पान:इहवादी शासन.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कम्युनिस्ट देश । ७
 

संचार करून लोकांत धर्मजागृति करीत होते. आपल्या मठांत अनेक तरुणांना जमवून ते त्यांना चेतवून देत होते. या सर्वांचा परिणाम म्हणूनच रशिया स्वतंत्र झाला," असें मत या कादंबरींत मांडलेले आहे. धर्मनिष्ठा व परंपराभिमान यांनी ओतप्रोत भरलेल्या या कादंबरीचें 'प्रवदा' ने विस्तृत परीक्षण करून 'रशियाच्या एका प्राचीन महापुरुषाचें चरित्र' असा तिचा महिमा गायिला आहे.
 इहवाद, सेक्युलॅरिझम, इहवादी शासन, शासन आणि धर्म यांची फारकत, जनतेवरील इहवादाचे संस्कार, सार्वजनिक जीवनांतील शासकीय व्यवहारांतील पूजा-प्रार्थना यांचें म्हणजे धर्माचें स्थान यांविषयी बरीच उद्बोधक माहिती वरील विवेचनावरून मिळेल. रशियांत युद्धकाळांत सोव्हिएट नेत्यांनी धर्मापुढे शरणागति पत्करली खरी, पण युद्ध थांबल्यावर गरज संपतांच त्यांनी धर्मनिर्दाळण्याचा कार्यक्रम पुन्हा सुरू केला. तो आजतागायत तसाच चालू आहे. त्याचें विवेचन पुढील लेखांत करूं. ज्या देशाला इहवादी शासन यशस्वी करावयाचें आहे, त्याने धर्म या शक्तीचा सांगोपांग अभ्यास करून मगच धर्माचें आपल्या देशांतील स्थान निश्चित केलें पाहिजे. आणि त्यासंबंधी जे निर्णय घ्यावयाचे ते या अभ्यासानंतरच घेतले पाहिजेत. गेल्या पंचवीस वर्षांतील रशियांतील धर्मविचारांचा इतिहास, या दृष्टीने वर दिलेल्या पहिल्या पंचवीस वर्षांतल्या इतिहासाइतकाच उपयुक्त होईल, यांत शंका नाही.


 १९३६ ते १९४६ हा जो संग्रामकाळ, त्याने सोव्हिएट नेत्यांना स्पष्ट दाखवून दिलें की, धन, वित्त, कुटुंबांतले प्रियजन आणि शेवटीं प्राण यांचा त्याग करण्याची प्रेरणा कम्युनिस्ट तत्त्वज्ञान देऊ शकत नाही. धर्म, राष्ट्र, पूर्वपरंपरा या शक्ति त्यासाठी अवश्य आहेत. पण हें ध्यानांत आलेलें सत्य मान्य करणें त्यांना शक्य नव्हतें. कारण सोव्हिएट शासनाची व कम्युनिस्ट जगताची सर्व इमारत मार्क्सप्रणीत जो 'विरोधविकासवाद' त्याच्यावर उभी आहे. धर्मतत्त्वाला मान्यता दिली, तर तो पायाच हादरेल, हें जाणून १९४८-५० च्या सुमारास रशियन शासनाने नव्या जोमाने धर्मनाशाची मोहीम सुरू केली.
 मात्र थोडें शहाणे होऊन आता त्याने गनिमी काव्याचा अवलंब केला. वास्तविक धर्मनाशाच्या मोहिमेंत समोरासमोर युद्ध करणे कधीच शहाणपणाचे होणार नाही, असें एंगल्सनेच सांगून ठेवलें होतें व लेनिनने विस्तृत विवेचन करून त्याचाच पुरस्कार केला होता. पण सत्ता हाती आली त्या वेळीं सोव्हिएट सत्ताधाऱ्यांना हें भान राहिले नाही. आणि त्यांनी समोरून हल्ला करूनच धर्माचा विध्वंस करण्याचें धोरण अवलंबिलें. पण छळ, हद्दपारी, फाशी हे सर्व अत्याचार