नाही. म्हणून खाजगी संभाषणे, चर्चा, संवाद या मार्गाने भावनेला हात घालून भाविकांच्या हृदयापर्यंत पोचावयाचे, असे त्यांनी ठरविलें, अर्थात् या मार्गाने जातांना कम्युनिस्ट प्रचारक, दडपण, दहशत यांचा अवलंब करीत नसत, असें नाही. पण बाह्यतः तरी त्यांचे नेते त्याचा निषेध करतात. 'प्रवदा'ने म्हटले आहे (१२-१-६३ ) "धर्म या अफूचा अंमल नष्ट करण्यासाठी व्यक्तिगत संभाषणाचा परिणाम फार चांगला होतो. पण त्यासाठी धीर, संयम, चिकाटी यांची आवश्यकता असते. अनेक प्रचारकांच्या ठायीं हें गुण नसल्यामुळे ते भाविकांना दहशत घालून त्यांच्या भावना दुखवितात, हें योग्य नव्हे. या सनातन भाविकांचीं मनें, त्यांची सेवा करून संकटकाळी त्यांना साह्य करूनच, आपण जिंकली पाहिजेत. धर्म या भावनेशी संग्राम करावयाचा आहे तेव्हा तशाच दुसऱ्या भावना जागृत केल्या, तरच हा संग्राम यशस्वी होईल; अशा भावना कोणत्या ? कम्युनिझमच्या तत्त्वज्ञानावरील श्रद्धा, कम्युनिस्ट स्वजनांविषयीचा बंधुभाव, सामूहिक कार्याविषयीचे प्रेम या त्या भावना होत. या जागृत करून लोकांशी नित्य बोलून धर्मश्रद्धेचा फोलपणा दाखविला पाहिजे, असें सोव्हिएट नेते सध्या सांगत असतात.
 गनिमी चढाईचा दुसरा मार्ग म्हणजे रशियन ऑर्थोडॉक्स चर्च ही संस्था व तिचे धर्मगुरु यांना रागलोभाने वश करून त्यांनाच कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाचे अगदी