पान:इहवादी शासन.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८२ । इहवादी शासन
 


निराळी विचारसरणी

 येथून पुढे भारतांतील मुस्लिमांच्या राजकारणाचें दुसरें पर्व सुरू झालें. त्याचा विचार पुढे येणारच आहे. येथे भारतीय मुस्लिमांच्या विभक्त वृत्तीविषयी जीं मतें मांडलीं आहेत त्यांहून निराळी अशी एक विचारसरणी प्रचलित आहे. तिचा परामर्श घेऊन हें पहिले विवेचन संपवू.
 प्रा. हुमायून कबीर व प्रा. अबीद हुसेन यांनी आपल्या 'दि इंडियन हेरिटेज' व 'दि नॅशनल कल्चर ऑफ इंडिया' या ग्रंथांत ही विचारसरणी विस्ताराने मांडली आहे. त्यांच्या मतें मुस्लिम भारतांत आल्यानंतरचा हजार वर्षांचा इतिहास हा दोन्ही जमातींच्या स्नेहाचा, सौहार्दाचा, सहकार्याचा व एकात्मतेचा आहे. युद्धे झाली, लढाया झाल्या, रक्तपात झाले, संघर्ष झाले; पण हें सर्व अपवादात्मक होय. इतिहासकारांनी त्यावरच सर्व भर दिल्यामुळे तें चित्र विकृत दिसतें. पण तें खरें नाही. सध्याची भारताची संस्कृति ही मुस्लिमांची वा हिंदूंची नाही. ती हिंदुस्थानी म्हणजे संमिश्र संस्कृति आहे. गणित, वैद्यक, ज्योतिष या विद्या भारतांत प्रगत झाल्या होत्या. अरब व इतर मुस्लिम राष्ट्र यांवर त्यांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष छाप होती. आठव्या- नवव्या शतकांत दक्षिण भारतांत शंकराचार्यांचे अद्वैत तत्त्वज्ञान व भागवतांचा भक्तिपंथ यांच्यामागे इस्लामची प्रेरणा होती. चित्र, शिल्प, संगीत या कलांच्या वाबतींत अशीच देवाण- घेवाण झालेली आहे. सूफी पंथाने धर्माच्या बाबतींत हिंदु धर्मं व इस्लाम यांच्यांत समन्वय साधून एकात्मतेला फार मोठें साह्य केलें. रामानंद, कबीर, नानक, चैतन्य, मोइउद्दीन या धर्मधुरीणांनी सूफी पंथाचेंच कार्य पुढे चालवून दोन्ही जमातींना एकजीव करून टाकलें. त्यांच्यांत लढाया झाल्या त्या हुमायून कबीर यांच्या मतें आर्थिक व राजकीय कारणांनी झाल्या. धार्मिक कारणें त्यामागे मुळीच नव्हतीं, तशींच जातीय कारणेंहि नव्हतीं. हिंदु-मुस्लिम यांचे लढे होत तसे हिंदु- हिंदूंत व मुस्लिम- मुस्लिमांतहि होत. तेव्हा त्यावरून या जमातींत धार्मिक वैर होतें, असें म्हणतां येणार नाही. म्हणूनच असें म्हणतां येतें की, या जमातींचा इतिहास हा ऐक्याचा, सातत्याचा, समन्वयाचा, एकात्मतेचा आहे.
 या दोन्ही लेखकांचीं काव्यमय पुस्तकें वाचून मनाला मोठा विस्मय वाटतो. वरील काळाचा इतिहास लिहिणारांनी भर कशावर दिला हा विचार बाजूला ठेवला तरी, त्यांनी दिलेल्या घटना आणि मुस्लिम सुलतान, मोगल पातशहा, मुल्ला- मौलवी यांचीं आत्मचरित्रे, त्यांचीं पत्रें, त्यांची फर्मानें यांवरून जो इतिहास वाचकांना दिसतो तो स्नेहाचा, सहकार्याचा व एकात्मतेचा होता हें म्हणणें अत्यंत धाष्ट्र्यांचें वाटतें. या साहित्यावरून दिसून येणारे अत्याचार, विध्वंस, जाळपोळ, लूट, बलात्कार, त्यांतील कत्तली, हत्याकांडे, जबरीचीं धर्मांतरें, यांना जर अपवादात्मक म्हणावयाचें असेल, तर प्रा. कबीर व प्रा. हुसेन यांचा अपवाद शब्दाचा अर्थ फार निराळा असला पाहिजे.