पान:इहवादी शासन.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



हे कशाचे लक्षण ?

 हिंदू व मुस्लिम यांच्या शिल्पकलेचा एकमेकांवर परिणाम झाला असेल, शतकांच्या सान्निध्यामुळे तो अपरिहार्यच आहे; पण उत्तर भारतांतील देवळें, लेणीं, समाधि-मंदिरें, राजवाडे यांतील प्रत्येक मूर्ति, प्रत्येक कलाकृति ही फुटलेली. तुटलेली आहे हें स्नेह, सौहार्द, धार्मिक सहिष्णुता यांचेंच लक्षण काय ? भारतांतले मठ, विद्यापीठांतलीं ग्रंथालये यांचा विध्वंस, त्यांची जाळपोळ ही कशाची साक्ष आहे ? मुस्लिम उदारमतवादाची ?
 सूफी पंथाच्या समन्वयाच्या कार्याचें आज जें महत्त्व गाइलें जातें तें असेंच अतिरेकी आहे. प्रारंभापासून सूफी हे हिंदूंचे व हिंदु धर्माचे हाडवैरी होते. चिस्ती व गझनवी यांची उदाहरणें वर दिलींच आहेत. अकबराच्या सहिष्णुतेचा, समन्वयाचा, उदारमतवादित्वाचा ठावठिकाणाहि पुसून टाकण्याचें कार्य नक्षबंदी या सूफी पंथानेच केलें. आपल्या ग्रंथांत प्रा. अझीझ अहंमद यांनी 'नक्षबंदी रीॲक्शन' या प्रकरणांत याचें सविस्तर वर्णन केलें आहे. आणि सूफींच्या समन्वयाच्या कार्याचीं वर्णनें हीं अतिरेकी एकांतिक व अवास्तव आहेत, हें प्रा. मुजुमदार यांचें मतच सत्याच्या जास्त जवळ आहे, असा आपला अभिप्राय दिला आहे.
 हिंदुधर्मांतील भक्तिमार्ग व सूफींचा भक्तिमार्ग यांच्यांतील साम्याचें व तज्जन्य सहजीवनाचें नेहमी वर्णन केलें जातें. पण भारतांत भक्तिमार्गाला चौदाव्या, पंधराव्या शतकांत जी जोराची चालना मिळाली ती सूफींच्या धर्मातराच्या चळवळीला प्रत्युत्तरें देण्याच्या हेतुमुळे मिळाली हें लक्षांत ठेवले पाहिजे. (अझीझ अहंमद, पृष्ठ १३६).
 एका धर्मांतराचाच फक्त विचार केला तरी हिंदु-मुस्लिमांच्या सहजीवनाच्या, एकात्मतेच्या, सौहार्दाच्या कल्पना किती असत्य, किती विपर्यस्त आहेत तें सहज कळून येईल. अनेक मुस्लिम सुलतान, सरदार, मुल्लामौलवी हे काफरांना इस्लामची दीक्षा देणें, हें पुण्यकर्म मानीत असत. आणि सक्तीने, दहशतीने, भल्याबुऱ्या मार्गांनी त्यांनी हें कार्य अखंड चालू ठेवलेलें होतें. पण हिंदूंनी मुस्लिमांनाच नव्हे, तर बाटलेल्या हिंदूंना सुद्धा परत स्वधर्मांत घेणें हें मात्र कोणालाहि मान्य नव्हतें. त्या अपराधाला देहदंडाचीच शिक्षा होती आणि असें असतांना मुस्लिम सुलतान हे सहिष्णु होते, मुस्लिमेतरांना त्यांनी धार्मिक व सांस्कृतिक स्वातंत्र्य दिलें होतें असें अनेक विद्वान् सांगतात ! जे हिंदु बाटणार नाहीत त्यांच्यावर जिझिया कर लादला जात असे. प्रा. हुसेन यांच्या मतें जिझिया कर लादण्याचा सुलतानांना अधिकार नव्हता. त्यामुळे हिंदूंचा स्वाभिमान दुखावला जात असे. नोकरीच्या दृष्टीनेहि हिंदु-मुस्लिमांत सुलतान भेदभाव करीत, असे स्वतःच लिहून पुन्हा हिंदूंना धार्मिक स्वातंत्र्य होते, मुस्लिम सुलतान न्यायाने राज्य करीत, असे त्यांनी म्हटलें आहे.