पान:इहवादी शासन.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । १९१
 


तुरळक प्रयत्न

 १९१३–१४ पर्यंत लीगचें राजकारण याच पन्हळींतून वाहत होतें. या काळांत अनेक मुस्लिमांनी मुस्लिमांच्या वृत्तीला एकराष्ट्रीयत्वाचें वळण लावण्याचा प्रयत्न चालविला होता. बद्रुद्दीनू तय्यबजी यांनी, अनेक गावांत हिंदु बहुसंख्य असून त्यांनी नगरपालिकांमध्ये मुस्लिम प्रतिनिधींचे बहुमत करून दिले, हें दाखवून हिंदूंवर अविश्वास करण्याचें कारण नाही, असें मुस्लिमांना सांगितलें. बंगालची फाळणी कर्झनने केली ती, पूर्व बंगाल मुस्लिम बहुसंख्येचा व्हावा, या हेतूनेच म्हणजे भेद- नीतीला अनुसरून केली होती. तरीहि कांही मुस्लिम पुढाऱ्यांनी तिला हिंदूंप्रमाणेच विरोध केला होता. काँग्रेसच्या स्वदेशीच्या चळवळीलाहि अनेक मुस्लिमांनी पाठिंबा दिला व वंदे मातरम् हें राष्ट्रगीत गाऊन मिरवणुका काढून हितु नेत्यांच्या सभेलाहि ते उपस्थित राहिले. पण एकराष्ट्रीयत्वाचा हा धागा भारतांत बळकट असा कधीच झाला नाही.
 वरील प्रकारचें ऐक्य पाहून सरकारने व लीगने मुल्ला-मौलवींना खेड्या- पाड्यांत धाडून मुस्लिम जनतेला भडकवून दिलें. 'लाल इस्तहार' या नांवाचें प्रसिद्ध पत्रक याच वेळी काढण्यांत आलें होतें. "हिंदु हे मुस्लिमांचे शत्रु आहेत, त्यांच्याशी संबंध ठेवणें हें पाप आहे, त्यांच्यावर बहिष्कार घाला म्हणजे लवकरच ते नरम होऊन इस्लामचा स्वीकार करतील," असा विषारी प्रचार त्यांत होता. याच वेळ पुढे प्रसिद्धीस आलेली जी डायरेक्ट ॲक्शन- घोर हिंसेची राजनीति- तिचा अवलंब करण्यास मुस्लिमांनी प्रारंभ केला आणि भीषण दंगली घडवून आणल्या. मुल्ला-मौलवी मुस्लिमांना जाहीरपणें सांगत की, "तुम्ही काय वाटेल ते अत्याचार केले, तरी तुम्हांला शिक्षा होणार नाही, इंग्रज सरकार आपल्या बाजूचें आहे, न्यायालयें कांही दिवस बंदच ठेवलेलीं आहेत. तेव्हा कचरूं नका." या चिथावणीमुळे हिंदूवर केवढे भयानक अत्याचार झाले असतील याची सहज कल्पना येईल. (स्ट्रगल फॉर फ्रीडम- आर्. सी. मुजुमदार, पृष्ठे ५३-५६).
 वर म्हटल्याप्रमाणे हें लीगचें राजकारण १९१३ सालापर्यंत असेंच चालू होतें. काँग्रेसच्या स्वराज्याच्या मागणीला लीगचे नेते कसून विरोध करीत होते आणि हिंदूंचा संपर्क त्यांना दुरूनहि नको होता. पण १९१३ सालीं लीगच्या धोरणांत आकस्मिक बदल झाला व ती स्वराज्याच्या मागणीला साथ देण्यास तयार झाली. काँग्रेसशीं सहकार्य करण्यासाठी तिने हात पुढे केला ! हा पालट कशामुळे झाला? मुस्लिमांत राष्ट्रीय वृत्ति जागृत झाली काय? ते भारताला मातृभूमि मानूं लागले काय?
 तसें कांहीहि घडलेलें नव्हतें. पॅन् इस्लामिझम्- विश्व-मुस्लिमवाद- यांचे जबर आवाहन या वेळीं हिंदी मुस्लिमांना आलें, हें त्यामागचें कारण होतें.