पान:इहवादी शासन.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९२ । इहवादी शासन
 


सहकार्यामागचा हेतु

 इजिप्त, त्रिपोली, मोरोक्को या प्रकरणांवरून इंग्रज हे इस्लामचे शत्रु, हें भारतीय मुस्लिमांना आधीच वाटू लागलें होतें. १९१२ सालीं ग्रीस, बल्गेरिय इत्यादि तुर्की साम्राज्यांतील चार देशांनी उठावणी करून सुलतानाचा पराभव केला. त्या वेळींहि इंग्रजांनी त्या देशांनाच सहानुभूति दाखविली. त्यामुळे आतापर्यंत राजनिष्ठ असलेले अलिगडपंथीय मुस्लिमहि संतप्त झाले. देवबंद पंथ हा तर प्रारंभापासूनच इंग्रजांविरुद्ध होता. आता अलिगड पंथहि त्याला मिळाला आणि अशा रीतीने हिंदी मुस्लिमांची इंग्रजी राज्याविरुद्ध एक फळी तयार होऊन तिने काँग्रेसशी सहकार्य करावयाचें ठरविलें. त्या वेळच्या काँग्रेसच्या धुरीणांनी या वृत्तीचें आनंदाने स्वागत केलें व त्यांनी १९१३ सालच्या कराचीच्या काँग्रेसचें अध्यक्षपद नवाब सय्यद महमूद या एका मुस्लिमाला दिले. या सहकार्याच्या वृत्तींतूनच पुढे १९१६ सालीं लखनौच्या काँग्रेसमध्ये लखनौ करार होऊन हिंदु-मुस्लिम ऐक्यावर शिक्कामोर्तब झालें.
 पण मुस्लिमांनी हें सर्व राष्ट्रप्रेमामुळे, भारतनिष्ठेमुळे, सहजीवनाच्या वृत्तीमुळे केलें काय ? द्विराष्ट्रवाद, विश्व-मुस्लिमवाद यांमुळे अपरिहार्यपणें येणारी जी बाह्यनिष्ठा तिचा त्यांनी त्याग केला काय ? हिंदुस्थानांतील मुस्लिम हे राष्ट्रीय झाले काय ?
 या वेळेपासून हिंदुस्थानांत 'राष्ट्रीय मुस्लिम' या नांवाने पुढे प्रसिद्धीस आलेला एक वर्ग दिसूं लागला हें खरें आहे. त्या वर्गाचें स्वरूप पाहणें इहवादाच्या अभ्यासाच्या दृष्टीने फार आवश्यक आहे. महंमदअल्ली हे त्या वेळीं राष्ट्रीय मुस्लिमांचे अग्रणी होते. त्यांचीच साक्ष आपण काढू. तिच्यावरून तें स्वरूप आपल्याला कळून येईल.


 महमंदअल्ली हे राष्ट्रीय मुस्लिमांचे त्या वेळीं अग्रणी होते. १९२३ साली कोकोनाडा येथे काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून त्यांनी जें भाषण केलें त्यावरून काय दिसतें ? हिंदु-मुस्लिम मिळून हिंदुस्थानांत एक राष्ट्र घडवावें असें त्यांनी सांगितलें काय ?
 हिंदुस्थान हे एक संघराज्य असावें असें ते म्हणाले. पण हा संघ कोणाचा ? भिन्न प्रांतांचा संघ त्यांच्या मनांत होता काय ? नाही. भिन्न धर्माचे हे संघ असावे व त्यांचें संघराज्य व्हावें असें त्यांनी सांगितलें. हिंदुस्थानचे विभाग करून एकेका धर्माला एकेक विभाग धर्मांतर करण्यासाठी वाटून द्यावा, अशी सूचना त्यांनी मांडली. आतापर्यंत काँग्रेसने जी राष्ट्रनिष्ठा उपदेशिली होती तिचा इहवाद हा पाया होता.