पान:इहवादी शासन.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९४ । इहवादी शासन
 

सारखें दिसत होतें. त्याच्याच राज्यांतील सुधारक तरुण पिढीने तिला आव्हान दिलें होतें. असें असूनहि महात्माजींनी खिलाफतीच्या चळवळीचें नेतृत्व पत्करलें ही भारताच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवाची गोष्ट घडली.
 राष्ट्रनिष्ठेच्या प्रगतीला बुद्धिवाद, उदारमतवाद, सर्वधर्मसमानत्व, जनतेचें सार्वभौमत्व, व्यक्तित्व या तत्त्वांची आवश्यकता असते. पण खिलाफतीच्या चळवळींत जे मुस्लिम उतरले ते बरोबर याच्या उलट वृत्तीचे होते. त्यांच्यावर देवबंद विद्यापीठाचें वर्चस्व होतें. ते धर्मांध असून आता तुर्की खलिफाची सत्ता हिंदुस्थानांत स्थापन होणार या कल्पनेने पिसाट झाले होते. खिलाफतीच्या चळवळीमुळे त्यांच्यांतील हिंसक व अत्याचारी वृत्ति उफाळून आल्या होत्या. मोपला या मलबारांतील मुस्लिम जमातीने ही चळवळ ऐन मध्यावर असतांना तेथील हिंदूंवर जे घोर अत्याचार केले त्यांवरून हें स्पष्ट दिसून आलें.
 या मोपल्यांनी खलिफाच्या राज्याच्या घोषणा केल्या, एका मुस्लिमाला राजपदीं बसविलें व जाळपोळ, लूट, बलात्कार यांचें थैमान मांडलें. पण एवढें घडूनह एकहि मुस्लिम पुढाऱ्याने वा संस्थेने त्या अत्याचारांचा निषेध केला नाही. काँग्रेसच्या राष्ट्रीय मुस्लिमांनी काँग्रेसमध्येहि असा ठराव संमत होऊ दिला नाही. हिंदूंशी सहकार्य करण्यामागे मुस्लिम लीगचा काय हेतु होता तें समजण्यास ही घटना पुरेशी होती. (स्ट्रगल फॉर फ्रीडम- मुजुमदार, पृष्ठे २४०, २४१, ३१९, ३६२).

कोहट येथील अत्याचार

 यानंतर थोड्याच दिवसांनी वायव्य सरहद्दीजवळच्या कोहट या गावी हिंदु समाजावर मुस्लिमांनी असेच भीषण अत्याचार केले. त्यांची चौकशी करण्यासाठी काँग्रेसने महात्माजी व शौकतअल्ली यांची समिति नेमली. चौकशीअंतीं दोघांची ध्रुव-भिन्न अशीं मतें पडलीं ! मुस्लिमांचा प्रक्षोभ व्हवा असें हिंदूंनीं कांहीहि केलें नव्हतें असें गांधींनी लिहिलें. सर्व दोष हिंदूंचाच होता असें शौकतअल्ली म्हणाले. ज्यांना हिंदु-मुस्लिमांचें एक राष्ट्र घडविण्याची सदिच्छा आहे त्यांनी कोहटच्या चौकशीचें हें वृत्त ही प्रतीकात्मक घटना मानावी आणि विचार करावा.
 सर सय्यद अहंमद यांनी पन्नास वर्षांपूर्वीच सांगून ठेवलें होतें की, इंग्रज येथून गेल्यावर एका जमातीने दुसरीला जिंकून येथे आपली सत्ता प्रस्थापित करणें एवढाच एक मार्ग आहे. दोन्ही जमाती समभावाने एकत्र राहणें अशक्य आहे. खान दुराणी यांनी १९२९ सालीं व १९४६ साली आपल्या ग्रंथांत हेंच स्पष्ट शब्दांत सांगितलें आहे. "सर्व भारत पुन्हा इस्लामच्या नांवें जिंकून घेणें, हें एकच तर्कशुद्ध ध्येय मुस्लिमांनी ठेवलें पाहिजे." (करंदीकर- इस्लाम इन इंडियाज ट्रँझिशन टु मॉडर्निटी, पृष्ठ २५५), आज मौलाना सद्रुद्दीन हेंच सांगत आहेत. ( भारतीय मुस्लिम, आव्हान आणि आवाहन- हसनैन, पृष्ठ ६०).