पान:इहवादी शासन.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विरोधी शक्ति । १८७
 

मिळविलें. वहाबीपंथीय व म्हणूनच देवबंदपंथीय लोक हिंदुस्थानांत इंग्रजांचें राज्य असल्यामुळे हा देश म्हणजे 'दार उल हरव'- शत्रुदेश- मानीत. पण सर सय्यद व त्यांचे नबाब अब्दुल लतीफ यांसारखे मित्र यांनी उलेमा, मुल्ला-मौलवी यांचीं मतें वळवून हिंदुस्थान 'दार उल हरव नाही, दार उल इस्लाम आहे' असा फतवा त्यांच्याकडून काढविला.
 'विश्व- मुस्लिमवाद- पॅन् इस्लामिझम्'- यालाहि सर सय्यद यांचा विरोध होता. त्यामुळे ते ब्रिटिशांना जास्त प्रिय झाले. युरोपांत तुर्की सुलतानाशीं इंग्रजांचे संबंध केव्हाच बरे नव्हते. पण तुर्की सुलतान हा सर्व मुस्लिम जगताचा खलिफा मानला जात असे. या खलिफापदाला व विश्व- मुस्लिमवादाला प्रत्यक्षांत भरीव अर्थ कधीहि नव्हता व नाही. कारण खलिफांची सत्ता तुर्कस्तानांत सुद्धा तरुण तुर्क व त्यांचे अनुयायी मानीत नसत. साम्राज्यांतील इतर लोक त्यांच्या जुलमी सत्तेला कंटाळलेच होते. पॅन् इस्लामिझमचेंहि तसेंच आहे. सर्व मुस्लिम विश्व एक होऊन त्या मुस्लिमांनी एका सामुदायिक ध्येयासाठी कधी दृढ संघटन केलें आहे व कांही फार मोठे कार्य साधलें आहे, असें इतिहासांत कधीहि घडलेलें नाही. पण खिलाफत व विश्व- मुस्लिमवाद यांचा जगांतले धूर्त राजकीय नेते मात्र हवा तसा उपयोग आजपर्यंत (रावात परिषदेपर्यंत) करून घेत आलेले आहेत.
 १८७६ सालीं खलिफा असलेला अब्दुल हमीद याने या दोन्ही कल्पना आपल्या स्वार्थासाठी चांगल्याच राबविल्या होत्या आणि मुस्लिम जगत् हें त्या काळापर्यंत पाश्चात्त्य विद्याविमुख, पोथीनिष्ठ व परिवर्तनविरोधी असल्यामुळे त्याला कांही काळ यशहि आलें. पण सर सय्यद हे नवमतवादी व बुद्धिप्रामाण्यवादी असल्यामुळे त्यांनी तुर्की खलिफाची धार्मिक सत्ता व त्याचा विश्व- मुस्लिमवाद यांना आपल्या मनांत कधीहि थारा दिला नाही. ते म्हणत, "आम्हीं हिंदी मुस्लिम तुर्की खलिफाचे प्रजाजन नाही, आम्ही राणीचे प्रजाजन आहों. तुर्की सुलतानाची सत्ता त्याच्या देशापुरती मर्यादित आहे." १८९६ साली ग्रीस व तुर्कस्तान यांची लढाई जुंपली. त्या वेळीं इंग्रजांनी ग्रीकांची बाजू घेतली. देवबंद पीठाने या वेळीं ब्रिटिशांविरुद्ध मुस्लिमांना खूप चिथविलें. पण सर सय्यद यांची राजनिष्ठा ढळली नाही. त्यांनी पत्रके काढून ब्रिटिशांचेंच समर्थन केलें.

विभक्ततेचा आग्रह

 सर सय्यद अहंमद यांची ही विचारसणी पाहिली म्हणजे भारतांतील हिंदु- मुस्लिम ऐक्याचे, त्यांच्या सहजीवनाचे ते खंदे पुरस्कर्ते असतील असें वाटतें. पण वस्तुस्थिति याच्याबरोबर उलटी होती. हिंदू व मुस्लिम हीं दोन स्वतंत्र राष्ट्र आहे असें मत मांडून, पाकिस्तानचा पाया त्यांनीच घातला होता, असें इतिहास सांगतो.