पान:इहवादी शासन.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । १९३
 

त्यावर महंमदअल्ली यांनी कडाडून हल्ला चढविला आणि ऐहिक व पारलौकिक सर्व व्यवहारावर अल्लाचीच सत्ता चालली पाहिजे, असें आपलें मनोगत स्पष्ट करून सांगितलें. अलीगड, सर सय्यद अहंमद यांची विभक्तवृत्ति आणि मुस्लिम लीगने मागितलेले विभक्त मतदार संघ यांचें त्यांनी समर्थन केलें आणि त्यांच्या राजनिष्ठेचेंहि समर्थन केलें. असें असतांना इंग्रजांविरुद्ध भूमिका घेण्याचें लीगला काय कारण झालें ?
 व्हाइसरॉय कर्झन याने १९०५ साली बंगालची फाळणी केली. या फाळणी- विरुद्ध काँग्रेसने फार मोठी चळवळ केली होती. पण पूर्व बंगाल हा मुस्लिम बहुसंख्य प्रदेश झाल्यामुळे मुस्लिमांना फाळणीमुळे अतिशय आनंद झाला होता. पुढे काँग्रेसच्या चळवळीमुळे १९११ साली इंग्रज सरकारने बंगालची फाळणी रद्द केली. त्यामुळे हिंदी मुस्लिम अत्यंत संतप्त झाले आणि त्यांचा इंग्रजांवरचा विश्वास ढळू लागला. म्हणजे काँग्रेसने प्राणपणाने लढून जी राष्ट्रहिताची गोष्ट घडवून आणली तिच्यामुळे मुस्लिम भडकून गेले होते आणि हे काँग्रेसच्या अध्यक्षपदावरूनच मौ. महंमदअल्ली सांगत होते.
 इंग्रजांवरचा मुस्लिमांचा विश्वास ढळण्याचें महंमदअल्लींनी सांगितलेलें दुसरें कारण म्हणजे तुर्क सुलतानाला इंग्रजांनी दगा दिला हें होय. तेव्हा भारताचें पारतंत्र्य, त्यामुळे भारतीयांना प्राप्त झालेली दुर्गति, याचें सोयरसुतक मुस्लिमांना नव्हतें. महंमदअल्ली म्हणाले, "इस्लामच्या मूलभूत नियमांप्रमाणे मुस्लिमांना आचरण करण्यास स्वातंत्र्य मिळाले की, मग त्या देशांत सत्ता मुस्लिम असो की नसो, त्याला महत्त्व नाही. कारण स्वसंरक्षणार्थ ते खलिफावर अवलंबून असतात!"

खिलाफतीचें संरक्षण

 महंमदअल्लींच्या या भाषणावरून मुस्लिम काँग्रेसशी सहकार्य करण्यास कां तयार झालें हें स्पष्ट होईल. भारताचें स्वातंत्र्य, भारतीय जनतेचा उत्कर्ष, भारतीयांशीं सहजीवन ही प्रेरणा त्यामागे मुळीच नव्हती. पुढील आठ-दहा वर्षांत घडलेल्या अनेक घटनांवरून हें पुनः पुन्हा अनेक वेळा स्पष्ट झालेलें आहे. पहिले महायुद्ध संपल्यानंतर तुर्क साम्राज्य विस्कटून गेलें आणि तुर्की सुलतान व खलिफा (दोन्ही एकच) याला इंग्रजांनी नाममात्र सत्ताधारी बनविलें. तेव्हा त्या खलिफा- पीठाच्या, खिलाफतीच्या संरक्षणासाठी भारतांत फार मोठी चळवळ सुरू झाली व महात्माजी तिचे अध्वर्यु बनले.
 मुस्लिमांच्या दुःखांत आपण सहानुभूति दाखविली की ते भारतीय बनतील, राष्ट्रीय होतील, भारतीय जनतेशी एकरूप होतील, अशी महात्माजींची विचार- सरणी होती. पण खलिफा हा अत्यंत प्रतिगामी, जुलमी, धर्मांध, जीर्णवादी होता; त्याची सत्ता प्रगतिविरोधी, समाजघातक व अन्यायी होती हें आधीचीं पन्नास वर्षे
 इ. शा. १३