पान:इहवादी शासन.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८८ । इहवादी शासन
 

काँग्रेस अखिल भारतीयांची, तेथील सर्वधर्मीयांची, सर्व जातिजमातींची आहे, असें तत्त्व तिच्या चालकांनी प्रारंभापासूनच उद्घोषिलें होतें. पण अशी संस्था यशस्वी होऊच शकणार नाही, असें सर सय्यद यांचें ठाम मत होतें व आपल्या भाषणांतून, लेखनांतून ते त्याचा हिरीरीने पुरस्कार करीत असत. त्यांचीं मतें प्रारंभापासूनच अशी होती. इंग्रजांनी फोडा व झोडा या नीतीचा अवलंब केला नाही यावद्दल त्यांनी १८५८ सालींच सरकारवर टीका केली होती. हिंदु व मुस्लिम या दोघांना लष्करांत एकाच पलटणींत घातल्यामुळे त्यांच्यांत बंधुभाव वाढतो, तो इंग्रजांना घातक होय, तोच १८५७ साली घातक ठरला, असें सांगून त्यांनी यांच्या स्वतंत्र पलटणी ठेवाव्या असा इंग्रजांना उपदेश तेव्हाच केला होता. (करंदीकर, इंडियाज् ट्रँझिशन, पृष्ठ १५७).
 तेथून पुढील तीस वर्षांच्या काळांत सर सय्यद यांची वृत्ति राष्ट्रीय झाली होती, ते हिंदु-मुस्लिम ऐक्याचे, एकराष्ट्रीयत्वाचे पुरस्कर्ते झाले होते असें म्हणतात. तशी त्यांचीं कांही वचनें सापडतातहि. 'जो हिंदुस्थानांत राहतो तो हिंदु' या न्यायाने मी हिंदूच आहें, असेंहि त्यांनी म्हटलें होतें. पण या वृत्तीचा पुढे लोप होऊन ते विभक्त वृत्तीचे कडवे पुरस्कर्ते झाले. अलीगड कॉलेजचे पहिले प्रिंसिपॉल बेक व एकंदर इंग्रज राज्यकर्ते यांची भेदनीति ही याला कारण आहे, असें सांगितलें जातें. स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळापर्यंत अनेक राजकीय पुढाऱ्यांनी व पंडितांनी हिंदु-मुस्लिम समस्येची या दृष्टिकोनांतून मीमांसा केली होती. या दोन जमातींच्या वैमनस्याला इंग्रजांची भेदनीति कारण आहे, वस्तुतः त्यांचा पूर्वीचा इतिहास सहजीवनाचा, सामरस्याचा, एकात्मतेचा आहे, असा विचार डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्यासारख्यांनीहि मांडला आहे. (इंडिया डिव्हायडेड, पृष्ठ ८३). पण ब्रिटिश गेले, पाकिस्तान झालें, तरी भारतांतील या दोन जमातींचें वैर अणुमात्र कमी न होतां तें वाढतच चाललें आहे. त्यामुळे आता उपरोक्त पंडितांपैकी अनेकांनी आपला भ्रमनिरास झाल्याचें जाहीरपणें सांगितलें आहे. याच दृष्टीने आपण सर सय्यद यांच्या कार्याकडे पाहिले पाहिजे.
 ब्रिटिशांनी सर सय्यद यांना फितविलें व पुढे शेवटपर्यंत भेदनीतीचेंच धोरण अवलंबून या दोन जमातींतील वैराग्नि सतत भडकत ठेवला हें खरें. पण तो वैराग्नि तेथे होता आणि मुस्लिम जमातीने तो सतत सातशे वर्षे जिवंत ठेवला होता, हे आपण विसरतां कामा नये. प्राचीन काळच्या आणि ब्रिटिशांच्या काळच्या इतिहासांत हिंदु-मुस्लिम ऐक्याची उदाहरणें सापडत नाहीत असें मला मुळीच म्हणावयाचें नाही. सूफी पंथाने दोन्ही धर्मातील तत्त्वांच्या समन्वयाचा केलेला प्रयत्न, चित्र, संगीत, शिल्प आदि कलांत दोन्ही जमातींच्या कलांचा झालेला संगम, अनेक प्रांतांत दोन्ही जमातींच्या आचार-विचारांत निर्माण झालेलें सादृश्य, हें सर्व ऐतिहासिक सत्य आहे, यांत मुळीच शंका नाही. पण यामुळे हिंदु-मुस्लिम या जमाती एकराष्ट्रीयत्वाच्या