पान:इहवादी शासन.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८६ । इहवादी शासन
 

प्रस्तावना महंमद गझनीने १०१८ सालीं पंजाब जिंकला तेव्हाच लिहिली गेली होती. या पुस्तकाचें 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये परीक्षण लिहिणारे श्री. गोपाळ कृष्ण तर म्हणतात, "माझ्या मतें या प्रस्तावनेचा सन ७११ हा आहे. येथले जमातीय शत्रुत्व तेव्हापासून अटळ झालेले आहे." (टाइम्स दि. १०- २- १९७०). भारतांत अजून पांच-सहा कोटि मुस्लिम आहेत आणि भारताला इहवादी शासन तर यशस्वी करावयाचें आहे. तेव्हा या प्रचंड अल्पसंख्य जमातीची वृत्ति मूलतः तपासून ही विरोधी शक्ति अनुकूल कशी करून घेतां येईल याचा विचार भारताच्या प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे. त्याच दृष्टीने ब्रिटिशपूर्व काळाचा मुस्लिम इतिहास आपण पाहिला आणि त्याच दृष्टीने आता नंतरचा इतिहास हा तपासावयाचा आहे.
 सर सय्यद अहंमद हे सुधारणावादी, परिवर्तनवादी व बुद्धिवादी होते. पाश्चात्त्य विद्या आत्मसात केल्यावांचून भारतीय मुस्लिमांची प्रगति होणार नाही, असें त्यांचें मत होतें. आपल्या या मताचा प्रचार करण्यासाठी त्यांनी कुराणावर नवें भाष्य लिहिलें, 'सायंटिफिक सोसायटी' नांवाची संस्था स्थापिली व अनेक इंग्रजी ग्रंथांचें भाषांतर करवून घेतलें. अलीगड येथे १८७५ साली त्यांनी कॉलेज स्थापन केलें तें पाश्चात्त्य विद्या व सुधारणावाद मुस्लिमांत रुजविण्याच्या हेतूनेच होय. त्या काळापर्यंत भारतीय मुस्लिम वहाबी पंथ व वलीउल्ला यांच्या वर्चस्वाखाली असल्यामुळे, ते इंग्रजी भाषा, इंग्रजी विद्या व पाश्चात्त्य संस्कृति यांचा कडवा द्वेष करीत. त्यांच्या प्रसारामुळे इस्लाम धर्म नष्ट होईल, इंग्रजांचा तसा हेतूच आहे, असें त्यांना वाटे.
 वर उल्लेखिलेला देवबंद पंथ हा वहाबी परंपरेंतील व त्यामुळे पाश्चात्त्य विद्येचा द्वेष्टा होता. इ. स. १८६७ साली उत्तर प्रदेशांतील देवबंद या गावीं मौ. नानवटवी यांनी हा पंथ स्थापिला. इंग्रजी विद्या व पाश्चात्त्य संस्कृति यांविषयी देवबंद पंथाची दुर्दैवाने आजहि तीच वृत्ति आहे. या वृत्तीमुळेच सर सय्यद अहंमद यांचें व या पंथाचें प्रारंभापासूनच वैमनस्य आहे. या पंथाने त्या वेळीं सर सय्यद यांच्यावर त्यांच्या नवमतवादामुळे प्रखर टीका केली. पण त्यांनी ती न जुमानता आपलें कार्य अखंडपणें व निष्ठेने चालविलें.

ब्रिटिशनिष्ठेचे पुरावे

 या कामी त्यांना ब्रिटिश राज्यकर्त्यांचें फार साह्य झालें. १८५७ च्या युद्धांत सहभागी झाल्यामुळे मुस्लिमांवर इंग्रजांनी दात धरला होता. हिंदु हे आपल्या राज्याचे मित्र व मुस्लिम हे शत्रु असें ते मानीत. पण सर सय्यद यांनी नाना मार्गांनी मुस्लिमांच्या ब्रिटिशनिष्ठेचे पुरावे देऊन इंग्रजांची भूमिका संपूर्णपणें पालटवून टाकली व मुस्लिमांच्या प्रगतीला इंग्रज राज्यकत्यांचें हार्दिक साह्य