पान:इहवादी शासन.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८४ । इहवादी शासन
 

भारतीय संस्कृति ही केवळ हिंदूंची संस्कृति नाही, ती हिंदु-मुस्लिमांची समाईक, संमिश्र संस्कृति आहे. ती वेद, उपनिषदे, महाभारत यांनी प्रथम घडविली व पुढील काळांत भारतांत आलेल्या सर्व जमातींनी ती हिंदूंप्रमाणेच विकसित केली, असें हुमायून कबीर, अबीद हुसेन, डॉ. ताराचंद या पंडितांचें म्हणणें आहे. प्रश्न एकच आहे. वेदकाळापासून चालत आलेली भारतीय संस्कृति ही आपली आहे, आपण तिचे वारस आहोंत असें मुस्लिम समाज मानतो का ?
 ऐक्यभावना, सौहार्द, एकात्मता यांचा हा निकष आहे. तेव्हा मुस्लिम समाज भारतीय जीवनाशीं कधीहि एकात्म झाला नाही हा सिद्धान्त पारखून घेतांना पंडितांची मतें न पाहतां, हा निकष लावून निर्णय केला पाहिजे.


 भारतांतील मुस्लिम भारतीय जीवनाशी केव्हाही समरस झाले नाहीत, विश्व-मुस्लिमवादाच्या काल्पनिक, भ्रांत जगांतच ते राहिले, याचें प्रधान कारण, म्हणजे त्या समाजावरील मुल्ला-मौलवींचें वर्चस्व हे होय. हे मुल्ला-मौलवी अरबस्तान, तुर्कस्तान, इराण या देशांतल्या मौलवींप्रमाणेच जीर्णमतवादी, शब्दनिष्ठ, हेकट व दुराग्रही होते. त्यामुळे इस्लाममध्ये परिवर्तन, प्रगति, सुधारणा, नवचैतन्य हे सर्व अशक्य होऊन बसलें व भारतीय इस्लामला अगदी मलिन रूप आलें.
 कांही मुस्लिम पंडितांच्या मतें, भारतांत इस्लाम आला तोच मुळी मलिन रूपांत आला. प्रा. अबीद हुसेन यांच्या मतें, महंमद पैगंबर व चार खलिफा यांच्या कारकीर्दीतच फक्त म्हणजे पन्नास-साठ वर्षेच खरें इस्लामिक शासन व इस्लामी संस्कृति टिकली. पुढे तिच्यांतील समता, लोकशासन, बुद्धिप्रामाण्यवाद हीं मूलतत्त्वें नष्ट झाली. चार खलिफानंतरची उमायाद खिलाफत व आव्वासीद खिलाफत या पूर्ण नव्हे, तरी निदान अंशत: तरी इस्लामी होत्या. पण आव्वासीद खिलाफतीनंतर जीं मुस्लिम शासनें झालीं त्यांच्या ठायीं राजकीय वा सांस्कृतिक दृष्टीने पाहतां इस्लामचा आत्मा मुळीच नव्हता.
 हिंदुस्थानांतील दिल्लीची सुलतानसत्ता (सलतनत) ही अशीच होती. ते सुलतान व त्यांची शासनें अनिस्लामी होती. त्या शासनांत सर्व प्रकारची विषमता मुस्लिम-मुस्लिमांतहि होती. आर्थिक क्षेत्रांत, नीतीच्या क्षेत्रांत ते इस्लामी बंधनें धिक्कारून पुष्कळ वेळा लहरीप्रमाणे वागत. त्यांची सत्ता पूर्ण अनियंत्रित व विषम होती. तेव्हा दिल्ली सल्तनत हें मर्यादित अर्थानेहि इस्लामी राज्य नव्हतें. (नॅशनल कल्चर ऑफ इंडिया, पृष्ठे ८० ते ९०).